Saturday 2 December 2017

Flowers: Woolly-winged Milkwort | Gulpankhi – गुलपंखी | Polygala erioptera R.Br.

तासभर प्रयत्न करून देखील फोटो काही मिळेना. हवेचा जोर काहीसा जास्तच होता आज,  त्यात ती फूटभर उंचीची लहान रोपं आणि त्यावर लागलेली चिमुकली फुलं. हो चिमुकलीच, अगदी नखापेक्षाही लहान. वर वर पाहता फुलं विशेष काही आकर्षक वाटली नाही पण रंग मात्र डोळ्यांत भरणारा. प्रेमात पडायला भाग पाडणारा. काहीतरी वेगळं-नवीन दिसलं की पावलं पुढे जातंच नाहीत. थांबावं वाटतं, कसली फुलं आहेत ही हे कळल्याशिवाय चैन पडत नाही. थांबलो मग, फुलं जवळून निरखून पहिली. जवळून पाहिल्यावर फुलांचं सौंदर्य जाणवलं. नकळत डोळ्यांतून हृदयात उतरली.

निसर्ग मोठा सच्चा आणि कल्पक रंगकर्मी आहे. या लहानग्या फुलांच्या पाकळ्यांत इतके सुंदर रंग ओतले होते की जिथे लहान म्हणून दुर्लक्ष होण्यासारखी फुलंच या सुंदर रंगांमुळे प्रत्येकाला आकर्षित करत होती. अशी आकर्षक फुलं क्षणभर थांबायला लावतात, खिळवून ठेवतात. मी एक फुल बोटाच्या चिमटीत पकडलं आणि ओझरती नजर फिरवली. प्रथमदर्शनी ही "संजीवनी"च्या फुलांची कुळभगिनी असावी असं वाटलं. घरी येऊन ओळख पटवली आणि अधिक माहिती घेतली. जितकं सुंदर रूप तितकंच सुंदर नाव, शोभणारं, गुलपंखी! आधी विचार केल्याप्रमाणे ही 'संजीवनी'ची कुळभगिनीच होती.

सह्याद्रीच्या अवती-भवती असणाऱ्या माळरानांवरील नेहमीची आणि वर्षभर फुलणारी गुलपंखी विशेष कुणाच्या ओळखीची नाही. अर्थात तिचं अस्तित्व माणसाने लक्षात घ्यावं असं विशेष कदाचित नसेलही तिच्यात, पण नकळत ती मानवी फायद्याचीच आहे, विशेषकरून शेतकऱ्यांच्या! पावसाळ्यानंतर माळरानांवर हिरवं लुसलुशीत गवत उगवतं. त्यावर चराटीला गुरं सोडली जातात. गाई, म्हशी शेळ्या वैगेरे दिवसभर मनोसोक्त चरून संध्याकाळी घरी परततात. पावसाळ्यात मुबलक मिळालेला हा चारा वाढत्या दुधासाठी कारणीभूत ठरतो, हे जरी खरं असलं तरी नुसताच हिरवा चारा कारणीभूत ठरतो असं ढोबळमानाने म्हणून कसं चालेल? संजीवनी किंवा गुलपंखी सारख्या वनस्पतींचे गुणधर्म यासाठी महत्वाचे ठरतात. दुधवाढीसाठी लागणारं जैवरासयनिक सत्व या वनस्पतींना निसर्गाकडून लाभलं आहे. ही गुरं चराटीला असताना या वनस्पती खातात आणि दुधामध्ये चांगली वाढ होते. यामुळे शेतकरी मित्रांचा आर्थिक फायदा होतो.

चिमटीत पकडलेलं गुलपंखीचं फुल सोडलं आणि टिपणं घेण्यासाठी सज्ज झालो. माळावरून चालताना गुडघ्यापर्यंत लागावी एवढी उंची. फूट - दिड फुटांची. फांद्या अगदी जमिनीपासून लागलेल्या होत्या. फांद्यांची संख्या भरपूर, फांद्या कडक आणि सरळ आकाशाच्या दिशेने वाढणाऱ्या अशा. पानांची जोडणी एकाड-एक (alternate) पद्धतीची, पाकळीच्या (Elliptic) किंवा काहीशी पात्यासारख्या (Linear) आकाराची. लांबी साधारणपणे ३ सेमी पर्यंत. पानांच्या कडा (Margin) एकसंध आणि पाने टोकाकडे टोकदार होत गेलेली. रंग भुरका-हिरवा, पानांची मागची बाजू तर आणखी भुरकी आणि मुलायम केसानी आच्छादलेली. गुलपंखीमधे पानांना फांदीशी जोडणारा दांडा (Leaf Stalk) नसतो, शास्रिय भाषेत अशा पानांना Sessile Leaf असं म्हणतात.




पान फांदीवर ज्या ठिकाणी जोडलं गेलं आहे त्या अक्षातून (Axis) फुलोरा निघतो, साधारण दीड सेमी लांबीचा. ६-८ फुलं गर्दीने या फुलोऱ्यावर लागलेली असतात. फुलोऱ्याच्या खालच्या भागातील फुलं आधी उमलतात आणि टोकाकडे ती क्रमाक्रमाने उमलत जातात. असं क्रमाक्रमाने फुलल्यामुळे फळधारणेची शक्यता वाढते. गुलपंखीच्या फुलांचा आकार अगदीच लहान, फार फार तर ६-८ मीमीचा. फुलामध्ये संरक्षण दलांची (Calyx) संख्या पाच, त्यातली दोन वरच्या बाजूने लागतात, कान टवकारल्यासारखी आणि काहीशी वक्राकार. निळसर-जांभळा किंवा लव्हेंडर रंग आणि मधोमध उभी हिरव्या रंगाची जाडशी आणि ठळक हिरवी रेषा. या दोन रंगांचं वरच्या संरक्षण दलांवरील रेषांचं नक्षीकाम डोळ्यांत भरणारं असतं. ही दोन्ही संरक्षण दलं मागच्या बाजूने पांढुरक्या मुलायम केसांनी भरलेली असतात. खालच्या बाजूने तीन संरक्षण दलं लागतात. ती आकाराने वरच्या दलांच्या तुलनेत लहान आणि मुलायम केसांनी भरलेली असतात. संरक्षण दलांच्या आत तीन पाकळ्याची रचना पाहायला मिळते. त्यातल्या वरच्या बाजूने दोन तर खालच्या बाजूने एक पाकळी असते. सर्व पाकळ्या निळसर जांभळ्या किंवा लव्हेंडर रंगाच्या असतात. यातील वरच्या दोन पाकळ्या आकाराने लहान म्हणजे ३-४ मीमी लांबीच्या असतात. यांचा आकार उलट्या अंड्यासारखा (Obovate) असतो आणि कुक्षीच्या (Ovary) जवळ त्या एकमेकांना जोडलेलया असतात. या दोन पाकळ्यांच्या खालोखाल सोंडेसारखी, अर्धवक्राकार आणि वरच्या बाजूला तोंड असणारी पाकळी लागते. संपूर्ण फुल एकत्र पाहिल्यावर एखाद्या पक्षाची छोटी प्रतिकृती असल्याचा भास ही संबंध रचना निर्माण करते. या पाकळीच्या टोकाकडचा भाग मुलायम केसांमध्ये रूपांतरित झालेला असतो. लक्षपूर्वक पाहिल्यास समजतं की या केसांचा बहुधा गुंता झालेला असतो. अर्थात हा गुंता उगाचच नाही! तो प्रजननाच्या (Fertilization) प्रक्रियेसाठी मदत करणारा आहे. खालच्या बाजूने लागलेल्या याच सोंडेमध्ये स्रिकेसर आणि पुंकेसर राहतात. फुलं परिपक्व झाली की त्यांचा आकर्षक रंग आणि वेगळी रचना पाहून जशी माणसांना भुरळ पडते अगदी तशीच भुरळ कीटकांना, फुलपाखरांना आणि पक्षांना देखील पडते. तोवर परागकण तयार होऊन पुंकेसरातून बाहेर आलेले असतात, नवनिर्मितीसाठी सज्ज असतात! कीटकांच्या व फुलपाखरांच्या फुलांसोबत भेटी-गाठी सुरु होतात. या फुलावरून त्या फुलावर बागडणं होतं. सोंडेतील मकरंद काढण्यासाठी जीवाचा आटापिटा होतो. या सर्व गोंधळात नकळत परागकण (Pollen Grains) कीटकांच्या सोंडेला, पायाला किंवा अंगावर चिकटतात आणि हेच कीटक जेव्हा दुसऱ्या फुलांना भेट देतात त्यावेळी सोंडेच्या टोकाला असलेल्या केसांच्या गुंत्यात पाय, पंख इत्यादी अडकतात व नकळत घासले जातात. याचीच परिणीती म्हणून परागकण खाली स्रिकेसराच्या तोंडावर पडतात. आणि फलनाची (Feritilization) प्रक्रिया सुरु होते.

गुलपंखीची फळं अगदी लहान, ४-५ मीमी लांबीची. फळाच्या मधोमध अक्ष (Axis) असतो आणि त्या अक्षाभोवती दोन्ही बाजूला चौकोनाकृती पापुद्र्यासारखी रचना असते. अक्षाच्या दोन्ही बाजूला एक-एक असे फळाचे दोन भाग पडतात, यातील प्रत्येक भागात साधारण ४ मीमी लांबीची एक बी भरते. बीचा रंग काळा असून त्यावर मुलायम केस असतात,आकार लंबगोलार असतो. फळामध्ये बिया जिथं जोडलेल्या असतात तिथे पांढऱ्या रंगाचा पदर पाहायला मिळतो, बीचा १०% भाग याने वेढलेला असतो. याला शास्त्रीय भाषेत ऐरिल (Aril) म्हणतात. बियांच्या प्रसारामध्ये याचं खूप महत्व आहे कारण हा पदर खाण्यायोग्य असतो. मुंग्या आणि इतर कीटक या पदरासाठी संपूर्ण बी ओढून घेऊन जातात. कधी या बिया त्यांच्या वारुळांपर्यंत पोहोचतात तर कधी मधेच वाटेत पडून जातात.गुलपंखीचा मात्र यामुळे स्वार्थ साधला जातो, बीजप्रसाराचा आणि नवनिर्मितीचा!

मराठी नाव ‘गुलपंखी’ हे फुलांच्या रचनेविषयी सांगणारं आहे. फुलांचा रंग लव्हेंडर किंवा काहीसा गुलाबी असतो आणि वरच्या बाजूने लागलेल्या संरक्षण दलांचा आकार उडत्या पक्षाच्या पंखांसारखा भासतो म्हणून 'गुलपंखी' हे सूचक नाव आलेलं असावं. गुलपंखीला इंग्रजीमध्ये Woolly-winged Milkwort या नावाने ओळखतात. या वनस्पती गाय, शेळी वैगेरे दूध देणाऱ्या पाळीव प्राण्यांच्या खाण्यात आल्यास त्यांच्या दूध वाढीमध्ये फायदा होतो आणि म्हणून "Milkwort" या शब्दाचा उल्लेख इंग्रजी नावामध्ये दिसून येतो. शास्रिय भाषेत गुलपंखीला Polygala erioptera R.Br.असं म्हणतात. यातील Polygala शब्द ग्रीक भाषेतून आला असून त्याचाही संबंध गुरांच्या दुधवाढीशी आहे. erioptera शब्द पाकळ्यांच्या संरक्षण दलांवरील केसांसंदर्भातील आहे. गुलपंखीच समावेश "Polygalaceae" या कुळामध्ये झाला आहे.

माळरानांवरील या चिमुकल्या सौंदर्याची मजा लुटणं खरंच अभूतपूर्व आहे, प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय त्याची प्रचिती येणं निव्वळ अशक्य आहे. चला तर मग सौंदर्यदर्शनाला!


Plant Profile:

Botanical Name: Polygala erioptera R.Br.
Synonyms: P. Arabica, P. leptorhiza, P. linearis, P. multibracteata, P. noucherensis, P. nubica, P. obtusata, P. oligantha, P. paniculata, P. paulayana, P. retusa, P. schimperi, P. serpyllifolia, P. tomentosa, P. triflora
Common Name: Woolley-winged Milkwort
Marathi Name: Gulpankhi (गुलपंखी)
Family: Polygalaceae
Habit: Herb
Habitat: Grasslands (डोंगरउतारावर, माळराने)
Flower Colour: Lavender, Purple to Pink  (लव्हेंडर किंवा गुलाबी)
Leaves: Simple, Linear / Elliptic, 1.5-3 cm long x 1 cm wide, Stipulate, sessile.
Smell: No smell
Abundance: Common
Locality: Dattagad (Dighi), Pune
Flowering Season: All Year
Date Captured: 26-Aug-2017

- रा.जा. डोंगरे

Sunday 12 November 2017

Flowers: Field Milkwort | Sanjivani – संजीवनी | Polygala arvensis Willd.

 दादा, ती पिवळी फुलं कसली रे? माझं लक्ष वेधून घेत अथर्वने प्रश्न केला. अथर्व आणि माझी ही पहिलीच भेट. दत्तगडला फिरताना माझं फुलांचे फोटो घेणं सुरु होतं आणि हा मागे येऊन उभा राहिलेला, कुतूहलानं माझ्याकडे पाहत. एकटाच होता. त्याची प्राथमिक चौकशी करून मी माझ्या चाललेल्या उद्योगाचा खुलासा केला, तसं त्याने आणखी प्रश्न विचारायला सुरवात केली. म्हणजे, हे फुल कोणतं? ते कोणतं? आणि तुला कसं माहीत? वैगेरे. अथर्व ८ वी इयत्तेत शिकणारा एक लहान मुलगा, पण प्रचंड उत्साही आणि कुतूहल असणारा वाटला. आत्याकडे पुण्याचे गणपती पाहायला आलेला आणि सहज फिरायला म्हणून दत्तगडावर आला होता आणि त्यात आमची भेट झाली. थोड्याच वेळात आमची गट्टी जमली आणि मग गप्पाही रंगल्या.

इकडचं तिकडचं बोलून झाल्यावर त्याचा फिरून पुन्हा तोच प्रश्न, ती पिवळी फुलं कसली ते सांगितलं नाहीस तू. उत्तरादाखल "संजीवनी" असं नाव सांगितलं मी. पुढचा प्रश्न, शेंगा येतात का याला? मी म्हणालो नाही, पापुद्रयासारखी फळं लागतात. काही वेळ शांतता, आणि मग अचानक त्याने निरोपाचं बोलून टेकडी उतरायला सुरवात केली. त्याला तसाच पाठमोरा पाहत मी त्याच्या कुतूहला बद्दल विचार करत बसलो. नक्की काय विचार करत हा उतरला असेल?


विचारांच्या तंद्रीतून बाहेर पडल्यावर मी पुन्हा लेन्स अड्जस्ट करून "संजीवनी"चे फोटो घेऊ लागलो. पानं, फुलं, फळं बिया असे विविध भाग न्याहाळत होतो. मनाप्रमाणे सगळ्या नोंदी झाल्या. अथर्वप्रमाणे मी ही विचारांच्या धुंदीत टेकडी उतरलो. खरंच संजीवनी किती लोकांना माहित असेल? मला किती माहित आहे? मनातून आलेल्या उत्तरातून कळलं, आपल्याला देखील संजीवनीबद्दल फारसं माहित नाही. वाचलंही नव्हतं आणि म्हणूनच अधिक वाचावं, जाणून घ्यावं असं वाटू लागलं. वाचलंही नंतर बऱ्यापैकी.

तर संजीवनी ही एक लहान वनस्पती, साधारणपणे १५-३० सेमी उंचीची. हीचं इंग्रजी नाव Field Milkwort असं आहे. सुरवातीलाच नाव सांगण्यामागे माझा एक मुख्य हेतू आहे. हे नाव शास्त्रीय नावाशी संबंधित आहे. संजीवनीचा समावेश "Polygala" या जातीमध्ये होतो, आणि हा शब्द ग्रीक भाषेतून आलेला आहे. या शब्दाचा अर्थ 'दुधात वाढ होणे' असा होतो. संजीवनी वनस्पती पाळीव प्राण्यांनी (गाय, शेळी वैगरे) खाल्ली की त्यांच्या दुधामध्ये वाढ होते आणि अप्रत्यक्ष फायदा होतो. तर, दुधात होणाऱ्या वाढीबद्दल सांगणारं Field Milkwort हे नाव इंग्रजी भाषेत आलं आहे. भारतात, विशेषकरून महाराष्ट्रात पावसाळ्यानंतर गायी व इतर गुरांना माळरानावर चरायला नेतात ते कदाचित यासाठीच. या अशा वनस्पती यांच्या तोंडी लागल्या की आपोआप दुधात वाढ होते आणि आपलाही स्वार्थ साधला जातो. संजीवनीचं आणखी एक इंग्रजी नाव आहे, ते म्हणजे 'Snakeroot'. हिच्या मुळांना विशिष्ठ सुगंध आहे. या मुळ्यांच्या सुगंधाला भुलून साप जवळ येतात असा एक समज आदिवासी भागांत आहे आणि त्याची दखल घेणारं हे नाव असावं. अशी अर्थपूर्ण नाव ज्यांनी दिली त्यांचं खरंच कौतुक.


असो, तर संजीवनी एक लहान वनस्पती, जमिनीपासून ४-६ फांद्या निघतात, हिरव्या रंगाच्या, त्यावर नारंगी रंगाची छटा असते कधीकधी. उंची कमी असल्याने जमिनीपासून पानं लागायला सुरवात होते. पानांच्या आकारामध्ये विविधता पाहायला मिळते. कधी उलट्या अंड्यासारखी (Obovate), कधी गोलाकार (Circlular), कधी उलट्या कंदिलासारखी (Inverted Lance Shaped) तर कधी पाकळीसारखी (Elliptic) असतात. पानांची लांबी १.५ - ३ सेमी असून रुंदी १ सेमी पर्यंत असते. जसजसा माळावरील मातीचा प्रकार बदलत जातो तशी झाडाची उंची आणि पानांचे प्रकार बदलताना दिसतात. पानं एकाड-एक (alternate) पद्धतीने फांद्यांवर जोडलेली असतात, पानांची कड (Margin) एकसंध असते, पानांचा देठ खूप लहान म्हणजे साधारण १ मिमी पर्यंत असतो, काही पानांत तो अगदीच दिसेनासा असतो (Close to sessile). पान फांदीला जिथे जोडलेलं असतं त्या अक्षात (Axis) फुलांचे गुच्छ लागतात. प्रत्येक गुच्छ साधारणपणे १ सेमी लांबीचा असतो, त्यात ४-८ फुलं लागतात. सगळी फुलं एकाच वेळी फुलत नाहीत ती शक्यतो क्रमाक्रमाने फुलतात. फुलं अशी क्रमाक्रमाने फुलल्यामुळे त्यांच्यातील फळधारणेची शक्यता अधिक वाढते.

फुलांचा रंग पिवळा. वरच्या बाजूने दोन पाकळ्या आणि खालच्या बाजूला एक अशी रचना असते. वरच्या पाकळ्यांच्या बाहेरून हिरव्या रंगाचे आणि काहीसे केसाळ आच्छादन असते, हे आच्छादन म्हणजे पाकळ्याचं संरक्षण दल (Calyx) होय. प्रथमदर्शनी फुलं शेंगवर्गीय वनस्पतींशी साधर्म्य असणाऱ्या वाटतात पण निरीक्षणपूर्वक पाहिल्यास दोन्हींमधील फरक स्पष्ट कळतो. वरच्या बाजूला असलेल्या दोन पाकळ्या एकमेकांवर आच्छादलेलया (Overlap) असतात. त्यामुळे त्या शेंगवर्गीय वनस्पतींशी साधर्म्य असणाऱ्या भासतात. या दोन्ही पाकळ्या कुक्षी (Ovary) च्या जवळ एकमेकांना जोडलेल्या असतात. पाकळ्यांच्या आतल्या बाजूने आणि मध्यभागी तपकिरी रंगाच्या रेषा असतात. तिसरी पाकळी फुलाच्या खालच्या बाजूने वाढते. ती सोंडेसारखी किंवा हुकासारखी भासते. टोकाकडे या पाकळीचं मुलायम केसांमध्ये रूपांतर होतं, हे केस टोकाकडे जाताना नागमोडी वळण घेतात आणि त्यामुळे कधीकधी थोडा गुंता होतो. अशी रचना या जातीतील जवळ जवळ सर्वच फुलांमध्ये पाहायला मिळते. पाकळी मधील हा विशेष बदल निसर्गाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे, कसा? ते आपण पुढे जाणून घेणार आहोतच.फुलातील स्रिकेसर (Gynoecium) आणि पुंकेसर (Androecium) हे याच सोंडेसारख्या भासणाऱ्या पाकळीत असतात, ते सोंडेतून क्वचितच बाहेर येतात, बहुधा सोंडेचा तोंडापर्यंतच त्यांची वाढ होते आणि पुढे मग पाकळीच्या टोकाचा म्हणजेच केसांचा भाग असतो.


फुलं परिपक्व झाली की, सोंडेतील पुंकेसरातून परागकण (Pollen grains) बाहेर पडतात. फुलांना विशीष्ठ सुगंध नसला तरी तिसरी पाकळी जी सोंडेसारखी भासते आणि टोकाकडे आकर्षित केसांमध्ये रूपांतरित होते, त्यामुळे परागीभवणास कारणीभूत असणारे किडे याकडे आकर्षित होतात. सोंडेमध्ये घुसून मकरंद गोळा करता करता वेगवेगळ्या फुलांना भेटी देतात. एका फुलावरून दुसऱ्या फुलावर उठणं बसणं होतं, सोंडेच्या टोकाकडच्या केसांमुळे किड्यांच्या, फुलपाखरांच्या किंवा मधमाशांच्या अंगावर लागलेले परागकण अलगद पुसून घेतले जातात आणि स्रिकेसराच्या तोंडात टाकले जातात. पुढे नैसर्गिकरित्या फलनाची प्रक्रिया पार पडून फळधारणा होते.

फुलांची संरक्षण दलं आता फळांची संरक्षण दलं (Persistent Calyx) म्हणून काम पाहू लागतात. याच्या आत ५-६ मिमी लांबी आणि रुंदी असणारी फळ लागतात. फळांचा आकार काहीसा चौकोनी असतो. त्यामध्ये दोन बिया लागतात. फळं बाहेरून पाहिली की पापडी सारखी भासतात आणि वजनाने अतिशय हलकी असतात. फळ परिपक्व झाली की जमिनीवर गळून पडतात. वाऱ्याच्या साहाय्याने सर्वदूर पसरतात. प्रवासात कधी ही फुटतात तर इतर काही कारणाने फुटून त्यातून बियांची पेरण होते.

संजीवनीच्या बिया वैशिष्टपूर्ण आहेत. या फार फार तर २- ४ मिमी लांबीच्या, काळ्या रंगाच्या आणि त्यावर सोनेरी किंवा तांबूस रंगाच्या मुलायम केसांचं आच्छादन असणाऱ्या असतात. बिया फळामध्ये ज्या ठिकाणी जोडलेल्या असतात तिथून एक पांढरा पदर (Cover) बी वर आलेला असतो. याला शास्त्रीय भाषेत ऐरिल (Aril) म्हणतात. बियांच्या प्रसारामध्ये याचं खूप महत्व आहे कारण हा पदर खाण्यायोग्य असतो. मुंग्या आणि इतर कीटक या पदरासाठी संपूर्ण बी ओढून घेऊन जातात. कधी या बिया त्यांच्या वारुळांपर्यंत पोहोचतात तर कधी मधेच वाटेत पडून जातात. संजीवनी मात्र नवीन पिढीची सोय होतीय हे पाहून सुखावलेली असते. निसर्ग खूप अजब आहे, इथे प्रत्येक घटनेमागे कारण आहे, शास्रिय! ते समजून घेण्यातला आनंद फार वेगळा आहे.

वर सांगितल्याप्रमाणे संजीवनीला दोन इंग्रजी नाव आहेत, Field Milkwort आणि Snakeroot. शास्रिय भाषेत याला Polygala arvensis Willd. असं नाव आहे. या वनस्पतींचा समावेश Polygalaceae या कुळामध्ये होतो. या कुळातील काही झाडं बागेमध्ये सुशोभीकरणासाठी लावतात.

संजीवनी, तुझं निसर्गातील अस्तित्व इतर वनस्पतींमध्ये हरवलेलं वाटतं, पण तरीही ते महत्वाचंच आहे आणि आम्हाला नक्कीच त्याबद्दल तुझा आदर आहे!!!

Plant Profile:

Botanical Name: Polygala arvensis Willd.
Synonyms: Polygala angustifolia, Polygala brachystachya, Polygala chinensis, Polygala cyanolopha, Polygala kinii, Polygala linarifolia, Polygala monspeliaca, Polygala polyfolia, Polygala quinqueflora, Polygala senduaris, Polygala shimadai.
Common Name: Field Milkwort
Marathi Name: Sanjivani (संजीवनी)
Family: Polygalaceae
Habit: Herb
Habitat: Deciduous or Scrub forest on slopes, Grasslands (शुष्क जंगल आणि डोंगरउतारावर, माळराने)
Flower Colour: Yellow (पिवळा)
Leaves: Simple, Obovate / Circular / Inverted Lance Shaped / Elliptic, 1.5-3 cm long x 1 cm wide, Stipulate, Near to sessile.
Smell: No smell
Abundance: Common
Locality: Dattagad (Dighi), Pune
Flowering Season: Jul to Sep
Date Captured: 26-Aug-2017

-         

         - रा.जा. डोंगरे

Saturday 14 October 2017

Indian Tolypanthus | Pela Bandgul – पेला बांडगुळ | Tolypanthus lagenifer Tiegh.


माणसाच्या मनात काही झाडांबद्दल कमालीचा तिरस्कार किंवा कमालीची पूजनीयता पाहायला मिळते. वड, पिंपळ, उंबर अशा झाडांना धार्मिक महत्व आहे. याविरुद्ध गाजरगवत (काँग्रेस), बहुतांश वेली यांचा तिटकारा केला जातो. या वनस्पती उपद्रवी मानल्या गेल्या आहेत, शेतामध्ये गवत म्हणून वाढतात आणि यांना कितीही संपवायचा प्रयत्न करा, कुठूनतरी पुन्हा बी येतं आणि नव्याने जन्म घेतं, जोमाने फोपावतं. कदाचित या बिया आपल्याला सांगत असाव्यात, तुम्ही कितीही प्रयत्न करा आम्हाला संपवण्याचा, अगदी मुळापासून; पण आम्ही हरणार नाही. पुन्हा नव्याने जन्म घेऊ, आमचं अस्तित्व जपू.

अशाच एका वनस्पतीची भेट झाली, लोणावळा ते जांभिवळी गावच्या ट्रेक मध्ये. अर्थात ही फक्त भेट होती; ओळख नाही. कारण, मी ही फुलं पहिल्यांदाच पाहत होतो, म्हणून नुसतीच भेट, ओळख  नाही! लोणावळा ते जांभिवळी गावातील रस्ता दाट जंगलातून जातो. एका वळणापर्यंत राजमाची किल्ला आणि या गावाकडील रस्ता एकच. राजमाचीच्या जवळपास पोहोचल्यावर एक फाटा फुटतो, जांभिवळी गावाकडे जाणारा. आत्तापर्यंत बऱ्यापैकी रहदारी असणारा रस्ता आता अचानक एकाकी होऊन जातो. आजूबाजूला सह्याद्रीचं जंगल, आणि नानाविध पक्षांचे आवाज! मधेच जंगलातून जाणारा रस्ता भुयारातून बाहेर पडावा तसा माळरानावर निघतो आणि पुन्हा काही अंतरावर घनदाट वनराईत हरवून जातो.

आमचा ट्रेक भर पावसाळ्यात होता, जुलै महिन्यात. अर्ध्याहून अधिक वाट मागे टाकून आम्ही आता एका माळरानावर आलो होतो. समोरची पायवाट आता आम्हाला जंगलात घेऊन जाणार होती, असं दिसत होतं. पुन्हा चालायला सुरवात केली. जंगलात घुसणार तेच माझं लक्ष एका ट्रेकमेटने वेधून घेतलं. लाल टपोऱ्या फुलांकडे बोट करत त्याने मला खुणावलं. कुंकवासारखी लाल टपोरी फुलं, लिंबाच्या आकाराची. कसली ते काही कळायला मार्ग नाही. आजूबाजूला पाहिलं पण फक्त एकाच झाडावर ही फुलं दिसत होती, त्यातही फक्त एकाच फांदीला. नंतर बाजूलाच या फुलांची एक फांदी तोडून टाकलेली दिसली. नुकतीच कुणीतरी तोडली असावी असं वाटलं. मी जवळून निरीक्षण केलं. अंदाज बांधला, 'बांडगुळ' असावं कुठलं तरी. अर्थात हा फक्त अंदाज होता. निरीक्षणं नोंदवली, पावसामुळे जमेल तसे फोटो घेतले आणि निघालो पुढच्या प्रवासाला. रान तुडवत!

घरी आल्यावर नावाची शोधाशोध सुरु झाली आणि बांडगुळ असण्यावर शिक्कामोर्तब झाला. 'बांडगुळ' तसा उपहासाने वापरला जाणारा शब्द. कुण्या निरुपयोगी माणसाला हाक मारण्यासाठी हा शब्द वापरतात. हा शब्द जरी कानांवर पडला तरी चेहेऱ्यावरचे भाव बदलतात. पण, मी पाहिलेलं बांडगुळ मात्र प्रसन्न वाटायला लावणारं होतं. फुलं टपोरी आणि सुंदर. इतकी सुंदर की 'सुंदर' हा शब्द सुद्धा कमीच पडावा.

अभ्यासाअंती समजलं की ही फुलं 'पेला बांडगुळाची' होती. मराठी नावं फार समर्पक असतात याचं उदाहरण म्हणजे पेला बांडगुळ! फुलांचा गुच्छ एखाद्या पेल्यात, तळाशी मधोमध बसवावा तसा या फुलांचा सबंध आकार असतो आणि म्हणून मराठीतील हे नाव समर्पक वाटतं. अर्थात फुल कीतीही सुंदर असलं आणि छान वाटलं तरी हे बांडगुळसुद्धा परोपजीवीच (Parasitic). एखाद्या फांदीमध्ये आपली मुळं रोवायची, ती थेट अन्नवाहिन्यांमध्ये (Xylem & Phloem) टोचायची, त्यातून जीवनरस चोरायचा आणि आपलं पोटपाणी चालवायचं, असा यांचा उद्योग. बांडगुळाचे सर्वच प्रकार अशाच पद्दतीने इतर वनस्पतीचे शोषण करतात, आणि पर्यायाने त्यांच्यावर कुऱ्हाड चालवली जाते.

असो, तर पेला बांडगुळ तशी झुडूपवर्गीय वनस्पती, सह्याद्रीच्या घनदाट जंगलांत वाढणारी. एखाद्या झाडाच्या फांदीवर स्वतःचा चरितार्थ चालवणार हे झुडूप आहे. फांद्या टणक आणि राखाडी रंगाच्या असतात. त्यावर एकमेकांच्या विरुद्ध पद्धतीने पानांची जोडणी असते. पानांचा आकार बदामी. लांबी साधारणपणे ४-८ सेमी आणि रुंदी ३-६ सेमीची. नवीन लागलेली पानं काहीशी लालसर असतात नंतर हरितद्रव्यामुळे ती हिरवी होतात. पानांना स्पर्श केला तर ती थोडीशी मांसल भासतात. देठ फार-फार तर अर्ध्या सेमी पर्यंत असतो. टोकाकडे पानं निमुळती आणि टोकदार (Acute) होत जातात.

जूनच्या शेवटी आणि जुलै महिन्याच्या सुरवातीला सबंध फांदीवर लाल चुटुक फुलं लागतात. सुरवातीला फुलांचा रंग काहीसा हिरवट पिवळा असतो. पण जस जशी फुलं परिपक्व होत जातात तसा रंग लाल आणि नंतर तपकिरी होत जातो. पेला बांडगुळाच्या फुलांची रचना विशेष आहे. पाकळ्यांसारखा भासणारा पेला किंवा कपासारखं बाहेरील आवरण हे पाकळ्यांच नसून ब्रॅक्ट्सचं असतं. ब्रॅक्ट्स हा फुलांचाच एक भाग, संरक्षण दलांच्या खाली यांची रचना असते. पानांमध्ये रचनात्मक बदल होऊन यांची निर्मिती होते आणि यांचं मुख्य काम म्हणजे परागीभवनासाठी लागणाऱ्या किड्यांना आकर्षित करणे. म्हणून तर या पाकळ्यांसारख्या भासणाऱ्या ब्रॅक्टस इतक्या सुंदर असतात. या विशिष्ट रचनेमुळे फुलांचा व्यास ३-५ सेमीचा बनतो. टोकाकडे पेल्याचं पाच पाकळ्यासदृश्य भागांत विभाजन झालेलं दिसतं. पेल्याच्या आतमध्ये तळाशी साधारणपणे ५ फुलं लागतात, ४-६ सेमी लांबीची, नळीसारखी. फुलं परिपक्व होण्याआधी एखाद्या काठीवर गोल टोपी घातल्यासारखी भासतात.. परिपक्व झाली की काठीसारखी वाटणारी नळी लाल किंवा केशरी रंगाची दिसू लागते. वरचा टोपीसारखा भाग पाकळ्यांमध्ये बदलतो. पाकळ्यांचा रंग बहुधा गुलाबी असतो. त्यात पुंकेसर आणि स्त्रीकेसर असतात. प्रत्येक पाकळी २-३मीमी लांबीची असते.

फुले परिपक्व झाली की पावसाच्या थेंबांनी किंवा कीटकांच्या मदतीने प्रजननाची प्रक्रिया पार पडते. एका फुलापासून एक फळ तयार होते. पक्षी ही फळं आवडीने खातात. झाडांच्या खोडांत विष्टेवाटे बियांची पाखरण होते. यातील काही बियांना योग्य वातावरण मिळतं आणि त्या झाडाच्या फांद्यांवर रुजतात. मुळ्या हळूहळू झाडाच्या फांदीत घुसून अन्नद्रव्य वाहून नेणाऱ्या नलीकांमध्ये शिरकाव करतात. एव्हाना इकडे फांद्या आणि पानांचा पसारा तयार झालेला असतो. थोडक्यांत नवीन जीवनाची सुरवात झालेली असते.

खरं पाहता बांडगुळवर्गीय वनस्पती पूर्णपणे परावलंबी नाहीत. त्यांनाही हिरवी पानं असतातच की, ही पानं अन्न तयार करण्यात मदत करतात. परंतु तेवढं अन्न पुरेसं नसतं मग उरलेल्या गरजा ते त्या झाडाकडून पूर्ण करवून घेतात ज्यावर यांचा संसार थाटलेला असतो. अर्थात यामुळे मुख्य झाडाचं काही प्रमाणात नक्कीच नुकसान होतं. पण निसर्ग आहे, इथे प्रत्येकाची योग्य ती सोय होतेच.

पेला बांडगुळ हे Loranthaceae या कुळात मोडतं, विशेष म्हणजे या कुळातील बहुतांश वनस्पती अशाच अर्ध-परावलंबी आहेत. याचं इंग्रजी नाव Indian Topypanthus असं आहे. बांडगुळाचा हा प्रकार सह्यद्रीच्या घनदाट जंगलांत पाहायला मिळतो आणि भारत हा यांचा उगमदेश म्हणून 'Indian' असा शब्दोल्लेख इंग्रजी नावात दिसतो. शास्रिय नाव ' Tolypanthus lagenifer Tiegh.' असं आहे.

मला खात्री आहे पेला बांडगुळ पाहून तुम्ही बांडगुळाच्या प्रेमात पडाल ते...

Plant Profile:

Botanical Name: Tolypanthus lagenifer Tiegh.
Synonyms: Tolypanthus lageniferus
Common Name: Indian Tolypanthus
Marathi Name: Pela Bandgul (पेला बांडगुळ)
Family: Loranthaceae
Habit: Shrub
Habitat: Dense Evergeen Forest (घनदाट जंगल)
Flower Colour: Red, Greenish Yellow  (लाल, तपकिरी किंवा पिवळसर हिरवा)
Leaves: Simple, heart shaped, opposite, entire margin, 5-8 cm long x 3-5 cm wide, leaf stalk 0.5 cm long.
Smell: No smell
Abundance: Common
Locality: Near Jambhivali Village, Lonavala, Pune
Flowering Season: July - September
Date Captured: July-2017

-          
- रा.जा. डोंगरे

Tuesday 22 August 2017

Flowers: Red Alyce Clover | Lal Shevra – लाल शेवरा | Alysicarpus tetragonolobus Edgew.


श्रावण मास संपत आला की पुष्पोत्सव सुरु होतो. लाल, पिवळी, गुलाबी, नारंगी, जांभळी आशा नानाविध रंगांची रानफुलं बहरू लागतात. कधी यात विविध रंगांच्या फुलांचं मिश्रण असत तर कधी संपूर्ण माळावर फक्त एकाच प्रकारची आणि रंगाची रानफुलं उमलतात. मग, क्रमाक्रमाने आठवडा-दोन आठवड्यात दुसरी फुलं, आणि हे बदल एकामागून एक असे होत राहतात. फुलांच्या या बदलाणे धरतीचा रंगही अठवड्यानी बदलताना दिसतो. निसर्गातील ही रंगांची अदलाबदल पाहण्यासारखी असते. अर्थात ही अनुभूती घेण्यासाठी निसर्ग जवळ करण्याशिवाय पर्याय नाही.

ऊन आणि सावलीचा पाठशिवनीचा खेळ सुद्धा याच काळात सुरु असतो. ही धावती उन्हं रानफुलांवर पडली की ही भलतीच आकर्षक वाटत, त्यांच्यातील रांगांमध्ये एक वेगळीच चमक येते. आधीच लोभसवाणं वाटणारं चित्र आता आणखी मोहक भासू लागतं.

काल सहज माळावरून फिरत होतो. पायाखालच्या लुसलुशीत गवतातून विविध रानफुलं फुलली होती. यातली बहुतांश आकाराने खूपच लहान, अगदी नखाच्या टोकाऐवधी. अर्थातच, अशा लहान लहान फुलांकडे आपण नकळत दुर्लक्ष करतो. दुर्लक्ष होण्यामागे कारणही असते म्हणा, या छोट्या फुलांबद्दल फारशी माहिती उपलबद्ध नाही, आणि असल्यास शास्त्रीय. मग, निसर्गतः किंवा मानवी स्वभावामुळे होतं दुर्लक्ष.


माळावरच्या एका रानफुलाचे फोटो घेण्यात मी मग्न होतो, समोरून आलेल्या एका आजोबांच्या हाकेने मी भानावर आलो. त्यांचा प्रश्न: काही हरवलंय का? मी उत्तरदाखल नाही म्हणून नकारार्थी मान डोलावली. प्रतिसाद म्हणून तेही "बरं बरं" असं म्हणून मार्गस्थ झाले. त्यांच्या डोक्यावर गवताचा भारा होता, या भाऱ्यातून एक रानफुल त्यांच्या चालण्याच्या तालावर डोलत होतं, शेवटचं! मी बाबांना हाक दिली, ते थांबले आणि वळेल पाठमोरे. मी त्यांच्या जवळ जाऊन ते रानफुल खुडलं आणि विचारलं; बाबा, कुठलं फूल आहे हो हे? "रानातील फुलं असतात ती", असं  त्यांनी सांगितलं. पुन्हा वाट चालू लागता ते बोलले "अशी अजून भरपूर आहेत, या टायमाला येतात ही फुलं".

मी माझ्याशीच हसलो. रानफुलं आपल्याला फारच कमी माहीत असतात, त्यामुळे यातली काही दुर्मिळ होत आहेत याची साधी माहिती सुद्धा अपल्याला नाही. ती फूलं होती "लाल शेवर्याची", अर्थात तो काही दुर्मिळ नाही. ती फूलं घेऊन मी पुन्हा एका खडकावर बसलो, विचारमग्न! बाजूला सहज नजर गेली आणि समोर  "लाल शेवर्याची" काही झाडं दिसली. फोटो घेतले. या सर्व-साधारण, जगाशी फारशी ओळख नसलेल्या "लाल शेवऱ्या" बद्दल काहीतरी लिहावं असं ठरवतं माळ उतरलोवाटलं आज दुर्मिळ नसला तरी याबद्दल माहिती तरी लोकांना कळूदेत. निसर्गात त्याचही वेगळं अस्तित्व आहेच की!

तसा 'लाल शेवरा' मुळातच उंचीने लहान, -१० सेमी उंचीचा. कधीकधी, फार चांगलं आणि पोषक वातावरण मिळालं तर फूटभर वाढतो. यापलीकडे त्याची फारशी काही वाढ होत नाही. फार उंच वाढू लागला की फांद्यांना वरच्या फुलांचं आणि शेंगांचं वजन झेपत नाही मग त्या जमिनीवर सरळ पसरून घेतात. या पसरण्यामुळं कधीकधी फांद्यांचा गुंता इतर झाडांत होतो आणि मग कळनं कठीण होऊन बसतं की, कुठलं झाड कोणतं ते.


असो, लाल शेवऱ्याच्या मुळ्या खोलवर जातात, साधारणपणे ते सेमी खोल. कारणही तसंच असतं, माळरानावर आल्याने पाण्याची कमतरता कधीही निर्माण होऊ शकते आणि निसर्गतः ती सोसण्याची क्षमता या झाडांमध्ये असावी म्हणून मुळ्या खोल जाणाऱ्या असाव्यातएका झाडात - फांद्या जमिनीपासून निघतात, कधी थोड्या कमी-जास्तही होतात. चाहुबाजूनी पसरतात. फांद्या कडक असतात आणि कधी कधी काहीशी जांभळट छटा यावर येते. स्पर्श केल्यास काहीशी चरबट लागते. उंची कमी असल्याने पानं जमिनीपासूनच लागतात. पानांचा रंग थोडासा भुरका हिरवट असतो, जोडणी एकाड एक (Alternate) पद्धतीची असते. पानांना जोडणारा देठ (Petiole) २-४ मिमी लांबीचा, तोही हिरवा आणि भुरक्या केसांनी वेष्टित असतो. पानांचा आकार हा देठाकडे गोलाकार आणि मग टोकाकडे निमुळता (Lanceolate) होत जाणारा असतो. लांबी २-३ सेमीची असते आणि रुंदी फार तर ते सेमी पर्यंत असते. पानांचा देठ जिथे जोडलेला असतो तिथे नवीन फांदीसाठीचा कोंब निघतो, याची लांबीमिमी पर्यंत असते. फांदीच्या टोकाकडे ५-८ सेमीची फुलोरा निघतो, फुलं नेहमी फुलोऱ्याच्या खालच्या बाजूने फुलायला सुरवात होते (Raceme Inflorescence). ज्यावेळी फुलोऱ्यातील खालची फुलं फुलतात तेव्हा वरच्या भागातील कळ्या क्रमाक्रमाने फुलण्यासाठी तयार असतात. पहिला फुलांचा बहर उमलून गेला की तेथे शेंगा लागायला सुरवात होते आणि त्याच्या वरची फुले तोपर्यंत उमललेली असतात. असं होण्यामागे निसर्गाची योजना आहे. जास्तीत जास्त फळं लागावी अशी ती योजना. ही योजना फार कुतूहल निर्माण करणारी आहे, आपण ती पुढे समजून घेऊ.

लाल शेवर्याची गंम्मत म्हणजे, फुलं जोडीने उमलतात. म्हणजे एका फुलोऱ्यात बहुधा एका वेळी दोनच फुलं उमलतात. असं का? हे गुपित मात्र गुपितच आहे. फुलांच्या पाकळ्यांचा रंग आकर्षक असतो, बहुधा तो लाल असतो पण रंगाच्या छटेमध्ये थोडासा फरक कधी कधी दिसून येतो. म्हणजे कधी काहीसा गुलाबी तर कधी अबोली सारखा. पण हे सगळे रंग शेवटी लाल रंगाकडेच झुकलेले असतात. फुलामध्ये एकूण पाच पाकळ्या असतात, त्यातली एक सर्वात मोठी, दुसऱ्या दोन मध्यम आणि शेवटच्या दोन लहान असून खालच्या बाजूने लागतात अगदी लहान असतात. मोठी पाकळी वरच्या बाजूने मुकुटासारखी भासते, त्याच्याखाली पुंकेसर (Androecium) स्रिकेसर (Gynoecium) वाढतात. पुंकेसरांची संख्या ही १० असते, यातील ९ जणांचा एकत्र पुंजका आणि एक मात्र वेगळा वाढतो. या कुळातील फुलांमधलं हे वैशिष्ठ आहे.


फुलांचा आकार खूप लहान असतो, फार फार तर ५-७ मिमीचा; त्यामुळे तशी ती नाजूकच असतात. या नाजूक फुलांना संरक्षण देण्यासाठी त्यांची संरक्षण दले (Calyx) असतात. संरक्षण दलांची संख्या पाच, प्रत्येक पाकळीमागे एक अशी.संरक्षण दलांचा रंग पोपटी-हिरवा असतो. त्यावर मुलायम पांढरे केस असतात. ही संरक्षण दलं शेवटपर्यंत म्हणजे शेंगा लागल्यानंतर देखील तशीच टिकून असतात. शास्त्रीय भाषेत याच नाव बदलून आता persistent calyx असं होतं.

फुलं परिपक्व झाली की, पावसाच्या थेंबानी, किटकांमुळे किंवा फुलपाखरांमुळे परागीभवनाची प्रक्रिया मार्गी लागते. फलनाची प्रक्रिया काही दिवसांत पार पडते आणि साधारणपणे एक ते दीड सेमीचा शेंगा लागतात. सुरवातीला शेंगा हिरव्या आणि त्यावर काहीशी जांभळ्या रंगाची छटा असणाऱ्या असतात. शेंगा तें 2 सेमी लांब आणि चौकोनी (Quadrangular) असतात. शेंगांचं बाहेरील आवरण खरबरीत असते. या शेंगांमध्ये थोडा वेगळेपणा असतो. एका शेंगेत 4 ते 6 बिया असतात. प्रत्येक बी आवरणासहित दुसऱ्या बीला जोडलेली असते. ही रचना बीजप्रसारणासाठी कामी येते. शेंगा पुढे परिपक्व होतात आणि वाळतात. वाळल्यामुळे शेंगांचं वरचं आवरण एव्हाना खूप खरबरीत (rough) झालेलं असतं. या खरबरीत झालेल्या शेंगा चराटीला आलेल्या गुरांच्या पायाला, केसांना चिकटतात. इथे बीजप्रसारचा प्रवास सुरु होतो. नशिबानं या जिथं पडतील तिथं योग्य वातवरण मिळालं तर पुन्हा पुढील वर्षी रुजतात, नाहीतर...

लाल शेवर्याची नोंद Alysicarpus या जातीमध्ये झाली आहे, यातील Alysi हा भाग शेंगांच्या जोडणी बद्दल बोलतो आणि carpus म्हणजे शेंग. याची उपजात tetragonolobus अशी आहे, यातील पहिली पाच अक्षरं (Tetra) म्हणजे चार बाजू असा अर्थ असणारी आहेत. लाल शेवऱ्याच्या शेंगा चौकोनी असतात, आणि या आकाराबद्दल सांगणारी ही अक्षरं आहेत. याच शब्दातील शेवटची पाच अक्षरं "lobus" अशी आहेत. ही अक्षरं शेंगांच्या बाह्य आवरणावर खोलगट भाग असतात त्याचा उल्लेख दर्शवणारी आहेत . शास्त्रीय नाव देताना शेंगांच्या या वेगळेपणाला विशेष महत्व दिलेलं आहे आणि म्हणून नाव अर्थपूर्ण होतं. लाल शेवरा आणि आपल्या आजूबाजूला दिसणारी शेतातली शेवरी हे दूरचे भाऊबंद आहेत. या दोन्ही शेवऱ्यांचं कुळ एकच, म्हणजे फॅबेसी (Fabaceae). लाल शेवऱ्याचं शास्त्रीय नाव Alysicarpus tetragonolobus असं आहे. इंग्रजीमध्ये याला Red Alyce Clover असं म्हणतात.

लाल शेवरा आज तरी दुर्मिळ वैगेरे नाही, पण येणाऱ्या काळात हा दुर्मिळ होऊ शकतो. सध्या डोंगररांगाच्या पायथ्याला असलेली माळरानं सपाटीकरण करून शेतीखाली आणली जात आहेत, काहीठिकाणी तर डोंगर अक्षरशः कोरले जातायेत. नकळत लाल शेवरा आणि माळावरील इतर वनस्पतींची हत्याच आपण करत आहोत. भविष्यात या वनस्पती दुर्मिळ होऊ नये असं वाटत असेल तर आपण आत्तापासूनच काळजी घायला हवी. पुढच्या वेळी गवताचा भारा घेऊन जाताना आजोबा दिसले की त्यांना लाल शेवऱ्याची ओळख करून देईल असा विचार करतोय, बघतो त्यांना पटतंय का...



Plant Profile:

Botanical Name: Alysicarpus tetragonolobus Edgew.
Synonyms: NA
Common Name: Red Alyce Clover
Marathi Name: लाल शेवरा
Family: Fabaceae
Habit: Herb
Habitat: Deciduous or Scrub forest on slopes, Grasslands (शुष्क जंगल आणि डोंगरउतारावर, माळराने)
Flower Colour: Red (लाल)
Leaves: Simple, Laceolate, 2-3 cm long, Rounded at base, 8-12, Stipulate, Petiole 2-4 mm long.
Smell: No smell
Abundance: Common
Locality: Dattagad (Dighi), Pune
Flowering Season: Aug to Sep
Date Captured: 19-Aug-2017


- रा.जा. डोंगरे