Friday, 17 June 2016

Flowers: Hill Turmeric | Ranhalad (रानहळद), Shindalvani (शिंदळवानी) | Curcuma pseudomontana J. Graham

सध्या सर्वजण पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत! सर्व म्हणजे अगदी सर्वच! त्यामंध्ये आपल्यासारख्या माणसांसोबत पक्षी, प्राणी, कीटक, फुलपाखरे, वृक्ष, वेली आणि पहिल्या पावसावर उगवून येणारी रानफुलं सुद्धा! या रानफ़ुलांमध्ये काही फुलांचे कंद आणि बिया वर्षभर शांत जमिनीच्या आत पावसाची वाट पाहत बसलेले असतात. जून महिना सुरू झाला की अशा सर्वांनाच वेध लागतात पहिल्या पावसाचे. फरक मात्र एवढाच की माणसाला त्या भावना व्यक्त करता येतात आणि प्राणी, पक्षी किंवा रानफुलांना मात्र ती सोय नाही. सध्या सह्याद्रीच्या रांगांमधून काळे ढग वाऱ्यावर स्वार होऊन मुलूखगिरी करताना दिसतायेत आणि आपण सर्वजण टक लावून वाट पाहतोय त्यांच्या बरसण्याची. अर्थात एखाद दुसरी सर कोसळली आहे बहुतांश ठिकाणी आणि त्याचाच परिणाम म्हणून काही भागात पावसाळी रानफुलं आपलं डोकं वर काढू लागली आहेत.

या मौसमी फुलांमधलं आणि सह्याद्रीच्या शीरपेचातलं एक महत्वाचं रानफुलं म्हणजे "रानहळद", नावाप्रमाणे हीच वास्तव्य फक्त रानावनात, आणि तेही विशिष्ट उंचीवर. त्यामुळे किल्ले किंवा सह्यभटकंती करणाऱ्या रानवेड्यांना हिचं सौंदर्य काही नवखं नाही, अर्थात पण दरवर्षी रानहळद फुलली की, यापूर्वी कितीही वेळा हे फुल पाहिलं असलं तरी क्षणभर आपण "रानहळदी"जवळ रेंगाळतोच! हीच तर खरी रानहळदीची जादू आहे, जी प्रत्येकाला भारीत करते. रानहळद हे सह्याद्रीच्या शिरपेचातील महत्वाचं रानफुल आणखी एका कारणासाठी आहे आणि ते म्हणजे जगात ही फुलं फक्त सह्याद्रीच्या पश्चिम आणि पूर्व रांगांवर आढळते, अर्थात आपल्याकडे ती मोठया प्रमाणावर येते, पण जगाच्या दृष्टीने मात्र ती दुर्मिळ होण्याच्या मार्गावर आहे. तशी नोंद देखील आय.यु.सी.एन. रेड लिस्ट (IUCN Red List) मध्ये झाली आहे. याव्यतिरिक्त रानहळदीचं उगमस्थान हे भारत आणि चीन आहे, परंतु सध्या चीनमधून देखील रानहळद नाहीशी झाली आहे. त्यामुळे जगाच्या पाठीवर भारत हा एकमेव देश आहे जिथे रानहळद वाढते.

रानहळद ही पहिल्या पावसावर उगवून येणारी वनस्पती. पावसानंतर आठवड्याभरात डोंगरउतारावर आणि डोंगरांवरील पठारांवर केळीच्या पानांसारखे कोंब जमिनीतून बाहेर पडतात पंधरा दिवसांत बऱ्यापैकी पाने बाहेर निघतात आणि पानांच्या बाजूने १०-१५ सेमी लांबीचा गुलाबी किंवा जांभळ्या रंगाचा फुलोरा जमिनीलगत वाढतो. सुरवातीला हा फुलोरा पांढऱ्या आणि हिरव्या रंगाचा असतो. पुढे जाऊन खालचा भाग हिरवा आणि शेंड्याकडचा भाग गुलाबी किंवा जांभळ्या रंगाचा होतो. निरीक्षणपूर्वक पाहिल्यावर लक्षात येतं की या फुलोऱ्यावर सर्व फुले दाटीवाटीने वाढतात. प्रथमदर्शनी असं वाटत की गुलाबी किंवा जांभळ्या रंगाची फुले किंवा पाकळ्या असाव्यात पण ती फुले नसून परागण करण्यासाठी कीटकांनी आकर्षित व्हावं म्हणून निसर्गाने केलेली व्यूहरचना असते. पाकळ्यांसारखी भासणारी ती फुलांची संरक्षण दले (Bracts) असतात. या प्रत्येक पाकळीसदृश्य संरक्षणदलाच्या (Bracts) तळाशी २-३ गर्द पिवळ्या रंगाची फुले वाढतात. प्रत्येक फुल साधारणपणे ३ सेमीपर्यंत लांब आणि ४ सेमीपर्यंत रुंद असते. बाहेरून पाहिल्यास फुलांचा आकार ऑर्किडच्या फुलांसारखा भासतो. सुरवातीला सरंक्षण दले (Bracts) पांढऱ्या किंवा गुलाबी रंगांची असतात. पण पुढे जशी जशी फुले परिपक्व होतात, तसा संरक्षण दलांचा रंग गडद जांभळा होत जातो. या चमकदार रंगांमुळे कीटक आणि फुलपाखरे आकर्षित होतात आणि त्यातून परागीभवनांची प्रक्रिया पूर्ण होते. फळधारणा झाल्यावर गोल आकाराच्या छोट्या बिया बाहेर पडतात आणि रुजतात. पण, रानहळहिच्या बिया खूप कमी वेळ रुजण्यासाठी सक्षम असतात. मग प्रजातीची वाढ कशी होणार हा प्रश्न निर्माण होतो, अर्थात निसर्ग हा सर्वांचा विचार करणारा आहे. त्यामुळे त्याला सर्वांची काळजी असते. रानहळदीच्या मुळांवर हळकुंडाची वाढ होते, ही हळकुंड आलं किंवा आपल्या साध्या हळदीसारख्या दिसतात. या अगदी काही वर्षांपर्यंत जमिनीमध्ये तग धरून ठेऊ शकतात. चुकून एखाद्या वर्षी पाऊस कमी पडला तरी यांचं फारसं काही बिघडत नाही. अगदी थोड्याशा पावसावर देखील या लगेच रुजतात आणि पुढच्या पिढीच्या तयारीला लागतात. चुकून एखाद्या वर्ष पाऊस पडलाच नाही तरी या कंदांची क्षमता प्रचंड असते, त्यापुढील वर्षीच्या पावसात देखील ते चांगले रुजतात आणि स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवतात. निसर्गदेवतेची देणगी, आणखी काय!

रानहळदीला फांदी शक्यतो दिसत नाही कारण जमिनीपासून जी काही दिसतात ती फक्त पानं आणि फुलंच असतात. बऱ्याचदा तसा गैरसमजही होतो की रानहळदीला कदाचित फांद्या नसाव्यात, पण तसं नाही, रानहळदीच्या फांद्या या जमिनीत असतात. किंबहुना रानहळद प्रकारात मोडणाऱ्या सर्वच वनस्पतींच्या फांद्या या जमिनीखाली असतात. त्या आकाराने इतक्या लहान असतात की यातली हळकुंड कुठली आणि फांदी कुठली यामध्ये संभ्रम निर्माण होतो. रानहळदीची पाने ही साध्या हळदीसारखी किंवा कर्दळीच्या पानांसारखी असतात. साधारणपणे ३० सेमी लांब आणि ९-१० सेमी रुंद, टोकाला अगदी टोकदार असतात. पानांच्या कडा सबंध (continuous) असतात. गंमत म्हणजे रानहळदीला लागणारी हळद आतमधून पिवळ्या ऐवजी पांढऱ्या रंगाची असते परंतु सुगंध अतिशय तीव्र असतो.

रानहळदीला आयुर्वेदामध्ये प्रचंड महत्व आहे, कावीळ, महारोग, जुलाब किंवा हृदयाच्या संदर्भातील आजारांवर ही हळद अत्यंत गुणकारी आहे. हळदीचा लेप गरम करून सुज आलेल्या जागेवर लावल्यास लवकर आराम मिळतो. नवीन मुलाला जन्म दिलेल्या मातांना रानहळद उकडून खाल्याने दुधामध्ये वाढ होण्यास मदत होते. हळदीचा लेप डोक्यावर लावल्यास डोकं शांत होण्यास मदत होते. कच्ची हळद ही रक्तशुद्धीकरणावर सुद्धा प्रभावी आहे.

रानहळदीला मराठी मध्ये शिंदळवानी म्हणून देखील ओळखतात. इंग्रजीमध्ये रानहळदीला "Hill Turmeric" तर हिंदीमध्ये कचुरा म्हणून ओळखतात. यातील Hill हा शब्द या वनस्पतीचा आदिवास दर्शवतो. शास्त्रीय भाषेत " Curcuma pseudomontana J. Graham" असा नामोल्लेख रानहळदीसाठी आहे. यातील Curcuma हा शब्द Kurkum या अरेबिक शब्दापासून आलेला आहे, Kurkum म्हणजे हळद! आणि Pseudomontana शब्दाची फोड Pseudo+Montana अशी होते. यातील Pseudo या शब्दाचा अर्थ छोटा किंवा खोटा असा होतो आणि Montana हा शब्द स्पॅनिश भाषेतून आला असून त्याच अर्थ पर्वत असा आहे. एकंदर शास्त्रीय नावाचा अर्थ "छोट्या पर्वतांवर वाढणारी हळद" असा होतो. रानहळदीचा समावेश Zingiberaceae या कुळामध्ये होतो.

रानहळद सध्या जगामध्ये दुर्मिळ वनस्पतींच्या सूचीवर येण्याच्या मार्गावर आहे, सध्या ती फक्त भारतात आढळते. जागतिक स्थरावर तिला वाचवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. असे असताना भारतात मात्र याबाबत थोडीशी उदासीनता जाणवते. दक्षिण भारतात चहाचे मळे, कोकणात खाणकाम व्यवसाय, देशभर मोठया प्रमाणावर होणारी जंगलतोड, उन्हाळ्यात लागणारे आणि जाणीवपूर्वक लावले जाणारे असंख्य वणवे, डोंगरउतारावरील जमिनींवर होणारे अतिक्रमण, गुरेचराई या आणि अशा असंख्य कारणांमुळे रानहळद पृथ्वीवरून कायमची नाहीशी झाली तर नवल वाटणार नाही. अर्थात हिला वाचवणं देखील आपल्याच हातात आहे, त्यासाठी हवेत फक्त प्रामाणिक प्रयत्न!

Plant Profile:

Botanical Name: Curcuma pseudomontana J. Graham
Synonyms: NA
Common Name: Hill Turmeric
Marathi Name: Ranhalad (रानहळद), Shindalvani (शिंदळवानी)
Hindi Name: Kachura (कचुरा)
Family: Zigiberarceae
Habit: Herb
Habitat: Hill Top of deciduos forests on moist land (पानगळीची वने)
Flower Colour: Pink to violate (गुलाबीमिश्रित मंद किंवा गर्द जांभळा)
Leaves: Lance shaped, 30 cm in length, 9-10 cm wide, and margin entire with acute apex.
Smell: No Smell
Abundance: Vulnerable in World (as per IUCN Red list) however common in Sahyadri ranges in rains.
Locality: Hatakeshwar, Junnar, Rural Pune, MH
Flowering Season: Jun to Sept
Date Captured: 12-Jun-16