Pre-matured or early young flower |
"दुपार झाली, येणं होईल का अंधार पडेपर्यंत? त्यात गणपती बुडणार आज, सगळीकडं मिरवणुका" सुभाषने शून्यात पाहत सवाल विचारला. मी आपला तसाच शांत होतो. काही क्षण असेच निशब्द गेले आणि पुन्हा तोच बोलला, "पाच मिनटं थांब, गाया सावलीत बांधू, पाणी पाजू, खायला घालू आणि येऊ जाऊन पटकन; फक्त मध्ये कुठं थांबायचं नाही. माझा होकार नकार ऐकण्याआधीच तो निघून गेला. मी तिथेच पारिजातकाच्या झाडापाशी थोडा वेळ घुटमळलो, काही फुलं गोळा करून ओंजळीत घेतली. तेवढ्यात सुभाष आला आणि आम्ही निघालो.
२००७ सालचा गणपती विसर्जनाचा दिवस, सुभाष आणि मी हडसरला निघालो होतो. कारण होतं एक वेगळी वनस्पती पाहायची. सुभाषच्या म्हणण्याप्रमाणे पावसाळ्यातलं सर्वाधिक सुंदर फुल. तेव्हा आमच्या कुणाकडेच कॅमेरे नव्हते त्यामुळं नुसती वर्णनं ऐकूनच खुश व्हायचो किंबहुना कल्पनेच्या जगात हरवून जायचो! ही सर्वाधिक सुंदर वनस्पती म्हणजे
"अग्निशिखा". रस्ताभर सुभाष अग्निशिखेची जमेल तेवढी माहिती सांगत होता, मी शक्य तेवढं ऐकून समजून घेत होतो. जुन्नर ओलांडल्यावर हिरवीगार माळरानं पाहून दोघे थोडे शांत झालो आणि सृष्टीचा आनंद घेऊ लागलो. पुढे धरणाच्या कडेला रस्त्यावरून छोट्या वाडीवरची गणपतीची मिरवणूक लागली. मनोमन गणपतीला वंदून अग्निशिखेचे दर्शन व्हावे अशी इच्छा व्यक्त केली. एव्हाना हडसर नजरेच्या टप्यात येऊ लागला होता. सुभाषने सांगितलं आता आजूबाजूला लक्ष ठेव इथून पुढं फुलं दिसायला सुरवात होईल. गाडीचा वेग मंदावून आम्ही रस्त्याच्या दुतर्फा शोधाशोध सुरु केली. साधारणपणे दोन किमी रस्ता मागे टाकला पण दर्शन काही होईना, सुभाष आपला बोलत होता "दरवर्षी खूप असते पण यावर्षी पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळं जास्त फुलली नाही वाटतं".
तितक्यात गुरं चारणारे एक आजोबा भेटले, त्यांना आम्ही विचारलं आणि त्यांनी आम्हाला खून सांगितली.
Flower which is about to mature. Colours are changing and Petals turned back and forming a round |
बाबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही त्या जागेवर पोहोचलो आणि शेवटी "अग्निशिखेची"
वेल दिसली, फुलांनी भरलेली, भाराने काहीशी झुकलेली. फुलं इतकी सुंदर कि काही क्षण मी आणि सुभाष काहीच बोललो नाही. फुलांची ती चित्र डोळ्यांत साठवून घेतली, फुलांना स्पर्श केला आणि थोडंसं दूर जाऊन उगाच त्या वेलीकडं काही काळ पाहत उभा राहिलो. मन भरल्यानंतर, आजूबाजूला फेरफटका मारला. आता एकामागून एक अग्निशिखाच्या वेली आम्हाला दिसत होत्या. प्रत्येक नवी वेल आमच्या मनात आनंद आणि समाधान भरत होती. शेवटी एका फुलापाशी स्तिरावून मी निरीक्षण घेऊ लागलो. सगळी निरीक्षण घेऊन आम्ही पुन्हा परतीच्या मार्गाला लागलो!
अग्निशिखेविषयी थोडंसं:
अग्निशिखा सर्वसाधारणपणे पावसाळयात दिसणारी वेल. पहिल्या पावसानंतर जमिनीत झोपलेले कंद जागे होतात आणि कोंब जोमाने जमिनीतून बाहेर पडतात. महिन्याभरात जवळच्या झुडपावर आपल्या वेलींची चादर पसरवून टाकतात. अग्निशिखेची पाने साधारणपणे ५-६ सेमीची असतात, गर्द हिरवा रंग, स्पर्श केल्यावर काहीशी मांसल लागतात, कंदिलाच्या आकाराची आणि टोकाला अगदी धाग्यासारखी लांब होतात. टोकाकडचा हा धागा १०-१५ सेमी लांबीचा असतो. हा तंतू वेलीला इतर झुडपांवर चढण्यासाठी आणि त्यांना घट्ट धरून ठेवण्यासाठी मदत करतो. जुलैच्या शेवटी आणि ऑगस्टच्या सुरवातीला या वेलींवर फुले लागायला सुरवात होते. फुले बऱ्यापैकी मोठी असतात साधारणपणे ६-७ सेमी लांबीची. सुरवातीला पाकळ्यांचा रंग हिरवा असतो आणि पाकळ्या जमिनीकडे झुकलेल्या असतात. प्रत्येक पाकळी साधारणपणे ५-६ सेमी लांबीची आणि पाकळीच्या कडा नागमोडी असतात. सगळ्या मिळून सहा पाकळ्या येतात. पाकळ्यांना संरक्षण दले (Sepals) नसतात. सर्वसाधारणपणे प्रत्येक फुलामध्ये पाकळ्या
(Petals) आणि त्याची संरक्षण दले (Sepals) अशीच रचना असते, पण अग्निशिखा मात्र याला अपवाद असून या दोन्ही रचनांमिळून फक्त पाकळ्या तयार होतात. या विशिष्ट रचनेला शास्त्रीय भाषेत
Tepals असे म्हणतात. पाकळ्यांच्या मध्यातून ६ पुंकेसर आणि एक स्त्रीकेसर निघतो. यातील पुंकेसर साधारणपणे ४ सेमी लांबीचा असून त्याच्या टोकावर परागकोश असतात. पुंकेसराच्या मधोमध श्रीकेसराची रचना असते. साधारणपणे १ सेमी लांबीची हिरव्या रंगाच अंडाशय (Ovary) असते आणि त्यातून ३ सेमी लांबीचा हिरव्या रंगाचा आडवा स्त्रीकेसर वाढतो. याचे टोकाला तीन भाग झालेले असतात आणि त्यामुळे तोंड थोडंसं मोठं झालेलं असतं. यातून परागकण आत घेणं सोपं होतं. स्त्रीकेसर आणि पुंकेसराच्या दांड्या या काहीशा वक्राकार असून पाकळ्यांच्या बाजूला झुकलेल्या असतात.
Fully matured flower |
गंमत म्हणजे जसजशी फुलांची वाढ पूर्ण होत जाते तसे फुलामध्ये विशीष्ठ बदल होत जातात. पाकळ्या ज्या जमिनीकडे झुकलेल्या असतात त्या हळू हळू वक्राकार होऊन मागच्या बाजूला झुकतात. पाकळ्यांचा रंग हिरव्यापासून पिवळा आणि मग लाल होतो. मधल्या काळात त्यामुळे फुलं टोकाला लाल मध्यभागी पिवळी आणि खाली हिरवी दिसतात. या तिरंगी रंगसंगतीमुळे फुले सर्वाधिक सुंदर दिसतात. पुढे पिवळा आणि हिरवा रंग नाहीसा होत जातो आणि त्याची जागा हळू हळू लाल रंग घेतो. पाकळ्या मागच्या बाजूला वक्राकार झुकल्यामुळे फुले गोलाकार होतात आणि आतमध्ये पोकळी तयार होते. याचवेळी पुंकेसर आणि स्त्रीकेसर फलनासाठी तयार झालेले असतात. एव्हाना ऑगस्ट संपायला आलेला असतो आणि ऊन, पाऊस आणि वारा यांचा लपंडाव सुरु झालेला असतो. फुलपाखरं आणि इतर कीटक मनसोक्त फिरायला लागलेले असतात. बऱ्याचदा फुलपाखरे आणि कीटक फुलांच्या पोकळीत अडकतात आणि स्वतःला सोडवून घेण्याच्या खटाटोपात फुलाची हालचाल होते आणि परिणामी परागकण कुक्षीपर्यंत जाऊन पोहोचतात. या व्यतिरिक्त पावसाचे थेंब, पक्षी, वारा असे बरेचजण फलनाची प्रक्रिया सुरु होण्यासाठी मदत करतात. फलनानंतर ६-१२ सेमी लांबची फळे लागतात आणि ती परिपक्व झाली कि त्यातून लाल रंगाच्या बिया निसर्गात पसरतात. दरवर्षी हे चक्र असच सुरु असतं.
अग्निशिखा ही अत्यंत विषारी वनस्पती असून या वनस्पतीचा प्रत्येक भाग विषारी असतो. त्यातल्या त्यात कंद हे सर्वाधिक विषारी आहेत. विषाची तीव्रता इतकी जास्त असते कि चुकून खाण्यात आल्यास काही तासांत उलटया, जुलाब, लघवी वाटे रक्तस्राव होतो, कधी कधी स्नायू निकामी होतात, चेता संस्था बंद पडून मेंदूचे शरीरावरील नियंत्रण सुटते आणि मृत्यू ओढवतो. अग्निशिखा हि औषधी वनस्पती सुद्धा आहे. कॅन्सर, संधिवात, सर्पदंश, त्वचेवरील जखमा वैगेरे वरती हि उत्तम औषध म्हणून काम करते. कंदाचा अर्क स्रियांच्या प्रसूतीवेळी स्किनवर बाहेरून लावल्यास प्रसूतीकळा कमी होऊन प्रसूती सुकर होते असे मानन्यात आले आहे. आणि म्हणून मराठी मध्ये कळलावी असं नाव प्रचलित आहे. याच नावावरून आणखी एक समज प्रचलित आहे तो म्हणजे, ही वनस्पती घरात घेऊन आल्यास भांडणं लागतात. जनावरे बाजारात विक्रीसाठी नेण्याआधी अग्निशिखाची पाने चुरगळून त्यांच्या त्वचेवर लावतात. त्याने सूज येऊन जनावरे थोडी जास्त धष्ट -पुष्ट भासतात आणि त्यातून चांगली किंमत मालकाला मिळते. फुलांच्या पाकळ्या नागमोडी असल्याने आणि भडक रंगामुळे
"बचनाग" हे नाव सुद्धा प्रसिद्ध आहे. पूर्ण वाढ झालेली फुले वाघाच्या पंजासारखी भासतात आणि म्हणून इंग्रजी नावांमध्ये एक नाव "Tiger Claw" असे आहे.
Habitat: plant growing on Lantana camera bush |
अग्निशिखेला मराठीमध्ये आणखी काही नावे आहेत; कळलावी, इंदाई, बचनाग, खाद्यनाग, वाघचबका अशी बरीच काही. इंग्रजीमध्ये याला Glory Lily, Gloriosa Lily किंवा Tiger Claw असं म्हणतात. शास्त्रीय भाषेत याला Gloriosa
superba L. या नावाने ओळखत असून यांचा समावेश Colchicaceae या कुळामध्ये करण्यात आला आहे. शास्त्रीय नावामध्ये Gloriosa हा शब्द चमकदार अशा अर्थाने तर superba हा शब्द superior ovary (अंडाशय पाकळ्यांच्या वर असल्यास त्याला शास्त्रीय भाषेत superior overy म्हणतात) या अर्थाने आला आहे.
Plant Profile:
Botanical Name: Gloriosa
superba L.
Synonyms: Gloriosa
rothschildiana, Gloriosa speciosa, Gloriosa simplex
Common Name: Glory
Lily, Gloriosa Lily, Tiger Claw
Marathi Name: अग्निशिखा, कळलावी, इंदाई, बचनाग, खाद्यनाग, वाघचबका
Family: Colchicaceae
Habit: Climber
Habitat: Deciduous
forest, Grasslands (पानगळीची वने)
Flower Colour: Yellow
& Red (पिवळा
आणि लाल)
Leaves: Simple,
sessile, Lance shaped, 4-6 cm long and ends with tendril
Smell: No
Smell
Abundance: Common in Sahyadri ranges in deciduous
forests and grasslands.
Locality: Hadsar
Fort, Junnar Pune
Flowering Season: July to September
Date Captured: 29-Jun-2015
- - रा.जा. डोंगरे
खूप छान
ReplyDeleteधन्यवाद!
Deleteसुंदर व उपयोगी माहिती
ReplyDeletebeautifully written
ReplyDeleteChan mahiti
ReplyDeleteSo good and perfect. When I was a kid I saw those flowers with tribals in our area. They used to worship maa Gauri with those flowers in Ganesh Puja.
ReplyDeleteह्या वनस्पती बद्दल माहिती शोधत होतो. खूप छान वर्णन केलं आहे. धन्यवाद !
ReplyDeleteChan varnan kele aahe va upukt mahiti badal dhanyvad
ReplyDeleteखुप छान माहिती दिली आहे, पेनकिलर गोळ्यांमधील घटक शोधत असताना या ब्लॉग पर्यंत पोचलो...धन्यवाद
ReplyDeleteअग्निशिखा बद्दल खूप छान माहिती मिळाली, धन्यवाद!
ReplyDelete