Saturday, 14 October 2017

Indian Tolypanthus | Pela Bandgul – पेला बांडगुळ | Tolypanthus lagenifer Tiegh.


माणसाच्या मनात काही झाडांबद्दल कमालीचा तिरस्कार किंवा कमालीची पूजनीयता पाहायला मिळते. वड, पिंपळ, उंबर अशा झाडांना धार्मिक महत्व आहे. याविरुद्ध गाजरगवत (काँग्रेस), बहुतांश वेली यांचा तिटकारा केला जातो. या वनस्पती उपद्रवी मानल्या गेल्या आहेत, शेतामध्ये गवत म्हणून वाढतात आणि यांना कितीही संपवायचा प्रयत्न करा, कुठूनतरी पुन्हा बी येतं आणि नव्याने जन्म घेतं, जोमाने फोपावतं. कदाचित या बिया आपल्याला सांगत असाव्यात, तुम्ही कितीही प्रयत्न करा आम्हाला संपवण्याचा, अगदी मुळापासून; पण आम्ही हरणार नाही. पुन्हा नव्याने जन्म घेऊ, आमचं अस्तित्व जपू.

अशाच एका वनस्पतीची भेट झाली, लोणावळा ते जांभिवळी गावच्या ट्रेक मध्ये. अर्थात ही फक्त भेट होती; ओळख नाही. कारण, मी ही फुलं पहिल्यांदाच पाहत होतो, म्हणून नुसतीच भेट, ओळख  नाही! लोणावळा ते जांभिवळी गावातील रस्ता दाट जंगलातून जातो. एका वळणापर्यंत राजमाची किल्ला आणि या गावाकडील रस्ता एकच. राजमाचीच्या जवळपास पोहोचल्यावर एक फाटा फुटतो, जांभिवळी गावाकडे जाणारा. आत्तापर्यंत बऱ्यापैकी रहदारी असणारा रस्ता आता अचानक एकाकी होऊन जातो. आजूबाजूला सह्याद्रीचं जंगल, आणि नानाविध पक्षांचे आवाज! मधेच जंगलातून जाणारा रस्ता भुयारातून बाहेर पडावा तसा माळरानावर निघतो आणि पुन्हा काही अंतरावर घनदाट वनराईत हरवून जातो.

आमचा ट्रेक भर पावसाळ्यात होता, जुलै महिन्यात. अर्ध्याहून अधिक वाट मागे टाकून आम्ही आता एका माळरानावर आलो होतो. समोरची पायवाट आता आम्हाला जंगलात घेऊन जाणार होती, असं दिसत होतं. पुन्हा चालायला सुरवात केली. जंगलात घुसणार तेच माझं लक्ष एका ट्रेकमेटने वेधून घेतलं. लाल टपोऱ्या फुलांकडे बोट करत त्याने मला खुणावलं. कुंकवासारखी लाल टपोरी फुलं, लिंबाच्या आकाराची. कसली ते काही कळायला मार्ग नाही. आजूबाजूला पाहिलं पण फक्त एकाच झाडावर ही फुलं दिसत होती, त्यातही फक्त एकाच फांदीला. नंतर बाजूलाच या फुलांची एक फांदी तोडून टाकलेली दिसली. नुकतीच कुणीतरी तोडली असावी असं वाटलं. मी जवळून निरीक्षण केलं. अंदाज बांधला, 'बांडगुळ' असावं कुठलं तरी. अर्थात हा फक्त अंदाज होता. निरीक्षणं नोंदवली, पावसामुळे जमेल तसे फोटो घेतले आणि निघालो पुढच्या प्रवासाला. रान तुडवत!

घरी आल्यावर नावाची शोधाशोध सुरु झाली आणि बांडगुळ असण्यावर शिक्कामोर्तब झाला. 'बांडगुळ' तसा उपहासाने वापरला जाणारा शब्द. कुण्या निरुपयोगी माणसाला हाक मारण्यासाठी हा शब्द वापरतात. हा शब्द जरी कानांवर पडला तरी चेहेऱ्यावरचे भाव बदलतात. पण, मी पाहिलेलं बांडगुळ मात्र प्रसन्न वाटायला लावणारं होतं. फुलं टपोरी आणि सुंदर. इतकी सुंदर की 'सुंदर' हा शब्द सुद्धा कमीच पडावा.

अभ्यासाअंती समजलं की ही फुलं 'पेला बांडगुळाची' होती. मराठी नावं फार समर्पक असतात याचं उदाहरण म्हणजे पेला बांडगुळ! फुलांचा गुच्छ एखाद्या पेल्यात, तळाशी मधोमध बसवावा तसा या फुलांचा सबंध आकार असतो आणि म्हणून मराठीतील हे नाव समर्पक वाटतं. अर्थात फुल कीतीही सुंदर असलं आणि छान वाटलं तरी हे बांडगुळसुद्धा परोपजीवीच (Parasitic). एखाद्या फांदीमध्ये आपली मुळं रोवायची, ती थेट अन्नवाहिन्यांमध्ये (Xylem & Phloem) टोचायची, त्यातून जीवनरस चोरायचा आणि आपलं पोटपाणी चालवायचं, असा यांचा उद्योग. बांडगुळाचे सर्वच प्रकार अशाच पद्दतीने इतर वनस्पतीचे शोषण करतात, आणि पर्यायाने त्यांच्यावर कुऱ्हाड चालवली जाते.

असो, तर पेला बांडगुळ तशी झुडूपवर्गीय वनस्पती, सह्याद्रीच्या घनदाट जंगलांत वाढणारी. एखाद्या झाडाच्या फांदीवर स्वतःचा चरितार्थ चालवणार हे झुडूप आहे. फांद्या टणक आणि राखाडी रंगाच्या असतात. त्यावर एकमेकांच्या विरुद्ध पद्धतीने पानांची जोडणी असते. पानांचा आकार बदामी. लांबी साधारणपणे ४-८ सेमी आणि रुंदी ३-६ सेमीची. नवीन लागलेली पानं काहीशी लालसर असतात नंतर हरितद्रव्यामुळे ती हिरवी होतात. पानांना स्पर्श केला तर ती थोडीशी मांसल भासतात. देठ फार-फार तर अर्ध्या सेमी पर्यंत असतो. टोकाकडे पानं निमुळती आणि टोकदार (Acute) होत जातात.

जूनच्या शेवटी आणि जुलै महिन्याच्या सुरवातीला सबंध फांदीवर लाल चुटुक फुलं लागतात. सुरवातीला फुलांचा रंग काहीसा हिरवट पिवळा असतो. पण जस जशी फुलं परिपक्व होत जातात तसा रंग लाल आणि नंतर तपकिरी होत जातो. पेला बांडगुळाच्या फुलांची रचना विशेष आहे. पाकळ्यांसारखा भासणारा पेला किंवा कपासारखं बाहेरील आवरण हे पाकळ्यांच नसून ब्रॅक्ट्सचं असतं. ब्रॅक्ट्स हा फुलांचाच एक भाग, संरक्षण दलांच्या खाली यांची रचना असते. पानांमध्ये रचनात्मक बदल होऊन यांची निर्मिती होते आणि यांचं मुख्य काम म्हणजे परागीभवनासाठी लागणाऱ्या किड्यांना आकर्षित करणे. म्हणून तर या पाकळ्यांसारख्या भासणाऱ्या ब्रॅक्टस इतक्या सुंदर असतात. या विशिष्ट रचनेमुळे फुलांचा व्यास ३-५ सेमीचा बनतो. टोकाकडे पेल्याचं पाच पाकळ्यासदृश्य भागांत विभाजन झालेलं दिसतं. पेल्याच्या आतमध्ये तळाशी साधारणपणे ५ फुलं लागतात, ४-६ सेमी लांबीची, नळीसारखी. फुलं परिपक्व होण्याआधी एखाद्या काठीवर गोल टोपी घातल्यासारखी भासतात.. परिपक्व झाली की काठीसारखी वाटणारी नळी लाल किंवा केशरी रंगाची दिसू लागते. वरचा टोपीसारखा भाग पाकळ्यांमध्ये बदलतो. पाकळ्यांचा रंग बहुधा गुलाबी असतो. त्यात पुंकेसर आणि स्त्रीकेसर असतात. प्रत्येक पाकळी २-३मीमी लांबीची असते.

फुले परिपक्व झाली की पावसाच्या थेंबांनी किंवा कीटकांच्या मदतीने प्रजननाची प्रक्रिया पार पडते. एका फुलापासून एक फळ तयार होते. पक्षी ही फळं आवडीने खातात. झाडांच्या खोडांत विष्टेवाटे बियांची पाखरण होते. यातील काही बियांना योग्य वातावरण मिळतं आणि त्या झाडाच्या फांद्यांवर रुजतात. मुळ्या हळूहळू झाडाच्या फांदीत घुसून अन्नद्रव्य वाहून नेणाऱ्या नलीकांमध्ये शिरकाव करतात. एव्हाना इकडे फांद्या आणि पानांचा पसारा तयार झालेला असतो. थोडक्यांत नवीन जीवनाची सुरवात झालेली असते.

खरं पाहता बांडगुळवर्गीय वनस्पती पूर्णपणे परावलंबी नाहीत. त्यांनाही हिरवी पानं असतातच की, ही पानं अन्न तयार करण्यात मदत करतात. परंतु तेवढं अन्न पुरेसं नसतं मग उरलेल्या गरजा ते त्या झाडाकडून पूर्ण करवून घेतात ज्यावर यांचा संसार थाटलेला असतो. अर्थात यामुळे मुख्य झाडाचं काही प्रमाणात नक्कीच नुकसान होतं. पण निसर्ग आहे, इथे प्रत्येकाची योग्य ती सोय होतेच.

पेला बांडगुळ हे Loranthaceae या कुळात मोडतं, विशेष म्हणजे या कुळातील बहुतांश वनस्पती अशाच अर्ध-परावलंबी आहेत. याचं इंग्रजी नाव Indian Topypanthus असं आहे. बांडगुळाचा हा प्रकार सह्यद्रीच्या घनदाट जंगलांत पाहायला मिळतो आणि भारत हा यांचा उगमदेश म्हणून 'Indian' असा शब्दोल्लेख इंग्रजी नावात दिसतो. शास्रिय नाव ' Tolypanthus lagenifer Tiegh.' असं आहे.

मला खात्री आहे पेला बांडगुळ पाहून तुम्ही बांडगुळाच्या प्रेमात पडाल ते...

Plant Profile:

Botanical Name: Tolypanthus lagenifer Tiegh.
Synonyms: Tolypanthus lageniferus
Common Name: Indian Tolypanthus
Marathi Name: Pela Bandgul (पेला बांडगुळ)
Family: Loranthaceae
Habit: Shrub
Habitat: Dense Evergeen Forest (घनदाट जंगल)
Flower Colour: Red, Greenish Yellow  (लाल, तपकिरी किंवा पिवळसर हिरवा)
Leaves: Simple, heart shaped, opposite, entire margin, 5-8 cm long x 3-5 cm wide, leaf stalk 0.5 cm long.
Smell: No smell
Abundance: Common
Locality: Near Jambhivali Village, Lonavala, Pune
Flowering Season: July - September
Date Captured: July-2017

-          
- रा.जा. डोंगरे

No comments:

Post a Comment