Sunday 12 November 2017

Flowers: Field Milkwort | Sanjivani – संजीवनी | Polygala arvensis Willd.

 दादा, ती पिवळी फुलं कसली रे? माझं लक्ष वेधून घेत अथर्वने प्रश्न केला. अथर्व आणि माझी ही पहिलीच भेट. दत्तगडला फिरताना माझं फुलांचे फोटो घेणं सुरु होतं आणि हा मागे येऊन उभा राहिलेला, कुतूहलानं माझ्याकडे पाहत. एकटाच होता. त्याची प्राथमिक चौकशी करून मी माझ्या चाललेल्या उद्योगाचा खुलासा केला, तसं त्याने आणखी प्रश्न विचारायला सुरवात केली. म्हणजे, हे फुल कोणतं? ते कोणतं? आणि तुला कसं माहीत? वैगेरे. अथर्व ८ वी इयत्तेत शिकणारा एक लहान मुलगा, पण प्रचंड उत्साही आणि कुतूहल असणारा वाटला. आत्याकडे पुण्याचे गणपती पाहायला आलेला आणि सहज फिरायला म्हणून दत्तगडावर आला होता आणि त्यात आमची भेट झाली. थोड्याच वेळात आमची गट्टी जमली आणि मग गप्पाही रंगल्या.

इकडचं तिकडचं बोलून झाल्यावर त्याचा फिरून पुन्हा तोच प्रश्न, ती पिवळी फुलं कसली ते सांगितलं नाहीस तू. उत्तरादाखल "संजीवनी" असं नाव सांगितलं मी. पुढचा प्रश्न, शेंगा येतात का याला? मी म्हणालो नाही, पापुद्रयासारखी फळं लागतात. काही वेळ शांतता, आणि मग अचानक त्याने निरोपाचं बोलून टेकडी उतरायला सुरवात केली. त्याला तसाच पाठमोरा पाहत मी त्याच्या कुतूहला बद्दल विचार करत बसलो. नक्की काय विचार करत हा उतरला असेल?


विचारांच्या तंद्रीतून बाहेर पडल्यावर मी पुन्हा लेन्स अड्जस्ट करून "संजीवनी"चे फोटो घेऊ लागलो. पानं, फुलं, फळं बिया असे विविध भाग न्याहाळत होतो. मनाप्रमाणे सगळ्या नोंदी झाल्या. अथर्वप्रमाणे मी ही विचारांच्या धुंदीत टेकडी उतरलो. खरंच संजीवनी किती लोकांना माहित असेल? मला किती माहित आहे? मनातून आलेल्या उत्तरातून कळलं, आपल्याला देखील संजीवनीबद्दल फारसं माहित नाही. वाचलंही नव्हतं आणि म्हणूनच अधिक वाचावं, जाणून घ्यावं असं वाटू लागलं. वाचलंही नंतर बऱ्यापैकी.

तर संजीवनी ही एक लहान वनस्पती, साधारणपणे १५-३० सेमी उंचीची. हीचं इंग्रजी नाव Field Milkwort असं आहे. सुरवातीलाच नाव सांगण्यामागे माझा एक मुख्य हेतू आहे. हे नाव शास्त्रीय नावाशी संबंधित आहे. संजीवनीचा समावेश "Polygala" या जातीमध्ये होतो, आणि हा शब्द ग्रीक भाषेतून आलेला आहे. या शब्दाचा अर्थ 'दुधात वाढ होणे' असा होतो. संजीवनी वनस्पती पाळीव प्राण्यांनी (गाय, शेळी वैगरे) खाल्ली की त्यांच्या दुधामध्ये वाढ होते आणि अप्रत्यक्ष फायदा होतो. तर, दुधात होणाऱ्या वाढीबद्दल सांगणारं Field Milkwort हे नाव इंग्रजी भाषेत आलं आहे. भारतात, विशेषकरून महाराष्ट्रात पावसाळ्यानंतर गायी व इतर गुरांना माळरानावर चरायला नेतात ते कदाचित यासाठीच. या अशा वनस्पती यांच्या तोंडी लागल्या की आपोआप दुधात वाढ होते आणि आपलाही स्वार्थ साधला जातो. संजीवनीचं आणखी एक इंग्रजी नाव आहे, ते म्हणजे 'Snakeroot'. हिच्या मुळांना विशिष्ठ सुगंध आहे. या मुळ्यांच्या सुगंधाला भुलून साप जवळ येतात असा एक समज आदिवासी भागांत आहे आणि त्याची दखल घेणारं हे नाव असावं. अशी अर्थपूर्ण नाव ज्यांनी दिली त्यांचं खरंच कौतुक.


असो, तर संजीवनी एक लहान वनस्पती, जमिनीपासून ४-६ फांद्या निघतात, हिरव्या रंगाच्या, त्यावर नारंगी रंगाची छटा असते कधीकधी. उंची कमी असल्याने जमिनीपासून पानं लागायला सुरवात होते. पानांच्या आकारामध्ये विविधता पाहायला मिळते. कधी उलट्या अंड्यासारखी (Obovate), कधी गोलाकार (Circlular), कधी उलट्या कंदिलासारखी (Inverted Lance Shaped) तर कधी पाकळीसारखी (Elliptic) असतात. पानांची लांबी १.५ - ३ सेमी असून रुंदी १ सेमी पर्यंत असते. जसजसा माळावरील मातीचा प्रकार बदलत जातो तशी झाडाची उंची आणि पानांचे प्रकार बदलताना दिसतात. पानं एकाड-एक (alternate) पद्धतीने फांद्यांवर जोडलेली असतात, पानांची कड (Margin) एकसंध असते, पानांचा देठ खूप लहान म्हणजे साधारण १ मिमी पर्यंत असतो, काही पानांत तो अगदीच दिसेनासा असतो (Close to sessile). पान फांदीला जिथे जोडलेलं असतं त्या अक्षात (Axis) फुलांचे गुच्छ लागतात. प्रत्येक गुच्छ साधारणपणे १ सेमी लांबीचा असतो, त्यात ४-८ फुलं लागतात. सगळी फुलं एकाच वेळी फुलत नाहीत ती शक्यतो क्रमाक्रमाने फुलतात. फुलं अशी क्रमाक्रमाने फुलल्यामुळे त्यांच्यातील फळधारणेची शक्यता अधिक वाढते.

फुलांचा रंग पिवळा. वरच्या बाजूने दोन पाकळ्या आणि खालच्या बाजूला एक अशी रचना असते. वरच्या पाकळ्यांच्या बाहेरून हिरव्या रंगाचे आणि काहीसे केसाळ आच्छादन असते, हे आच्छादन म्हणजे पाकळ्याचं संरक्षण दल (Calyx) होय. प्रथमदर्शनी फुलं शेंगवर्गीय वनस्पतींशी साधर्म्य असणाऱ्या वाटतात पण निरीक्षणपूर्वक पाहिल्यास दोन्हींमधील फरक स्पष्ट कळतो. वरच्या बाजूला असलेल्या दोन पाकळ्या एकमेकांवर आच्छादलेलया (Overlap) असतात. त्यामुळे त्या शेंगवर्गीय वनस्पतींशी साधर्म्य असणाऱ्या भासतात. या दोन्ही पाकळ्या कुक्षी (Ovary) च्या जवळ एकमेकांना जोडलेल्या असतात. पाकळ्यांच्या आतल्या बाजूने आणि मध्यभागी तपकिरी रंगाच्या रेषा असतात. तिसरी पाकळी फुलाच्या खालच्या बाजूने वाढते. ती सोंडेसारखी किंवा हुकासारखी भासते. टोकाकडे या पाकळीचं मुलायम केसांमध्ये रूपांतर होतं, हे केस टोकाकडे जाताना नागमोडी वळण घेतात आणि त्यामुळे कधीकधी थोडा गुंता होतो. अशी रचना या जातीतील जवळ जवळ सर्वच फुलांमध्ये पाहायला मिळते. पाकळी मधील हा विशेष बदल निसर्गाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे, कसा? ते आपण पुढे जाणून घेणार आहोतच.फुलातील स्रिकेसर (Gynoecium) आणि पुंकेसर (Androecium) हे याच सोंडेसारख्या भासणाऱ्या पाकळीत असतात, ते सोंडेतून क्वचितच बाहेर येतात, बहुधा सोंडेचा तोंडापर्यंतच त्यांची वाढ होते आणि पुढे मग पाकळीच्या टोकाचा म्हणजेच केसांचा भाग असतो.


फुलं परिपक्व झाली की, सोंडेतील पुंकेसरातून परागकण (Pollen grains) बाहेर पडतात. फुलांना विशीष्ठ सुगंध नसला तरी तिसरी पाकळी जी सोंडेसारखी भासते आणि टोकाकडे आकर्षित केसांमध्ये रूपांतरित होते, त्यामुळे परागीभवणास कारणीभूत असणारे किडे याकडे आकर्षित होतात. सोंडेमध्ये घुसून मकरंद गोळा करता करता वेगवेगळ्या फुलांना भेटी देतात. एका फुलावरून दुसऱ्या फुलावर उठणं बसणं होतं, सोंडेच्या टोकाकडच्या केसांमुळे किड्यांच्या, फुलपाखरांच्या किंवा मधमाशांच्या अंगावर लागलेले परागकण अलगद पुसून घेतले जातात आणि स्रिकेसराच्या तोंडात टाकले जातात. पुढे नैसर्गिकरित्या फलनाची प्रक्रिया पार पडून फळधारणा होते.

फुलांची संरक्षण दलं आता फळांची संरक्षण दलं (Persistent Calyx) म्हणून काम पाहू लागतात. याच्या आत ५-६ मिमी लांबी आणि रुंदी असणारी फळ लागतात. फळांचा आकार काहीसा चौकोनी असतो. त्यामध्ये दोन बिया लागतात. फळं बाहेरून पाहिली की पापडी सारखी भासतात आणि वजनाने अतिशय हलकी असतात. फळ परिपक्व झाली की जमिनीवर गळून पडतात. वाऱ्याच्या साहाय्याने सर्वदूर पसरतात. प्रवासात कधी ही फुटतात तर इतर काही कारणाने फुटून त्यातून बियांची पेरण होते.

संजीवनीच्या बिया वैशिष्टपूर्ण आहेत. या फार फार तर २- ४ मिमी लांबीच्या, काळ्या रंगाच्या आणि त्यावर सोनेरी किंवा तांबूस रंगाच्या मुलायम केसांचं आच्छादन असणाऱ्या असतात. बिया फळामध्ये ज्या ठिकाणी जोडलेल्या असतात तिथून एक पांढरा पदर (Cover) बी वर आलेला असतो. याला शास्त्रीय भाषेत ऐरिल (Aril) म्हणतात. बियांच्या प्रसारामध्ये याचं खूप महत्व आहे कारण हा पदर खाण्यायोग्य असतो. मुंग्या आणि इतर कीटक या पदरासाठी संपूर्ण बी ओढून घेऊन जातात. कधी या बिया त्यांच्या वारुळांपर्यंत पोहोचतात तर कधी मधेच वाटेत पडून जातात. संजीवनी मात्र नवीन पिढीची सोय होतीय हे पाहून सुखावलेली असते. निसर्ग खूप अजब आहे, इथे प्रत्येक घटनेमागे कारण आहे, शास्रिय! ते समजून घेण्यातला आनंद फार वेगळा आहे.

वर सांगितल्याप्रमाणे संजीवनीला दोन इंग्रजी नाव आहेत, Field Milkwort आणि Snakeroot. शास्रिय भाषेत याला Polygala arvensis Willd. असं नाव आहे. या वनस्पतींचा समावेश Polygalaceae या कुळामध्ये होतो. या कुळातील काही झाडं बागेमध्ये सुशोभीकरणासाठी लावतात.

संजीवनी, तुझं निसर्गातील अस्तित्व इतर वनस्पतींमध्ये हरवलेलं वाटतं, पण तरीही ते महत्वाचंच आहे आणि आम्हाला नक्कीच त्याबद्दल तुझा आदर आहे!!!

Plant Profile:

Botanical Name: Polygala arvensis Willd.
Synonyms: Polygala angustifolia, Polygala brachystachya, Polygala chinensis, Polygala cyanolopha, Polygala kinii, Polygala linarifolia, Polygala monspeliaca, Polygala polyfolia, Polygala quinqueflora, Polygala senduaris, Polygala shimadai.
Common Name: Field Milkwort
Marathi Name: Sanjivani (संजीवनी)
Family: Polygalaceae
Habit: Herb
Habitat: Deciduous or Scrub forest on slopes, Grasslands (शुष्क जंगल आणि डोंगरउतारावर, माळराने)
Flower Colour: Yellow (पिवळा)
Leaves: Simple, Obovate / Circular / Inverted Lance Shaped / Elliptic, 1.5-3 cm long x 1 cm wide, Stipulate, Near to sessile.
Smell: No smell
Abundance: Common
Locality: Dattagad (Dighi), Pune
Flowering Season: Jul to Sep
Date Captured: 26-Aug-2017

-         

         - रा.जा. डोंगरे