Wednesday, 12 April 2017

Flowers: Rubber bush, Apple of sodom, French cotton | Rui (रुई) /Mandar (मंदार) | Calotropis procera (Aiton) W.T. Aiton


Seeds (Achenes) coming out of fruits
मंदिराच्या बाहेर लागलेली रांग आणि समोर बसलेल्या विक्रेत्यांच्या टोपल्या पाहून मी भानावर आलो. एका विक्रेत्याच्या दोन्ही हातात रुईच्या पानांचे भरगच्च हार होते, खाली टोपलीत सुटी पानं व्यवस्थित ओळीने लावलेली होती. उन्हाने सुकू नये म्हणून त्यावर पाण्याचा शिडकाव केलेला. पानावरील एका टपोऱ्या थेंबात शेजारच्या आजीबाईच्या टोपलीचं प्रतिबिंब दिसत होतं.


सकाळपासून हनुमान जयंतीच्या शुभेच्छांचा पाऊस पडत होता. हनुमान चालीसा, मारूतिरायांची वेगवेगळी लोभसवाणी चित्र, त्याखाली वेगवेगळे दृष्टांत, महती, चमत्कार वैगेरेचे मेसेजेस असं बरंच काही वाचायला मिळत होतं. त्यात भर म्हणून काही लोकं अधूनमधून हनुमान चालीसाचे ऑडिओ पाठवत होते तर काहीजण बाल हनुमानची कार्टून्स पाठवत होते. दिवसभर वातावरण एकंदरीत भक्तिभावाचं होतं!


हे दृश्य तसं नवखं नाही, दर शनिवार भक्तांच्या अशाच रांगा बजरंगबलींच्या द्वारावर असतात, आपलं इच्छित पूर्ण करण्यासाठी! हिंदू संस्कृतीत बऱ्याचशा देवांना वेगवेगळी पानं-फुलं श्रद्धेने वाहिली जातात, जसं शंकराला बेलपत्र, गजाननाला दुर्वा आणि जास्वंदीची फुलं तसंच मारुतीरायाला रुईच्या पानांचा हार किंवा मोकळी पानं वाहिली जातात. किमान भारतात तरी रुई प्रत्येक माणसाला माहित असण्याचं कारण मारुतीरायच आहेत, याबद्दल दुमत असायचं कारण नाही. वर म्हटल्याप्रमाणे बऱ्याच देवांना आपण वेगवेगळी पानं-फुलं वाहतो, याचं काही सांस्कृतिक किंवा विशेष कारण असू शकेल का? म्हणजे, या देवांना अशी पानं-फुलं सतत वाहता यावी म्हणून तरी आपण वृक्ष संवर्धन करावं आणि पर्यायानं निसर्गसंवर्धन होईल, म्हणून ही अशी प्रथा रूढ झाली असावी का? अर्थात ही फक्त शक्यता आहे. ते काही असो, कुठल्या ना कुठल्या कारणाने संवर्धन होत आहे, हे महत्वाचं!

Flowers of Calotropis procera

रुई हे भारतीय झुडूप आहे, तसेच ते आशियातील इतर काही देशांचं देखील आहे. आफ्रिकेमध्ये सुद्धा रुई मोठ्या प्रमाणावर नैसर्गिकरित्या वाढते. रुईच्या दोन प्रजाती आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतात. त्यातील एक रुई आणि दुसरी अर्करुई अशा नावाने ओळखतात. वर-वर पाहता दोन्हीमंध्ये विशेष फरक नाही, जवळून आणि व्यवस्थित पाहिलं तर फुलांच्या पाकळ्यांमध्ये थोडासा फरक जाणवतो. दोन्ही प्रजाती सारख्याच प्रमाणात आपल्या भोवताली असल्याने, आपण दोन्हींना रुई म्हणूनच ओळखतो, हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण ते खरं आहे.


रुईची झुडपे आपल्या लक्षात राहतात ती आणखी एका लहानपणच्या आठवणीसाठी, लहानपणी फळांतून निघणाऱ्या म्हाताऱ्या एक एक करून आपण उडवायचो. वाऱ्याच्या तालावर लयीत वर-खाली हेलकावे घेत त्या पुढच्या प्रवासाला जायच्या. काही क्षणांसाठी आपलं बालमन त्यांची सोबत करायचं, ती नजरेआड झाली की दुसरी म्हातारी फळातून काढायची आणि हवेत फुंकर मारून सोडायची. पायात काटा किंवा कुरूप झालं कि ग्रामीण भागात रुईचा चीक घातला जातो. पानं तोडून त्यातून निघालेला चीक जमा करायचा आणि त्यापासून चेंडू बनवायचा हा सुद्धा लहानपणचा एक महान उद्योग! तसं हे काम खूप कठीण असायचं कारण चेंडू बनवण्यासाठी खूप चीक लागायचा आणि मग लहानांची वानरसेना रुईच्या शोधार्थ रानात भटकत फिरायची. हल्ली तर पांढरी रुई घरासमोर लावली जाते, त्याने घरात लक्ष्मी येते असा भोळा (गैर?)समज आहे. या अशा एक ना अनेक कारणांनी रुई आपल्या लक्षात आहे, नकळत ती आता आपल्या जीवनातील एक महत्वाचं झुडूप बनून गेली आहे.

Fruits of Calotropis procera

नुकत्याच झालेल्या हनुमान जयंती निमित्त रुईची आपण माहिती घेऊ. रूई साधारणपणे १०-१२ फूट उंचीपर्यंत वाढू शकते, पण बहुधा ती ५-८ फुटांपर्यंत वाढलेली दिसते. जमिनीपासून साधारणपणे कधी कधी २-५ फांद्या निघतात तर कधी एकच खोड असते. रूईच खोड नवीन असताना हिरव्या रंगाचं आणि आतून पोकळ असतं, पुढे ते परिपक्व होतं आणि आतून भरीव होतं. परिपक्व झाल्यावर खोडाचा रंग पिवळसर पांढरा होतो साल खरबरीत होते, आणि त्यावर उभ्या रेषा पडतात. या उभ्या रेषांतून आतली हिरवी साल कधी कधी पुसटशी दिसते. रूईची पाने साध्या (Simple) प्रकारातील असतात, जोडणी एकमेकांच्या विरुद्ध असते. प्रत्येक पान साधारणपणे १२-१५सेमी लांबीचे असून रुंदी १० सेमी पर्यंत असते, आकार अंडाकृती असतो, देठाची बाजू हृदयाच्या आकाराची तर टोकाला अगदीच टोकदार असते, पानांच्या कडा एकसंध असतात, देठ नसतो त्यामुळं पानं काहीशी गर्दीने फांद्यांभोवती लागतात. पानं मांसल असून त्यांच्यावर चंदेरी किंवा पांढऱ्या रंगाची पावडर पडल्यासारखी भासतात. त्यामुळे पानांचा रंग भुरकट हिरवा होतो. बहुधा फांद्यांच्या टोकाला फुलोरे लागतात, प्रत्येक फुलोऱ्यात १०-१५ फुले लागतात. फुलांना मंद सुगंध असतो. फुलांचा दांडा साधारणपणे १-२ सेमी लांबीचा असतो तर व्यास १-२ सेमी असतो. पाकळ्यांची संख्या पाच असून त्या गुलाबी ते पांढऱ्या रंगाच्या असतात, अर्ध्यापासून टोकाकडे हा रंग गर्द गुलाबी किंवा जांभळा होतो. पाकळी टोकाकडून पाहिल्यास महिरपीसारखा आकार दिसतो. पाकळ्या जिथे जोडलेल्या असतात तिथून पाच पुंकेसर आणि एक स्रिकेसर निघतो. स्रिकेसराची जागा मधोमध असते आणि तो सर्व बाजूनी पुंकेसरांना जोडलेला व वेढलेला असतो. इतर बहुतांश वनस्पतींमध्ये पुंकेसरातून परागकण बाहेर पडतात, रुईमध्ये मात्र परागकण असणाऱ्या लहान-लहान पिशव्या बाहेर पडतात आणि मुख्य म्हणजे या पिशव्यांची वरची बाजू चिकट स्रावाने आच्छादलेली असते. चिकट स्रावामुळे परागीभवनाची प्रक्रिया सुलभ होते. या पिशव्यांना शास्त्रीय भाषेत 'पॉलिनीया' असं म्हणतात. पिशव्या आकाराने अतिशय लहान असल्याने उघड्या डोळ्यांनी स्पष्ट दिसत नाहीत. त्यासाठी मायक्रोस्कोप (सूक्ष्मदर्शी) लागतो. रुईच्या परागीभवनामध्ये महत्वाची भूमिका मुंग्या आणि मधमाशा बजावतात, अर्थात फुलपाखरे पक्षी हे सुद्धा या प्रक्रियेत सहभागी असतात परंतु त्यांचा सहभाग काहीसा कमी असतो. हे कीटक जेव्हा फुलांना भेटी देतात तेव्हा परागकण असणाऱ्या पिशव्यांची चिकट बाजू मधमाशीच्या किंवा इतर कीटकांच्या पायाला चिकटते. ज्यावेळी ते फुलावरून निघतात, तेव्हा या पिशव्या पुंकेसरापासून वेगळ्या होतात आणि मधमाशी किंवा किटकांच्या सोबत नवीन फुलाच्या शोधात निघतात. हे कीटक योगायोगाने योग्य फुलावर बसले तर पायांच्या हालचालीमुळे परागकणांच्या पिशव्या स्रिकेसरावर पडतात. एव्हाना स्रिकेसर सुद्धा ओला झालेला असतो आणि त्यामुळे प्रजननाचे पुढील सोपस्कार पूर्ण होतात.


प्रजननाच्या प्रक्रियेप्रमाणे साधारणपणे एका फुलोऱ्यात २-४ फळे लागतात, बाकी फुले फलित न झाल्याने सुकून जमिनीवर पडतात. फळांचा आकार करंजीसारखा असतो आणि लांबी ८-१२ सेमी पर्यंत असते. फळे सुरवातीला मांसल, हिरव्या रंगाची आणि गुबगुबीत असतात. हाताने हळूच दाबून पाहिल्यास आत हवा भरल्यासारखी भासते. जस जशी फळे परिपक्व होतात तशी त्यामध्ये बिया भरण्याची प्रक्रिया सुरु होते. बिया सुरवातीला पांढऱ्या रंगाच्या असतात आणि परिपक्व झाल्या कि गर्द खाकी किंवा विटकरी रंगाच्या होतात. आकार अंडाकृती आणि लांबी साधारणपणे २-३ मिमी असून त्या चपट्या असतात. फळांच्या आतल्या बाजूला ८-१० पदर असलेल्या पांढऱ्या रंगाच्या खाचा असतात, या खाचांमध्ये बियांवरी मुलायम पांढरे केस ओळीने दाबून बसलेले असतात. अशा एका फळामध्ये खूप साऱ्या बिया दाटी-वाटीने परंतु व्यवस्थित बसलेल्या असतात, बाहेरून पाहिलं तर अगदी रांगोळीच्या ठिपक्यांसारख्या ओळीने बिया लागलेल्या असतात. फळं परिपक्व झाली की फुटतात आणि आतल्या खाचा ताणल्या जातात. परिणामस्वरूप केस असलेल्या बिया मोकळ्या होतात आणि हवेवर स्वार होऊन पुढच्या पिढीच्या तयारीसाठी निघून जातात. या म्हाताऱ्या फळांतून बाहेर पडताना पाहणं फार गमतीदार असतं. रुईला निसर्गाकडून हे वैशिष्ट्य लाभलं आहे, या म्हाताऱ्या बिया घेऊन  हजारो किलोमीटरचा प्रवास करतात, योग्य ठिकाण मिळालं की रुजतात आणि चुकून नाही मिळालं तर मरून जातात.

Habit (Entire plant)

रुई आणि अर्करूई यातील फरक ओळखणं सोपं आहे. दोन्हींच्या फुलांमध्ये आणि पानांमध्ये थोडासा फरक असतो. रुईची पाने ही अर्करूई पेक्षा लहान असतात. त्याचप्रमाणे फुले देखील थोडी आकाराने लहान असतात. रुईची फुले चहाच्या कपाप्रमाणे उमलतात, क्वचित पाकळ्या देठाकडे वळतात, पाकळ्या महिरपीच्या आकाराच्या आणि अर्ध्यापासून टोकाकडे जांभळ्या किंवा गर्दगुलाबी असतात. याउलट अर्करूईची फुले आकाराने थोडी मोठी पाकळ्या संपूर्ण मागे देठाकडे वाळलेली असतात, फुलं परिपक्व झाली की पाकळ्यांची टोकं चक्राकार वळतात. संपूर्ण पाकळ्यांचा रंग जांभळा असतो, स्त्रीकेसर आणि पुंकेसर रुईच्या तुलनेत लांबीला जास्त असतात.


रूईची फुले दिसायला सुंदर असली तरी ती संपूर्ण झुडूप विषारी आहे, चुकून एखादा भाग अधिक प्रमाणात खाल्ला गेला तर मृत्यू ओढवू शकतो! या झुडपांचा कुठलाही भाग तोडला कि त्यातून चीक निघतो हा चीक विषारी आहे. चुकून तो डोळ्यांत गेल्यास दृष्टी कायमची जाण्याचा धोका असतो. हे सर्व धोके असले तरी काही औषधी गुणधर्म रुईमध्ये आहेत. कुष्ठरोगासारख्या दुर्धर आजारावर रुई गुणकारी मानली गेली आहे, त्याचप्रमाणे दम्यावर देखील ती चांगलं काम करते. या सर्व गोष्टींमुळे रूई जवळ काही करत असाल तर थोडंसं सावध राहावं!

Seed Dispersal of Rui


रूईला वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळी नावं आहेत. मराठीमध्ये हिला मंदार असही म्हणतात. हिंदीमध्ये आक, संस्कृतमध्ये आदित्यपुष्पिका किंवा क्षीरपर्ण, इंग्रजीमध्ये Rubber bush, Apple of sodom, French cotton अशी नावं आहेत. रुईचं शास्त्रीय नाव Calotropis procera (Aiton) W.T. Aiton असं आहे. यामध्ये Calotrpois हा शब्द वनस्पतीतुन निघणाऱ्या चिकातील Calotropin या रासायनिक पदार्थावरून आला आहे. रुई मिल्कवीड (Milkweed) म्हणजेच Apocynaceae या कुळातील आहे. Milkweed शब्दाची फोड केल्यास Milk+Weed अशी होते म्हणजेच दुधासारखा चीक असणारी गवत म्हणून वाढणारी  वनस्पती असा होतो.














Plant Profile:

Botanical Name: Calotropis procera (Aiton) W.T. Aiton
Synonyms: Asclepias procera, Calotropis wallichii, Madorius procerus
Common Name: Rubber bush, Apple of sodom, French cotton
Marathi Name: Rui (रुई) /Mandar (मंदार)
Family: Apocynaceae
Habit: Shrub
Habitat: Deciduous or Scrub forest on slopes, Grasslands (शुष्क जंगल आणि डोंगरउतारावर, माळराने)
Flower Colour: Pink to Purple (गुलाबी ते जांभळा)
Leaves: Simple, opposite, 12-15 cm long, around 10 cm broad, ovate, cordate at base, sessile
Smell: Little fragrant
Abundance: Common
Locality: Narayangad Fort, Khodad, Junnar, Pune
Flowering Season: All year

Date Captured: 31-Jan-2016


रा.जा. डोंगरे

No comments:

Post a Comment