Sunday 16 July 2017

Flowers: Spreading Caper | Pachunda (पाचुंदा) | Capparis divaricata Lam.

पावसाळ्याच्या सुरवातीला हळू हळू धरतीचा रंग बदलत जातो, लाल भुरकी माती आपल्या नकळत गवतामुळे कधी हिरवी गार होते ते कळत नाही. या पंधरा दिवसात बऱ्याच घडामोडी घडत असतात. फुलपाखरांचे सुरवंट हिरव्या गवतांवर आणि छोट्या झुडपांवर ताव मारताना दिसायला लागतात, काही फुलपाखरं आजूबाजूला बागडायला लागतात, पक्षांची घरटी बांधून होत आलेली असतात, ठिकठिकाणी मुंग्यांची लगबग सुरु असते, संपूर्ण सजीव सृष्टीला एक नवचैतन्य मिळालेलं असतं. प्रत्येकजण पावसामुळे होणाऱ्या गैरसोयीसाठी तयारीला लागलेला असतो. पावसाळ्याची सुरवात म्हणजे नवनव्या वनस्पतींचा रुजण्याची योग्य वेळ. पण रुजण्यासाठी लागणाऱ्या बिया येणार कुठून आणि त्यांची पाखरण होणार कशी? वृक्षांचा फुलण्याचा काळ म्हणजे उन्हाळा. पुढे पावसाच्या तोंडावर वृक्षांवर लागलेली फळं बऱ्यापैकी पिकून लाल, पिवळी नारंगी वैगेरे झालेली असतात. ही फळ उन्हाच्या तडाख्याने आणि कधी कधी पावसाच्या आणि वाऱ्याच्या माऱ्याने तुटून खाली पडतात. कधी पावसाच्या पाण्यासोबत तर कधी वाऱ्यावर स्वार होऊन इकडे तिकडे पसरतात आणि रुजतात.

पाचुंदा हे असंच एक झुडूपवजा छोटं झाड! पावसाळ्याच्या तोंडावर फळं पिकायला लागतात, काही दिवसात अगदी लालबुंद होतात आणि फुटतात. एव्हाना एक दोन पाऊस पडून गेल्याने जमिनीत बऱ्यापैकी ओलावा आलेला असतो. अशात फुटलेल्या फळांतील बिया खाली पडतात आणि दोन चार दिवसांतच रुजतात देखील.

पाचुंदा हे आपलं भारतीय झुडूप आहे, कमी पाण्याची कुरकुर न करता सहज निभावून नेणार! खरं तर वृक्षलागवडींसाठी अशा झाडांचा विचार होणं गरजेचं आहे. याच्या बिया गोळा करून पावसाआधी योग्य ठिकाणी टाकल्या तरी त्या लगेच रुजतात आणि कमी पाण्यात किंवा पाण्याविना वर्षभर तग धरून राहतात, शिवाय देशी झाड असल्याने इतर प्राणी व पक्षांना यांच्या वाढण्याचा काही त्रास होत नाही. उलट पक्षी, प्राणी, कीटक या वृक्षाचा आसरा घेतात.

असो, पाचुंदा हा साधारणपणे  १० ते १५ फूट उंचीपर्यंत वाढतो, तर कधीकधी तो जेमतेम पाच ते सहा फुटांपर्यंतच वाढतो. पाचुंद्याची वाढ ही अतिशय संथ गतीने होते. झुडूप असल्यास अगदी जमिनीपासून फांद्या लागलेल्या दिसतात पण तेच जर वृक्ष असेल तर साधारण पाच-सात फुटांच्या वरती फांद्यांचा विस्तार पाहायला मिळतो. फांद्यांची रचना खूप गुंतागुंतीची असते, म्हणजे इतकी की झाडाच्या विस्तारापलीकडे कुणी उभं असेल तर ते देखील दिसणार नाही.  पाचुंद्याचं खोड मोठं विशेष, याचं बाहेरचं आवरण खूप खरबरीत असते. सालीवर चिरा गेल्यासारख्या त्या भासतात आणि त्यामुळे साल खरबरीत लागते. या वृक्षाची पाने साधारणपणे २ ते ५ सेमी लांबीची आणि १.५ ते २ सेमी रुंदीची असतात. पानांचा आकार मधल्या भागात रुंद आणि मग दोन्ही टोकांकडे तो निमुळता होत जाताना दिसतो. पानांचा रंग बहुधा गर्द किंवा काळपट हिरवा असतो. देठ एखादं सेमीचा असेल, आणि पानाच्या कडा एकसंध असतात. पानांचा अग्रभाग टोकदार असतो, अगदी भाल्याचं टोक शोभावं असं. पाचुंद्याचं आणखी एक वैशिष्ठ म्हणजे याच्या संबंध फांद्यांवर काटे असतात. फांद्यांच्या टोकाकडच्या भागातील काटे बहुधा सरळ, कडक, पांढऱ्या किंवा पिवळसर रंगाचे आणि महत्वाचं म्हणजे अतिशय तीक्ष्ण असतात. याउलट फांद्यांच्या बाकी भागातील काटे आकाराने लहान आणि हुकाप्रमाणे उलटे फिरलेले असतात. हे देखील तीक्ष्ण, लालसर किंवा तपकिरी रंगाचे असतात. झाडावर असलेले काटे महत्वाची म्हणजेच संरक्षणाची जबाबदारी पार पडतात. आधी सांगितल्याप्रमाणे पाचुंदा कमी पाण्यात सुद्धा वाढणारा वृक्ष आहे. पर्यायाने पानांची संख्या, आकार, खोडातील विविधता या सर्व गोष्टी पाण्याच्या असणाऱ्या अभावाशी दोन हात करणाऱ्या असतात. काही काळासाठी पाणी नाही मिळालं तरी झाडाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये साठवलेलं पाणी अगदी काटकसरीने वापरलं जातं. पानं प्रकाशसंश्लेषणाची म्हणजेच अन्न तयार करण्याची मुख्य जबाबदारी बजावतात म्हणून त्यांना संरक्षण हवं आणि हीच महत्वाची जबाबदारी काटे पार पडतात. यानंतर जेव्हा फुलं लागतात त्यांचही संरक्षण हे काटे करतात. माळरानांवर भटकी जनावरं फिरत असतात, पण बहुधा पाचुंद्याची पानं खाताना जनावरं दिसत नाहीत ती या काट्यांच्या भीतीनेच.

फेब्रुवारी ते मार्च दरम्यान, म्हणजेच भर उन्हाळ्यात पाचुंदा फुलू लागतो, पाहता पाहता संपूर्ण वृक्षावर आणि झुडपावर फुलं फुलतात. एरवी काटेरी वाटणारा पाचुंदा आकर्षक आणि टपोऱ्या फुलांमुळे आता भलताच लोभसवाणा वाटू लागतो. ही फुलं दीड ते अडीच सेमी लांबीच्या देठांवर लागतात. फुलांचा व्यास ४-६ सेमी असतो, पाकळ्या फिक्कट पिवळ्या रंगाच्या किंवा काहीशा हिरवट रंगाच्या असतात. पाकळ्यांच्या खाली हिरव्या किंवा फिक्कट पिवळ्या रंगाची संरक्षण दले असतात, या दलांची खालची बाजू मुलायम केसांनी भरलेली असते. फुलांच्या मधोमध स्रिकेसर आणि पुंकेसरांची जोडणी असते, स्रिकेसर एक तर पुंकेसर खूप सारे असतात. सुरवातीला स्रिकेसराचा दांडा पिवळ्या किंवा हिरवट पिवळ्या रंगांचा असतो, पण जस-जसं फुल परिपक्व होत जात तसा हा दांडा केसरी रंगाचा होत जातो. केसरी रंग खालच्या बाजूने टोकाकडे वाढत जातो. फुल परिपक्व झालं की पुंकेसराची खालची बाजू देखील केसरी रंगाची होऊ लागते. या आकर्षक रंगाने फुलाचा मध्यभाग केसरी आणि उरलेला भाग फीक्कट पिवळा किंवा हिरवट पिवळा दिसतो. या रंगसंगतीमुळे फुलं खूप आकर्षक दिसू लागतात.

या रंगांना भुलून कीटक विशेषतः मुंगळे, पक्षी, फुलपाखरं वैगेरे मकरंद गोळा करण्यासाठी फुलांना भेटी देतात. या प्रक्रियेतून परागकणांची देवाण-घेवाण होते आणि फळधारणा होते. सुरवातीला फळे आकाराने लहान म्हणजे एखादं सेमी व्यासाची असतात, दांडा आणि फळ एकत्र पाहिलं तर मारूतिरायांच्या गदेची प्रतिकृती वाटावी अशी भासतात. फळांवर उभ्या तीन-पाच रेषा असतात. पुढे फळांचा आकार साधारणपणे पेरूच्या आकाराचा होतो. फळे गोल असून पिकल्यावर केशरी किंवा लालबुंद होतात. मुंगळे फळांवरील रेषांच्या जागी हळूहळू चावून चावून फळं फोडण्यास मदत करतात. एकदा का फळं फिटली की आतमधील गर आणि त्यातील बिया बाहेर पडतात आणि रुजण्यासाठी तयार असतात. फळांमधील गर पिवळसर पांढऱ्या रंगाचा असून काहीसा चिकट असतो.


बिया अर्धा ते एक सेमी व्यासाच्या असून साल काढल्यानंतर मानवी गर्भाशयाच्या रचनेशी साम्य असणाऱ्या असतात. बीयांचं बाह्य आवरण चंदेरी असतं. वर सांगितल्याप्रमाणे बिया योग्य वातावरण मिळाल्यास आठवड्यात रुजतात.

पाचुंद्याला इंग्रजीमध्ये स्प्रेडींग कॅपर (Spreading Caper) असं नाव आहे. शास्रिय भाषेत याला Capparis divaricata अशा नावाने ओळखतात. पाचुंद्याचा समावेश Capparaceae (कॅपेरॅसी) या कुळामध्ये झाला आहे. या कुळातील सर्वच वनस्पतींची फुले पाचुंद्यासारखी सुंदर असतात, काही यापेक्षाही सुंदर आहेत. पाचुंदा हा वृक्षलागवडीच्या कार्यक्रमांत महत्वाचा ठरू शकतो. बिया अगदी सहज रुजतात, रोपं कमी पाण्यात सुद्धा तग धरून राहतात आणि वाढतात. शेवटी स्थानिक वनस्पती जगणं हे निसर्गाच्या दृष्टीने महत्वाचं आहे.

Plant Profile:

Botanical Name: Capparis divaricata Lam.
Synonyms: No Synonyms
Common Name: Spreading Caper
Marathi Name: पाचुंदा
Family: Capparaceae
Habit: Tree or Shrub
Habitat: Deciduous or Scrub forest on slopes, and planes (शुष्क जंगल आणि डोंगरउतारावर, माळराने)
Flower Colour: Greenish yellow (हिरवट पिवळा)
Leaves: Simple, 3-6 cm long, elliptic or linear.
Smell: Fragrant
Abundance: Common
Locality: Dattagad, Dighi, Pune
Flowering Season: Feb-Mar
Date Captured: 25-Apr-2017

-          राजकुमार डोंगरे