Friday, 8 April 2016

Flowers: Bonfire Tree | Kaushi - कौशी | Sterculia colorata Roxb. / Firmiana colorata R.Br.

Sterculia colorata flower inflorescence
उन्हाळा म्हटलं की बाहेर फिरायला जाणं शक्यतो आपण टाळतो, मी स्वतः देखील त्याला अपवाद नाही! दुपारच्या जेवणानंतर थंडगार लिंबू सरबत किवा ताक घेऊन मस्त तासभर झोप काढण्याचा विचार मनाला शिवतो, पाहता पाहता कधी डोळा लागतो ते कळत सुद्धा नाही. चुकून कधी फिरायला बाहेर निघायचा विचार केलाच तर घरातली मंडळी लगेच ओरडायला सुरवात करतात, "एवढ्या उन्हात काय फिरायचं?" आणि ठरलेला बेत फसतो. ट्रेकर मंडळी सुद्धा उन्हाळ्यात उंच, अवघड किल्ले आणि रानवाटा फिरणं शक्यतो टाळतातच, कारण सह्याद्रीतलं उन म्हणजे मोठं भयानक, त्यात तापलेले सह्यकडे आग ओकत असतात, अशा परिस्थितीत किल्ल्यांचा विचार करणं म्हणजे थोडं धाडसाचं असतं. आणि तसही उन्हाळ्यात निसर्गसौंदर्य वर्षाऋतूसारख फारसं काही आकर्षक नसतं, अशी आपल्याच मनाची समजूत आपण घालतो.

गैरसमज! होय आपल्या सर्वांचाच गैरसमज होतोय असं म्हणायला हरकत नाही, कारण सह्याद्रीच्या वनांत विशेषतः घाटमाथ्यावर आणि पठारांवर वृक्षांना याच काळात फुलं लागलेली असतात. त्यातली बहुतांश रानफुलं ही मनमोहक आणि सुगंधी असतात. विश्वास बसत नाही ना? हो, पण हे सत्य आहे. उदाहरण द्यायचं झालं तर असाच एक मध्यम उंचीचा वृक्ष म्हणजे "कौशी". इंग्रजीमध्ये Bonfire Tree म्हणून याला ओळखतात. bonfire या शब्दाचा अर्थ आहे शेकोटी, आणि अंधाऱ्या रात्री शेकोटी पेटवल्यावर जो नारंगी रंग दिसतो अगदी तसाच रंग कौशी फुलल्यावर दिसतो आणि म्हणून अशा नावाचा विशेष उल्लेख आहे.

कौशीची झाडे साधारणपणे १५ ते २० फुटांपर्यंत वाढतात, खोडाचा रंग राखाडी, घेर फार फार तर २-३ फुटांचा, साधारणपणे ७-८ फुटांपासून फांद्या निघायला सुरवात होते. फांद्यांच जाळं इतर झाडांच्या तुलनेत जरा जास्त गुंतागुंतीच असतं. प्रत्येक फांदीच्या शेवटी अगदी टोकावर ५-१२ पाने अगदी दाटीवाटीने वाढतात. प्रत्येक पान हे बदामी आकाराचे (Heart Shaped) असते आणि लांबी साधारणपणे १०-१५ सेमी पर्यंत असते, पानांचा रंग गर्द हिरवा किंवा थोडासा पोपटी असतो.

Flower close-up showing flower structure and pollinators
 पानाला शक्यतो तीन ते ५ पाळ्या असतात, त्यामुळे एकूण पानाला महिरपी सारखा आकार निर्माण होतो. पानाची टोकं लांब आणि टोकदार असतात. पानांचा देठ सुद्धा हिरव्या रंगाचा असून ६-१० सेमी लांबीचा असतो. पानं फांदीच्याअगदी टोकावर वाढत असल्यामुळे झाडाच्या खोडाजवळ उभं राहून वर पाहिल्यास एखाद्या छत्रीप्रमाणे हा वृक्ष भासतो. वर्षभर पानांनी डवरणारी कौशी फेब्रुवारीनंतर हळूहळू पर्णहीन होते. महिन्याभरात सगळी पाने गळून जातात आणि प्रत्येक पानाच्या देठापासून एक नवीन फुलोऱ्याची गर्द नारंगी रंगाची दांडी निघते. बघता बघता या दांडीवर लहान लहान नारंगी रंगाच्या कळ्या लागतात आणि आपल्या नकळत कळ्यांची फुलेदेखील होतात. फुलांच्या बाहेरच्या बाजूला बारीक केस अगदी गर्दीने वाढलेले असतात त्यामुळे फुलांना स्पर्श केल्यास ती हाताला अगदी मुलायम लागतात. हे केस उघड्या डोळ्यांनी चटकन दिसत नाहीत त्यासाठी साध्या भिंगाची मदत घ्यावी लागते. फुलांची लांबी साधारणपणे २-३ सेमी असते. कौशीच्या फुलाचं वैशिष्ठ्य म्हणजे यामध्ये पाकळ्या नसतात, आता प्रश्न असा पडतो की पाकळ्या नसतात तर नारंगी रंगाच्या पाकळ्यासारखी रचना असते तरी कसली? त्या पाकळ्या नसून पाकळयांची संरक्षण दले (Calyx) असतात. सर्व साधारणपणे सरंक्षण दले आणि मग पाकळ्यांची रचना पाहायला मिळते, मात्र यामध्ये पाकळ्या नसून संरक्षण दलेच पाकळ्यांच कामगिरी बजावतात.

Habit & Habitat - Sterculia colorata
या संरक्षण दलांची फुलोऱ्याच्या अक्षाच्या (axis) बाजूला नळी तयार होते आणि जसं जसं अक्षाकडे जावं तशी तशी या नळीची रुंदी कमी होत जाते. फुलं कळीच्या स्वरुपात असताना संरक्षण दले ही एकमेकांना टोकाला जोडलेले असतात आणि याच काळात आतमध्ये फुलाच्या स्रिकेसर आणि पुंकेसाराची वाढ होत असते. योग्य वाढ पूर्ण झाली की फुलाच्या टोकावरच्या भागाचा दाब वाढतो आणि बंद असलेली सरंक्षण दले उघडली जातात, हळुवारपणे आणि नकळत त्यांना पाकळ्यांच स्वरूप प्राप्त होतं. फुले उघडली की ती घंटीच्या आकाराची दिसतात. आता बाहेरून नारंगी तर आतमधून मात्र भडक रक्तासारखा लाल रंग दिसतो, फुलाच्या मध्यातून एक फुगीर लाल रंगाची दांडी बाहेर पडते, या दांडीच्या अग्रभागी स्रिकेसर आणि पुंकेसर एकत्रित वाढतात. पुंकेसर तीस तर स्रिकेसर एक अशी यांची संख्या असते. स्रीकेसराच्या कुक्षीभोवती हे तीस पुंकेसर दाटीवाटीने एकमेकांना जोडून विनातक्रार वाढत असतात. फुलांच्या मंद व काहीश्या उग्र गंधामुळे कीटक आकर्षित व्हायला सुरवात होते, नारंगी रंगाच्या मोहात पडून सुर्यपक्षापासून ते इतर खूप सारे पक्षी या फुलांना भेटी द्यायला सुरवात करतात. एव्हाना पुंकेसर आणि स्रिकेसर दोन्ही परिपक्व झालेले असतात, उणीव असते ती फक्त परागकण कुक्षीवर जाउन पडण्याची, त्यासाठी मुंग्या, इतर कीटक, पक्षी आणि सह्याद्रीतला वारा कामाला येतो.

प्रत्येक फुलोऱ्यात चाळीसच्या वर फुले असतात, परंतु प्रजनन (fertilization) प्रक्रियेनंतर त्यातली फक्त एक ते पाच फुलेच फळांच्या रूपाने पुढे जगतात. फळे लहान आकाराची, लंबगोलाकार आणि काहीशी चपटी, मांसल आणि नारंगी रंगाची असतात. प्रत्येक फळामध्ये साधारणपणे ८-१२ बिया असून त्या बाहेरच्या आवरणाला चिकटलेल्या असतात. बियांच्या रंग काळा असतो, आकाराने साधारणपणे १-२ मिमी आणि लंबगोलाकार असतात. बिया परिपक्व झाल्या कि फळांवरील दाब नैसर्गिक प्रक्रियेने वाढतो आणि ती अलगद एका बाजूने उघडली जातात. त्यानंतर बिया बाहेर पडतात आणि पुन्हा नव्याने रुजतात नवीन पिढीची स्वप्ने घेउन!

Purple sunbird enjoying flowers of Sterculia colorata
कौशीला शास्रीय भाषेत Sterculia colorata Roxb. अस नाव आहे, आणखी एक प्रचलीत नाव म्हणजे Firmiana colorata R. Br.यातल्या पहिल्या नावाला विशिष्ठ अर्थ आहे. Sterculia हा शब्द Sterculius या लेटीन (latin) शब्दापासून आलेला आहे. Sterculius हे लेटीन (latin) देवतेचं नाव आहे, ही देवता शेतकर्यांना शेतीसाठी लागणाऱ्या खतांच (जैविक जसे शेन) कंपोस्टमध्ये  रुपांतर करण्यासाठी मदत करते असा तेथील शेतकऱ्यांचा विश्वास आहे. कौशीच्या फुलांचा वास हा काहीसा शेणाच्या उग्र वासाशी साम्य असणारा आहे आणि म्हणून हा विशिष्ठ गुणधर्म दर्शवणारा आणि त्या देवाला सन्मानित करण्यासाठी Sterculia शब्दाचा उल्लेख शास्रीय नावामध्ये आढळतो. कौशीचा समावेश Malvaceae म्हणजेच जास्वंदीच्या कुळात झाला आहे.


कौशीला आयुर्वेदामध्ये महत्वाचे स्थान आहे, पाने आणि सालीची भुकटी शेळीचा दुधात मिसळून काविळीच्या रुग्णांना दिली जाते. कोवळ्या फांद्यांची साल काढून त्यापासून धागे मिळवले जातात आणि या धाग्यांपासून आदिवासी बांधव स्वतःसाठी कपडे आणि दोर बनवतात. कौशीचे लाकूड मजबूत असल्याने लाकूडफाटा म्हणून त्याचा बहुधा वापर होतो.



Plant Profile:

Botanical Name: Sterculia colorata Roxb.
Synonyms: Firmiana colorata R.Br.
Common Name: Bonfire Tree, Scarlet Sterculia
Marathi Name: Kaushi (कौशी)
Family: Malvaceae
Habit: Tree
Habitat: Deciduous forest (पानगळीची वने)
Flower Colour: Scarlet (नारंगी)
Leaves: Simple, 3-5 lobed margin, heart shaped
Smell: dung like smell
Abundance: Common in Sahyadri ranges on hill tops and deciduous forests.
Locality: Kukadeshwar, Junnar, Rural Pune, MH
Flowering Season: March to May

Date Captured: 26-Mar-16

Saturday, 2 April 2016

Flowers: जांभळी मंजिरी - Jambhali Manjiri | Pogostemon deccanensis Panigrahi


सह्याद्रीच्या रानावनांत फिरताना खुपदा मोकळ्या माळरानांशी गाठभेट होते. एरवी ही माळरानं अगदी ओसाड पडलेली असतात, असलंच थोडं फार तर पिवळ गवत आणि त्याच्या सोबतीला एखाद दुसरं खुरटं झुडूप. या माळरानांवरचे पक्षीही थोडे वेगळेच, माळाशी अगदी साम्य असणारे, त्यामुळे ते लवकर दिसूनही येत नाहीत. ही ओसाड असलेली माळराने खरे रंग आणतात ते पावसाळ्याच्या शेवटी. हिरव्यागार लुसलुशीत गवताचे गालिचे आणि त्यावर हवेच्या तालावर डोलणारी रानफुलं. एकदा का रानफुलांचे ताटवे फुलायला लागले की दर पंधरा दिवसांना ही माळराने नवनवीन रंग परिधान करू लागतात.

सह्याद्रीच्या माळरानांवरील या रंगांच्या उधळणीमधे एक महत्वाच रानफुल म्हणजे "जांभळी मंजिरी", पुन्हा एकदा मराठी नावांमधील एक सुंदर नाव. जितकं सुंदर नाव तितकंच सुंदर हीच रुपडं आहे. जुलै महिन्यात एकदा पावसाच्या सरी ताल धरू लागल्या आणि उघड्या माळरानांत पाणी मुरलं की मंजिरीची बीजं रुजायला सुरवात होते. जुलैच्या शेवटी बिया रुजून छोटी छोटी रोपटी पाण्याच्या डबक्यांत आणि ओलसर मातीत तयार होतात. ही छोटी रोपं खूपच सुंदर दिसतात, विशेषतः उथळ पाण्याच्या डबक्यात! मंजिरीची रोपं जशी जशी वाढायला लागतात तशा नवीन फांद्या मुख्य शाखेवर अगदी जमिनीपासून निघायला सुरवात होते. या फांद्यांवर प्रत्येक अर्ध्या ते एक सेमी अंतरावर गोलाकार रचनेत लांब सुळयांसारखी मांसल पाने लागतात. या गोलाकार रचनेमुळे पानांनादेखील फुलांसारख्या रचनेचा आभास निर्माण होतो. चुकून कधी उन या डबक्यांवर पडल तर पानांमधील हरितद्रव्य (Cholorophyll) चमकत, आणि प्रत्येक डबक्यांमध्ये मंजिरीची अशी अनेक झाडं असतात. ही सर्व झाडं एकत्रित चमकताना पाहणे म्हणजे एक वेगळा सोहळाच.

ऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत मंजिरीची वाढ पूर्ण होते, उंची साधारणपणे २०-३० सेमी पर्यंत असते. सप्टेंबर महिन्याच्या सुरवातील उन, सावल्या आणि पावसाचे खेळ सुरु होतात. प्रत्येक फांदीच्या टोकावर ६-७ सेमी लांबीचे हिरवे तुरे किंवा फुलोरे निघतात आणि त्यावर जांभळ्या रंगांची फुले लागतात. एकाच वेळी संपूर्ण फुलोऱ्यावर फुले कधीच लागत नाहीत, खालच्या बाजूने फुले लागायला सुरवात होते आणि अर्ध्या पर्यंत सुरवातीला फुले लागतात.

ती फुले येउन गेली की मग पुढच्या उरलेल्या भागावर फुले लागतात, यामळे प्रजननाच्या प्रक्रियेमध्ये मदत होते. एकत्रित पाहिल्यानंतर एक संपूर्ण तुरा किंवा फुलोरा म्हणजेच एक फुल असल्याचा भास होतो, परंतु निरीक्षणपूर्वक पाहिल्यास छोटी छोटी फुले अगदी स्पष्ट आणि दाटी-वाटीने फुलोऱ्यावर लागलेली आढळतात. प्रत्येक फुलामध्ये ५ पाकळ्या असतात, त्यातली प्रत्येक पाकळी साधारणपणे १-२ मिमी लांबीची असते, रंग चमकणारा जांभळा (lovendor) असतो. फुलाच्या मधोमध पाच पुंकेसर आणि एका स्रिकेसराची रचना असते. पुंकेसर आणि स्रिकेसर हे साधारणपणे अर्ध्या सेमी. लांबीचे असतात, यांचा रंग देखील फिक्कट जांभळाच (lovendor), पण एक विशेष गोष्ट म्हणजे पुंकेसारावर जांभळ्या रंगाचे मुलायम केस असतात, त्यामुळे आधीच फुलांची दाटी आणि त्यात हे केस त्यामुळे फुलांची दाटी आणखी वाढते पर्यायाने फुलोर्याला झुबक्यांचे स्वरूप प्राप्त होते, प्रत्येक फुल हे दुसऱ्या फुलाशी स्पर्धा करताना दिसते. अशी लाखो-करोडो मंजिरीची फुले माळरानावर एकाच वेळी फुलतात, संपूर्ण माळरान जांभळ्या रंगाचे दिसू लागते.


पुंकेसर एकदा परिपक्व झाले की त्यांच्या टोकावर (परागकोशावर) पांढऱ्या रंगाचा थर जमा होतो, हा थर असतो परागकणांचा. आता पुढील प्रक्रिया निसर्गाच्या मदतीने पार पडते. एव्हाना पाऊन थोडा कमी होऊन उन आणि मंद वार्याच्या झुळुका सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यातून वाहायला सुरवात झालेली असते.

हा वारा फुलांच्या दाट केसांमधून वाहताना पुंकेसर हलतात आणि काही परागकण अलगत श्रीकेसरावर जाउन पडतात. या कामात वरुणराजादेखील आपली भूमिका बजावत असतो, पावसाचे थेंब जेव्हा फुलोऱ्यावर पडतात त्या माऱ्यामुळे परागकण उडून दुसऱ्या फुलांवर पडतात. पावसाचे प्रमाण अधिक असल्यास  वाहत्या पाण्यात हे परागकण प्रवास करतात, वाटेत मिळेल त्या झाडाला अडतात त्यातले काही बरोबर फुलांना जाऊन योग्य ठिकाणी चिकटतात तर काही योग्य जागा न मिळाल्याने मरून जातात. या व्यतिरिक्त निसर्गाने आणखी एक केलेली सोय म्हणजे फुलपाखरे आणि मधमाशा. मंजिरीची फुले आकर्षक आणि सुगंधी असल्याने यावर फुलपाखरे मोठ्या प्रमाणावर भेटी देण्यासाठी येतात, मधमाश्यांना देखील पाणी आणि मकरंद एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असल्याने त्याही मोठ्या प्रमाणावर मंजिरीला भेटी देतात आणि परागीभवनाची प्रक्रिया सोपी करतात. एक छोटंस काम पण निसर्ग किती वेग-वेगळ्या प्रकार करवून घेतो ना! निसर्गाची किमया बाकी काय!

पुढे बीजांड आणि परागकणांचा संयोग झाल्यानंतर बिया तयार होतात. बिया आकाराने लहान, काळ्या किंवा तपकिरी रंगाच्या व गोलाकार असतात. एव्हाना पाऊस पूर्णपणे थांबलेला असतो, डबक्यांमधले पाणी बऱ्यापैकी आटलेले असते. या बिया जमिनीवर पडतात, पुढील वर्षी पावसावर नव्याने पिक पुन्हा रुजतं आणि सर्वांच्या मनावर भुरळ घालायला तयार होतं.

जांभळी मंजिरीची झाडं ही सुगंधी द्रव्याने परिपूर्ण असतात त्यामुळे यापासून वेग-वेगळी तेलं (Essential Oils) काढली जातात. जांभळी मंजिरीला शास्रीय भाषेत Pogostemon deccanensis Panigrahi अशा नावाने ओळखतात तर ही फुले Lamiaceae या कुलामध्ये मोडतात.शास्रीय नावामध्ये deccanensis असा शब्दोच्चार आढळतो तो deccan या शब्दाशी निगडीत आहे. deccan म्हणजे सह्याद्रीच्या पर्वत रांगा आणि त्यावरील पाठरांचा भूभाग. मंजिरी याच भूभागावर मोठ्या प्रमाणावर आढळते आणि म्हणून या शब्दाचा सूचक अर्थाने उल्लेख शास्रीय नावात दिसतो.

Plant Profile:

Botanical Name: Pogostemon deccanensis Panigrahi
Synonyms: Eusteralis deccanensis
Common (English) Name: Not Available
Marathi Name: Jambhali Manjiri (जांभळी मंजिरी)
Family: Lamiaceae
Habit: Herb
Habitat: Grasslands on hilltop
Flower Colour: Violet / Lavender
Leaves: Rosate
Smell: Fragrant
Abundance: Common
Locality: Naneghat, Junnar, Rural Pune, MH

Date Captured: 27-Sep-14