Close-up of flowers to show flower structure |
पावसाळा म्हटलं की वर्षासहलींना
उधाण येतं! हवशे नवशे गवशे सर्वचजण सुट्टीच्या दिवशी घाटमाथ्यांवर पाऊस अनुभवण्यासाठी
जातात. विशेषतः शहरी मंडळींचा वर्षासहलींसाठी विशेष ओढा असतो. असणारच! पावसात भिजण्याची
मजा काही औरच असते, या उभ्या पावसात किंवा सह्यद्रीच्या काड्यांवरून धो-धो वाहणाऱ्या
दुधाळ धबधब्यांखाली ओलं चिंब व्हायचं, आजूबाजूला गरमा गरम मक्याचा भुट्टा नाहीतर भजी
आणि वाफाळणाऱ्या चहावर ताव मारायचा हे आता पावसाळ्यातलं नेहेमीचं चित्र झालं आहे.
एरवी तसे हे घाटमाथे फारसे काही आकर्षक वाटत नाहीत,
खरं पाहता त्यांचं रूप काहीस भयावहच असतं. म्हणजे कधी दरीत डोकावताना चक्कर यावी इतक्या
खोल दऱ्या तर कधी घाटातून प्रवास करताना अगदी अंगावर येणारे कातळ कडे. यातल्या काही
दऱ्या आणि सह्यकडे हे हृदयाचा ठोका चुकवणाऱ्या असतात. घाटमाथ्यावरील माळरानंसुद्धा
एरवी अगदी ओसाड पडलेली असतात; वाळलेलं पिवळं गवत, सुकलेली तळी आणि जवळपास एखादा हिरव्या
गार जंगलाचा बुचका, थोडक्यात काय तर हे भाग एरवी तितके काही आकर्षक वाटत नाहीत. त्याउलट
पावसाची चाहूल लागली की, घाटाखालून उनाड वारा पावसाचे ढग घेऊन येतो, सह्याद्रीच्या
अजस्र काड्याना घाबरून हे ढग थोडे विसावतात आणि बरसायला लागतात. याचा परिणाम म्हणून
वर्षभर वाट पाहिलेली गवताची, वेलींची आणि रानफुलांची बीजं रुजू लागतात. एरवी भयावह
वाटणारा सह्याद्री या पावसाला भुलून कधी आपला रंग बदलतो हे आपल्यालादेखील लक्षात येत
नाही, सगळीकडे हिरव्या गार गवताचे गालिचे आणि त्यावर डोलणारी विविधरंगी रानफुले दिसू
लागतात. मधल्या काळात पाऊस इथे चांगलाच रमतो, सह्याद्रीची वने अगदी धुऊन काढतो, पावसासोबत
आलेलं धुकं सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांना अगदी व्यापून टाकतं. अर्थात हेच धुकं सह्याद्रीतल्या
इतर जैवसृष्टीला देखील भुरळ घालतं, त्यात शिळकरी कस्तुर सारखे सुरेल गायकपक्षी सुद्धा
सामील होतात; मग मानवी मनाला या सर्व गोष्टींची भुरळ पडली नाही तर नवलंच!
अशा या सह्याद्रीच्या अल्लड पावसाचा आणि धबधब्यांचा
अनुभव घेण्यासाठी आपण घाट परिसरात दरवर्षी न चुकता जातो. याच पावसाच्या सुरुवातीला
काही दुर्मिळ रानफुलं घाटमाथ्यांवर फुलतात, आज ही रानफुलं आपलं अस्तित्व टिकवण्याच्या
धडपडीत आहेत, त्यातली काही तर अखेरचा श्वास घेत आहेत. सह्याद्रीतल्या याच दुर्मिळ ठेव्यातलं
एक रानफुलं म्हणजे "फुलबाजी". फुलबाजीचं अस्तित्व सध्या काहीसं धोक्यात आलेलं
आहे! सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये अगदी मोजक्या ठिकाणी ही फुले आज रोजी दिसतात.
जगात फक्त भारतात या फुलांच्या नोंदी आहेत आणि त्याही नगण्य ठिकाणी. सह्याद्रीमध्ये
सुद्धा ही रानफुलं आता खूप दुर्मिळ झाली आहेत.
Rosate type of leaves & the way they grow |
फुलबाजी हे शक्यतो पहिल्या पावसावर उगवून येणारं रानफुल.
जमिनीमध्ये हिचे कंद खोल वर्षभर जिवंत असतात. पहिला पाऊस पडला की हे सुप्त अवस्थेतील
कंद पुनरुज्जीवित होतात आणि जमिनीलगत गर्द आणि मांसल हिरवी पानं जमिनीतून माती अलगत
बाजूला करून डोकावतात. एकदा का पावसाचे काही थेंब या पानांवर पडले आणि सह्याद्रीचा
गारवा झोंबू लागला की यांच्या वाढीची गती वाढू लागते. अगदी पंधरा दिवसांत ८-१० पाने
जमिनीतून पूर्ण वाढ होऊन बाहेर पडतात. पाऊस वेळेवर सुरू झाला तर साधारणपणे जून महिन्याच्या
शेवटपर्यंत सर्व कंद व्यवस्थित रुजतात आणि १५ दिवसांत पानांची व्यवस्थित वाढ होते.
वरून पाहिल्यास पानांची रचना ही फुलाच्या पाकळ्यांसारखी
भासते, इंग्रजीमध्ये या रचनेला rosate असे म्हणतात. पानं अगदी जमिनीलगत एकाड-एक, वक्राकार
जोडणीने आणि दाटीवाटीने लागतात, त्यामुळे वरून पाहिल्यास एखाद्या फुलाच्या पाकळ्यासारखी
ही रचना भासते. प्रत्येक पानं हे साधारणपणे १५-६० सेमी लांब आणि ३-५ सेमी रुंद, पात्यासारखं
लांब, मांसल, गर्द हिरवं आणि शेंड्याकडची बाजू टोकदार असते. पाने जमिनीतून निघाल्यानंतर
अर्धवक्राकार होऊन टोकाकडची बाजू पुन्हा जमिनीकडे झुकते. फुलबाजीच्या फांद्या वर वर
पाहता आपल्याला दिसत नाहीत, त्या जमिनीच्या आत असतात. कंद आणि पानांच्या मधला भाग म्हणजेच
फांदी, हा भाग फक्त काही सेमीचा असतो, वरवर
पाहून लवकर लक्षात येणार नाही इतका छोटा.
एकदा का पाऊस बऱ्यापैकी पडू लागला की जमिनीच्या आतून,
फांदीवर आणि फुलासारखी रचना असणाऱ्या पानांच्या बरोबर मधून एक दांडा (Peduncle) बाहेर
पडतो. बऱ्याचदा यालाच फांदी समजले जाते परंतु तसे नसून हा दांडा म्हणजे फुलोऱ्याचा
डोलारा सांभाळणारा आधारस्तंभ असतो. हा दांडा साधारणपणे २-३ फुटांपंर्यंत लांब आणि ५-८
मिमी जाडीचा असतो, यावर पांढऱ्या रंगाचा पिठाळ थर असतो. या दांड्यावर ठराविक अंतरावर
छोटी पाने वाढतात, आणि अगदी टोकावर ३० - ५० फुलांचा फुलोरा लागतो. फुलोऱ्याची लांबी
साधारणपणे ३० सेमीपर्यंत असते. यामध्ये फुलांच्या बहुधा २-३ च्या जोड्या असतात, अर्थात
कधी कधी संख्या कमी जास्त असू शकते. प्रत्येक कळी ही साधारणपणे अर्धा ते एक सेमी लांबीची
असते, रंग पांढरा परंतु टोकाकडे तो खाकी किंवा काहीसा पिवळा होत जातो. कळीच्या खालच्या
बाजूला संरक्षण दले असतात आणि त्याखाली मुख्य दांडीला जोडणारी ४-५ मिमीची आणखी एक दांडी
असते. या छोट्या दांडीचा रंग देखील खाकी किंवा पिवळा असतो. अक्षावर जिथे या कळ्या एकत्रित
जोडलेल्या असतात तिथे आणखी एक खाक्या रंगाचं संरक्षणदल वाढतं. फुलांचे हे छोटे झुपके
मुख्य अक्षावर एकाड-एक पद्धतीने जोडलेले असतात. कळ्या योग्य वातावरण भेटलं की फुलू
लागतात आणि वाऱ्याच्या तालावर डोलू लागतात.
Habitat: Growing on typical slope of hill top |
फुलबाजीच्या फुलांची रचना
ही अतिशय साधी असते. फुले बहुधा घंटीसारख्या आकाराची असतात. फुलांची लांबी साधारणपणे
१ सेमी पर्यंत असते. सहा पांढऱ्या रंगाच्या पाकळ्या आणि प्रत्येक पाकळीच्या टोकाला
खाक्या रंगाचा टिळा असतो. फुलाच्या मध्यभागातून सहा पुंकेसर आणि एक स्त्रीकेसर वाढतो,
यातील पुंकेसराचे तंतू (filaments) पांढऱ्या रंगाचे आणि परागकोष (anther) पिवळ्या रंगाचे
असतात. पुंकेसर परिपक्व झाले की त्यातून परागकण बाहेर पडतात. पावसाचे थेंब परागीभवनामध्ये
विशेष कामगिरी बजावतात. पावसाचा थेंब परागकोशावर पडला की त्यातून काही परागकण उडून
स्रिकेसरापर्यंत पोहोचतात आणि फलनाची (fertilisation) ची प्रक्रिया सुरू होते. कधी
कधी पाऊस हुलकावणी देतो, अशा वेळी फुलपाखरे, मधमाशा, भुंगे आणि सूर्यपक्षी ती कामगिरी
बजावतात. साधारणपणे जुलैच्या शेवटपर्यंत फळधारणा होते.
सुरवातीला फळांचा रंग हा
हिरवा असतो, फळे लंबगोलाकार असून साधारणपणे अर्धा सेमीपर्यंत वाढतात आणि त्यांचे विभाजन
तीन समभागांत झालेले असते. हे तीन भाग बाहेरून खाचांच्या रूपाने स्पष्ट दिसतात. फळे
परिपक्व झाली की रंग बदलून खाका किंवा तांबूस होतो आणि उन्हामुळे फुटून बीजप्रसार होतो.
फुलबाजीची झाडे बहुधा एकमेकांच्या अगदी जवळ जवळ वाढतात त्यामुळे बऱ्याचदा एका झाडाचा
फुलोरा दुसऱ्या झाडाच्या फुलोऱ्यावर आदळतो आणि त्यातूनदेखील बीजप्रसार किंवा परागीभवन
होण्यास मदत होते. फुलबाजीच्या बिया जास्त काळ रुजण्यासाठी योग्य नसतात, त्यामुळे बियांमधून
नवीन पिढी खूपच कमी प्रमाणात तयार होते. त्यामुळे निसर्गाने फुलबाजीच्या कंदांमध्ये
विशिष्ठ ताकद दिली आहे, हे कंद काही वर्षांपर्यंत जमिनीत तग धरून राहू शकतात आणि योग्य
परिस्थतीतला तात्काळ रुजतात.
फुलबाजी ही वनस्पती सध्या
अस्तित्वाची लढाई लढत आहे, काय कारण असेल त्यासाठी? खरं कारण आहे मोठ्या प्रमाणात निसर्गातील
मानवी हस्तक्षेप! फुलबाजीचा मुख्य आदिवास आहे सह्याद्रीचे डोंगरउतार, मानवाने हे डोंगरउतार
शक्य तितके सपाट केले तेही तेथील दुर्मिळ वनस्पतींचे स्थलांतर दुसरीकडे न करता. त्यात
फुलबाजी ही औषधी वनस्पतीदेखील आहे, हिचे कंद शक्तिवर्धक म्हणून वापरले जातात. खूप ठिकाणी
मोठ्या प्रमाणावर हे कंद काढून घेतले गेले आणि त्याचा परिणाम म्हणून देखील फुलबाजीची
संख्या अत्यल्प होत गेली.
फुलबाजीला शास्रिय भाषेत
Chlorophytum bharuchae Ansari,
Sundararagh. & Hemadri अशा नावाने ओळखतात
आणि तिचा समावेश Liliaceae या कुळामध्ये केला गेला आहे. आपल्या वर्षासहलींमध्ये चुकून
आपल्याला फुलबाजी दिसली तर तिचे नुकसान आपल्याकडून होणार नाही याची काळजी घ्यावी. एखादा
कंद चुकून कुणी काढला असेल तर तो कुठेतरी जमिनीत पुन्हा पुरून टाका. असे केल्याने तुम्हा
आम्हाला थोडा त्रास कदाचित होईल पण निसर्गदेवता दोन्ही हातांनी आपल्याला भरभरून आशीर्वाद
देईल आणि आपलं जीवन सर्वार्थाने समृद्ध करेल यात कुठलीही शंका नाही!
Fruit Structure showing clear lobes and size |
- राजकुमार डोंगरे
Plant
Profile:
Botanical Name: Chlorophytum bharuchae
Ansari,
Sundararagh. & Hemadri
Synonyms: NA
Common Name: NA
Marathi Name: Fulbaji
(फुलबाजी)
Hindi Name: NA
Family: Liliaceae
Habit: Herb
Habitat: On the
slope of hill tops (डोंगर उतार)
Flower Colour: white
(पांढरा)
Leaves: Radical,
Linear, 15-60 cm with acute apex.
Smell: No
Smell
Abundance: Rare
on slope of hill tops
Locality: Narayangad
& Shivneri Fort, Junnar, Rural Pune, MH
Flowering Season: Jun to Jul
Date Captured: 12-Jul-15