Sunday, 28 February 2016

Butterfly: Pea Blue / Long-Tailed Blue | Lampides boeticus

मराठी नाव: उपलब्ध नाही
English Name: Pea Blue / Long-Tailed Blue
Scientific Name: Lampides boeticus

Family: Lycaenidae

वर्णन:

भारतातील छोट्या फुलपाखरांमधील हे एक! पी ब्लू (Pea Blue)! फुलपाखरू म्हटलं की सौंदर्य आपसूक येतं.

'पी ब्लू'च्या पंखांचा विस्तार साधारणपणे २२-३२ मिमी. असतो. नर आणि मादी बहुधा सारख्याच आकाराचे असतात. दोघांच्याही पंखांची वरची बाजू निळसर रंगाची असते. परंतु दोघांमधील मुख्य फरक म्हणजे, नराच्या मध्यभागापासून पंखांच्या काडांकडे निळसर रंग पुसट होतो आणि त्याची जागा करडा रंग घेत जातो. पंखांची किनार विटकरी (Maroon) रंगाची असते. याउलट मादीच्या पंखांची वरची बाजू पूर्णपणे चमकदार निळ्या रंगाची असते, विशेषतः पंखांची उघडझाप करताना हा चमकणारा रंग अधिक स्पष्ट आणि उठून दिसतो. दोघांच्याही मागच्या पंखांच्या तळाशी दोन काळ्या रंगाचे ठळक ठिपके असतात. याच ठिपक्यांपासून ठळक किरमिजी रंगाची - मिमी लांबीची नागमोडी शेपटी निघते.

नर आणि मादीच्या पंखांची खालची बाजू फिक्कट किरमिजी (Maroon) रंगाची असते, त्यावर ठळक किरमिजी रंगाचे आडवे पट्टे असतात. हे पट्टे मधे मधे पांढर्या रंगांच्या रेषांनी वेगळे झालेले दिसतात. मागच्या पंखांच्या शेवटी, शेपटीजवळ पुन्हा दोन ठळक काळ्या रंगांचे ठिपके असतात. यातील एक ठिपका आकाराने मोठा तर दुसरा आकाराने थोडा लहान असतो. मोठ्या ठीपक्याभोवती नारंगी (Orange) रंगाची किनार असते.

या फुलपाखराच्या नावामध्ये 'पी (Pea)' चा उल्लेख आहे. हा शब्द या फुलपाखराच्या सवयींचा निर्देश करणारा आहे. 'पी ब्लू' सहसा Pea म्हणजेच वाटाण्याच्या कुळातील फुलांवर आणि शेंगांवर आपलं जीवनचक्र पूर्ण करतात. फुलपाखरं आपली अंडी बहुधा रानताग (Crotalaria mucronata) या वनस्पतीच्या पानांवर किंवा फुलांवर घालतात. अंड्याचा आकार साधारणपणे मिमीपर्यंत असतो. साधारणपणे दिवसांत पिवळसर हिरव्या रंगाची आळी बाहेर येते. पुढील दोन दिवस ही अळी अखंडपणे रानतागाची पाने, फुले आणि शेंगा खात असते. या दोन दिवसांत अळीवर लहान मुलायम केस येतात आणि किरमिजी रंगाच्या रेषा दिसू लागतात. यानंतर आळी स्वतःभोवती कोश विणते आणि आतमध्ये स्वतःला कोंडून घेते. आणखी दोन दिवसांत आशेचे पंख घेऊन त्यातून सुंदर फुलपाखरू जन्म घेते.

2 comments:

  1. मराठीत अशी माहिती अगदीच थोडी उपलबद्ध असेल. खूप गरजेचं आहे असं शास्त्रीय व मनोरंजक माहिती मराठीतून उपलब्ध करणे! पब्लॉग च्या पहिल्याच लेखाने खूप अपेक्षा उंच नेल्या आहेत. शुभेच्छा!!!😊😊अवधूत खरमाळे.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद अवधूत दादा, मराठी ही ज्ञानभाषा होण्यासाठीच हे पाहिलं पाऊल आहे

      Delete