Sunday, 20 March 2016

Birds - Rufous Treepie | (टकाचोर - Takachor) | Dendrocitta vagabunda Lathum

स्वानुभव:

निसर्ग आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकवत असतो, अगदी रोजच! फक्त आपण त्याकडे त्या दृष्टीने पाहायला हवं. साधारणपणे दीड वर्षापूर्वी मला पुण्यातील वेताळ टेकडीवर एक सुंदर पक्षी दिसला, फिरून आल्यावर सुभाषला (पक्षिमित्र) फोन करून वर्णन सांगितले, दोन-तीन नावं सुभाषने अंदाजाने सांगितली. मीसुद्धा लगेच इंटरनेटवरील माहिती आणि फोटोज बघून खात्री केली. सुभाषचा अंदाज खरा ठरला, सांगितलेल्या नावांपैकी एका नावावर शिक्कामोर्तब झाले. पक्षी होता "टकाचोर" इंग्रजीमध्ये महाशयांना Rufos Treepie म्हणून ओळख होती. नवीन काहीतरी ज्ञानकोशात सामील झाल्याचा ओतप्रत आनंद होता, नाराजी होती ती फोटोग्राफ मिळाल्याची.

तिथपासून आजपर्यंत (दीड वर्ष) खूप वेळा मी कॅमेरा घेऊन टेकडीच्या वाऱ्या केल्या पण महाशयांनी फोटो घेण्याची संधी काही दिलीच नाही. खुपदा जोडीने दिसायचे, कधी झाडीतून आवाज द्यायचे, कधी डोक्यावरून मस्त उडत दूर जायचे आणि लुप्त व्हायचे, माझा हातात आशेने त्यांच्याकडे पाहण्याशिवाय काहीच नसायचं. मी वाट पाहत होतो ती योग्य संधीची!


आज सकाळी ठरवून काही रानफुलांचे फोटो काढण्यासाठी टेकडी जवळ केली, सगळे फोटो घेऊन खाली उतरताना अचानक महाशयांनी झाडीतून आवाज दिला. घड्याळाकडे नजर टाकली, वेळ होता थोडासा, मग काय म्हटलं बघू प्रयत्न करून. आवाजाचा अंदाज घेत दबक्या पावलांनी झाडीत घुसलो, महाशय नजरेच्या टप्प्यात आले, पण फोटो मिळवण्यासारखी योग्य परिस्थिती मिळेना. झाडांच्या फांद्या आणि पाने मधे येत होती. तासभर हेच नाटक सुरु होतं, वैतागून आता जाव घरी असं कुठतरी वाटत होतं पण म्हटलं शेवटची दहा मिनिटं थांबून बघू. कपाळावरचा घाम रुमालाने टिपला, कॅमेरा उगाच एकदा बंद करून पुन्हा सुरु केला आणि संधीची वाट पहात बसलो.

 दहा मिनिट होऊन गेलेली, आता मात्र माझा धीर सुटत चालला होता. कॅमेरा बंद झाला, आणि अचानक समोर कोतवाल (Black Drongo) माझ्या मदतीला धावून आला. कोतवालाने महाशयांना त्यांच्या जागेवरून हकललं आणि हा टकाचोर अगदी माझा पुढ्यात येउन बसला. आनंदाला आवर घालून, हळूच कॅमेरा पुन्हा बाहेर काढला आणि सुरु करून मनसोक्त फोटोज घेतले.

सर्व फोटोज घेतल्यावर लहानपणी आईकडे स्वयंपाकघरात जेवणासाठी हट्ट करायचो तेव्हा "धीर धर, धीर धर" असं सांगायची. तेव्हाची शिकवण आज कामाला आली असं कुठेतरी खोलवर मनात वाटत होतं! आईला तिच्या या शिकवणीसाठी मनोमन धन्यवाद देत आनंदाने टेकडी उतरलो. संधी कधीकधी आपला अंत पाहते पण ती मिळणार हे नक्की असते. हवा फक्त थोडासा धीर!


टकाचोरबद्दल थोडंसं:

टकाचोर आणि आपल्या आजूबाजूला नेहमी दिसणारा कावळा हे एकाच कुळातले, टकाचोरला पाहताना ते थोडंसं जाणवतं देखील. परंतु, कावळा हा पक्षी लोकांना फारसा काही आवडत नाही, तसं कारणही नाही आवडण्याचं . हा आधीच कोळशासारखा काळा कुळकुळीत आणि त्यावर त्याचा आवाजही कर्णकर्कश. टकाचोर मात्र या दोन्ही गोष्टींमध्ये अगदीच वेगळा आहे. दिसायला तर हे महाशय सुंदर आहेतच पण गातात सुद्धा सुरात.

आकाराने टकाचोर कावळ्यापेक्षा थोडासा लहान आणि सडपातळ पक्षी आहे. नर आणि मादी बर्यापैकी सारखेच दिसतात. डोक्याचा आणि मानेचा रंग पूर्ण काळा, मानेपासून खाली मंद तपकिरी आणि पुन्हा शेपटी निळसर करड्या रंगाची असते. चोचीचा रंग काळा असून टोकाला ती गळासारखी अर्धवक्राकार असते. समोरच्या बाजूने पाहिल्यास शेपटीवर काळा आणि निळसर करड्या रंगाचे प्रत्येकी दोन पट्टे दिसतात. पंखांवर बाहेरच्या बाजूने काळ्या रंगाची कड आणि त्याला लागून लगेच पांढऱ्या रंगाची पट्टी असते आणि पुढे पुन्हा मग तपकिरी रंग येतो. या हटके रंगसंगतीमुळे टकाचोर अगदी उठून दिसतो. सौंदर्यामध्ये आणखी एक भर पडते ती शेपटीच्या लांबीमुळे. टकाचोरची शेपटी ही मुख्य शरीराच्या दीड पट लांब असते.


टकाचोर हा पक्षी बहुधा पानगळीच्या किंवा हरित वनांमध्ये राहणे पसंत करतो, कधीकधी शेतांमधे झाडांवरदेखील हे वस्तीला असतात. उंच झाडांवर खोडांमधे काड्यांच्या सहाय्याने तो आपली घरटी बनवतो, घरटी काहीशी उथळ असतात, प्रत्येक घरट्यात साधारणपणे ३-५ अंडी घातली जातात. विणीचा हंगाम हा एप्रिल ते जून महिन्यांदरम्यान असतो.

टकाचोर हा शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारचे अन्न खातो, त्यातल्या त्यात झाडांवर लागलेली फळे आणि फुले हे यांचे मुख्य अन्न. झाडांच्या फांद्यांवर फिरणारे लहान सरपटणारे प्राणी, इतर पक्षांची अंडी, मधमाशा आणि पाकोळ्यांवरदेखील ते गुजराण करतात. बर्याचदा ताजं मांस पडलेलं असल्यास त्यावर हे समूहाने ताव मारताना दिसतात. कधी कधी एकत्रित येउन शिकार सुद्धा करतात. फांद्यांवरून उड्या मारत फिरणं आणि लहान फांद्यांवर उलटं लटकून फुले फळे खाण्यामध्ये हे अगदी पारंगत आहेत. गमतीची बाब म्हणजे कावळ्यांप्रमाणे यांच्यामध्ये देखील अन्न जमा करून लपवून ठेवण्याची सवय आहे, नंतर ते सापडतं की नाही हा भाग मात्र वेगळा.

दक्षिण भारतामध्ये सुपारी आणि इतर पिकांवरील किडी हा खातो आणि म्हणून शेतकऱ्यांचा मित्र म्हणून याची चांगली ओळख आहे. टकाचोर हे खूप वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढतात पण त्यातले दोन आवाज अगदी नेहमीचे आणि सुरेल आहेत.

टकाचोर हा भारतीय पक्षी आहे त्यामुळे आपल्याकडे बहुधा तो सगळीकडे दिसतो. इंग्रजीमध्ये महाशयांना Rufous Treepie या नावाने ओळखतात तर शास्रीय भाषेत Dendrocitta vagabunda Lathum अशा नावाने ओळखतात. हे पक्षी Corvidae या कुळामध्ये येतात.



Bird Profile:

Scientific Name: Dendrocitta vagabunda Lathum
Synonyms: Dendrocitta rufa
Common Name: Rufous Treepie
Marathi Name: Takachor (टकाचोर)
Family: Corvidae
Abundance: Common
Locality: Vetal Hills, Pune, MH

Date Captured: 19-Mar-16

16 comments:

  1. राज, फोटो अप्रतिम पकडलेत!
    भाषाही सहज सुंदर! या पक्षांबद्दल अधिक वाचायला आवडले असते.
    अवधूत खरमाळे.

    ReplyDelete
    Replies
    1. @ Avadhut Dada, Sorry for taking long time to add information about bird. I have updated few words about TAKACHOR, hope you would like it! Please feel free to comment if you have any additional suggestions. Thanks!

      Delete
  2. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  3. Wah mast lihile ahe.👌👍💐

    ReplyDelete
  4. Hi, मी आज ARAI टेकडी वर ह्याला पाहिलं. लेख भारी लिहिला आहेस मित्रा.

    ReplyDelete
  5. खूप छान माहिती. मला परवा संध्याकाळी वेताळ टेकडीवर हा पक्षी दोनदा दिसला. पण फोटोच काढता आला नाही. नाव माहीत नव्हतं. गुगलवर शोधता शोधता तुमच्या ह्या पेजवर आलो. धन्यवाद..!

    ReplyDelete
  6. You are simply great

    ReplyDelete
  7. Rahul churi Palghar11:10 pm, July 08, 2024

    खूपच सुंदर माहिती दिली तुम्ही......आम्ही मागील वर्षी मे महिन्या अखेर आमच्या शेजारच्या डोंगरात झाडे लावताना हा पक्षी डोंगराच्या पायथ्याशी दिसला होता त्यानंतर तो जून, जुलै आणि ऑगस्ट पर्यंत तिथे तो होता..... त्याचा आवाज यायचा आणि पाहायला गेलं की हुलकावणी देऊन निघुन जायचा.....खर पाहायला गेलं तर त्याची लांब शेपटी मन मोहून टाकणारी आहे......ह्या वर्षी काही त्याच दर्शन झालं नाही.....

    ReplyDelete