Sunday, 20 March 2016

Birds - Rufous Treepie | (टकाचोर - Takachor) | Dendrocitta vagabunda Lathum

स्वानुभव:

निसर्ग आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकवत असतो, अगदी रोजच! फक्त आपण त्याकडे त्या दृष्टीने पाहायला हवं. साधारणपणे दीड वर्षापूर्वी मला पुण्यातील वेताळ टेकडीवर एक सुंदर पक्षी दिसला, फिरून आल्यावर सुभाषला (पक्षिमित्र) फोन करून वर्णन सांगितले, दोन-तीन नावं सुभाषने अंदाजाने सांगितली. मीसुद्धा लगेच इंटरनेटवरील माहिती आणि फोटोज बघून खात्री केली. सुभाषचा अंदाज खरा ठरला, सांगितलेल्या नावांपैकी एका नावावर शिक्कामोर्तब झाले. पक्षी होता "टकाचोर" इंग्रजीमध्ये महाशयांना Rufos Treepie म्हणून ओळख होती. नवीन काहीतरी ज्ञानकोशात सामील झाल्याचा ओतप्रत आनंद होता, नाराजी होती ती फोटोग्राफ मिळाल्याची.

तिथपासून आजपर्यंत (दीड वर्ष) खूप वेळा मी कॅमेरा घेऊन टेकडीच्या वाऱ्या केल्या पण महाशयांनी फोटो घेण्याची संधी काही दिलीच नाही. खुपदा जोडीने दिसायचे, कधी झाडीतून आवाज द्यायचे, कधी डोक्यावरून मस्त उडत दूर जायचे आणि लुप्त व्हायचे, माझा हातात आशेने त्यांच्याकडे पाहण्याशिवाय काहीच नसायचं. मी वाट पाहत होतो ती योग्य संधीची!


आज सकाळी ठरवून काही रानफुलांचे फोटो काढण्यासाठी टेकडी जवळ केली, सगळे फोटो घेऊन खाली उतरताना अचानक महाशयांनी झाडीतून आवाज दिला. घड्याळाकडे नजर टाकली, वेळ होता थोडासा, मग काय म्हटलं बघू प्रयत्न करून. आवाजाचा अंदाज घेत दबक्या पावलांनी झाडीत घुसलो, महाशय नजरेच्या टप्प्यात आले, पण फोटो मिळवण्यासारखी योग्य परिस्थिती मिळेना. झाडांच्या फांद्या आणि पाने मधे येत होती. तासभर हेच नाटक सुरु होतं, वैतागून आता जाव घरी असं कुठतरी वाटत होतं पण म्हटलं शेवटची दहा मिनिटं थांबून बघू. कपाळावरचा घाम रुमालाने टिपला, कॅमेरा उगाच एकदा बंद करून पुन्हा सुरु केला आणि संधीची वाट पहात बसलो.

 दहा मिनिट होऊन गेलेली, आता मात्र माझा धीर सुटत चालला होता. कॅमेरा बंद झाला, आणि अचानक समोर कोतवाल (Black Drongo) माझ्या मदतीला धावून आला. कोतवालाने महाशयांना त्यांच्या जागेवरून हकललं आणि हा टकाचोर अगदी माझा पुढ्यात येउन बसला. आनंदाला आवर घालून, हळूच कॅमेरा पुन्हा बाहेर काढला आणि सुरु करून मनसोक्त फोटोज घेतले.

सर्व फोटोज घेतल्यावर लहानपणी आईकडे स्वयंपाकघरात जेवणासाठी हट्ट करायचो तेव्हा "धीर धर, धीर धर" असं सांगायची. तेव्हाची शिकवण आज कामाला आली असं कुठेतरी खोलवर मनात वाटत होतं! आईला तिच्या या शिकवणीसाठी मनोमन धन्यवाद देत आनंदाने टेकडी उतरलो. संधी कधीकधी आपला अंत पाहते पण ती मिळणार हे नक्की असते. हवा फक्त थोडासा धीर!


टकाचोरबद्दल थोडंसं:

टकाचोर आणि आपल्या आजूबाजूला नेहमी दिसणारा कावळा हे एकाच कुळातले, टकाचोरला पाहताना ते थोडंसं जाणवतं देखील. परंतु, कावळा हा पक्षी लोकांना फारसा काही आवडत नाही, तसं कारणही नाही आवडण्याचं . हा आधीच कोळशासारखा काळा कुळकुळीत आणि त्यावर त्याचा आवाजही कर्णकर्कश. टकाचोर मात्र या दोन्ही गोष्टींमध्ये अगदीच वेगळा आहे. दिसायला तर हे महाशय सुंदर आहेतच पण गातात सुद्धा सुरात.

आकाराने टकाचोर कावळ्यापेक्षा थोडासा लहान आणि सडपातळ पक्षी आहे. नर आणि मादी बर्यापैकी सारखेच दिसतात. डोक्याचा आणि मानेचा रंग पूर्ण काळा, मानेपासून खाली मंद तपकिरी आणि पुन्हा शेपटी निळसर करड्या रंगाची असते. चोचीचा रंग काळा असून टोकाला ती गळासारखी अर्धवक्राकार असते. समोरच्या बाजूने पाहिल्यास शेपटीवर काळा आणि निळसर करड्या रंगाचे प्रत्येकी दोन पट्टे दिसतात. पंखांवर बाहेरच्या बाजूने काळ्या रंगाची कड आणि त्याला लागून लगेच पांढऱ्या रंगाची पट्टी असते आणि पुढे पुन्हा मग तपकिरी रंग येतो. या हटके रंगसंगतीमुळे टकाचोर अगदी उठून दिसतो. सौंदर्यामध्ये आणखी एक भर पडते ती शेपटीच्या लांबीमुळे. टकाचोरची शेपटी ही मुख्य शरीराच्या दीड पट लांब असते.


टकाचोर हा पक्षी बहुधा पानगळीच्या किंवा हरित वनांमध्ये राहणे पसंत करतो, कधीकधी शेतांमधे झाडांवरदेखील हे वस्तीला असतात. उंच झाडांवर खोडांमधे काड्यांच्या सहाय्याने तो आपली घरटी बनवतो, घरटी काहीशी उथळ असतात, प्रत्येक घरट्यात साधारणपणे ३-५ अंडी घातली जातात. विणीचा हंगाम हा एप्रिल ते जून महिन्यांदरम्यान असतो.

टकाचोर हा शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारचे अन्न खातो, त्यातल्या त्यात झाडांवर लागलेली फळे आणि फुले हे यांचे मुख्य अन्न. झाडांच्या फांद्यांवर फिरणारे लहान सरपटणारे प्राणी, इतर पक्षांची अंडी, मधमाशा आणि पाकोळ्यांवरदेखील ते गुजराण करतात. बर्याचदा ताजं मांस पडलेलं असल्यास त्यावर हे समूहाने ताव मारताना दिसतात. कधी कधी एकत्रित येउन शिकार सुद्धा करतात. फांद्यांवरून उड्या मारत फिरणं आणि लहान फांद्यांवर उलटं लटकून फुले फळे खाण्यामध्ये हे अगदी पारंगत आहेत. गमतीची बाब म्हणजे कावळ्यांप्रमाणे यांच्यामध्ये देखील अन्न जमा करून लपवून ठेवण्याची सवय आहे, नंतर ते सापडतं की नाही हा भाग मात्र वेगळा.

दक्षिण भारतामध्ये सुपारी आणि इतर पिकांवरील किडी हा खातो आणि म्हणून शेतकऱ्यांचा मित्र म्हणून याची चांगली ओळख आहे. टकाचोर हे खूप वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढतात पण त्यातले दोन आवाज अगदी नेहमीचे आणि सुरेल आहेत.

टकाचोर हा भारतीय पक्षी आहे त्यामुळे आपल्याकडे बहुधा तो सगळीकडे दिसतो. इंग्रजीमध्ये महाशयांना Rufous Treepie या नावाने ओळखतात तर शास्रीय भाषेत Dendrocitta vagabunda Lathum अशा नावाने ओळखतात. हे पक्षी Corvidae या कुळामध्ये येतात.



Bird Profile:

Scientific Name: Dendrocitta vagabunda Lathum
Synonyms: Dendrocitta rufa
Common Name: Rufous Treepie
Marathi Name: Takachor (टकाचोर)
Family: Corvidae
Abundance: Common
Locality: Vetal Hills, Pune, MH

Date Captured: 19-Mar-16

Saturday, 12 March 2016

Flowers: Water Snowflake | (कुमुद - Kumud) | Nymphoides indica (L.) Kuntze

सौंदर्य हे मानवी मनाला नेहमीच भुरळ घालत असतं. उन्हाळ्यात राक्षसी वाटणारे सह्यकडे पावसाळ्यात मात्र हिरव्यागार गवतामुळे लोभसवाणे दिसतात, आणि त्यावर रंगीबरंगी फुलांचे ताटवे फुलले की, पृथ्वीवर स्वर्ग अवतरल्याचा भास होतो. सह्याद्रीतील माळरानांवर शरद ऋतूमध्ये रंगांचा लपंडाव सुरु होतो, दर पंधरा दिवसांनी माळरानांचे रंग बदलत जातात. हा सोहळा अनुभवताना आपलं मन अगदी आनंदानं भरून वाहतं.

तशी सह्याद्रीच्या अंगा-खांद्यावर वाढणारी बरीचशी रानफुले सुंदर आणि वैशिष्ठ्यपूर्ण असतात, पण त्यातलि काही खूपच वेगळी आणि रूपवान आहेत, एवढी रूपवान की आश्चर्याचा धक्का बसावा. असंच एक सौंदर्याची परिसीमा असणारं रानफुल म्हणजे "कुमुद". हो, नावही तितकंच सुंदर आहे! यांची वस्ती शक्यतो सह्याद्रीच्या पठारांवर आणि विशेषतः जिथे स्वच्छ पाण्याची उथळ तळी आहेत अशा ठिकाणी असते. कुमुदचं तळ्यातील जाळं एवढं दाट असतं की संपूर्ण तळ्यावर यांचच आधिपत्य असल्याचा भास होतो.

कुमुद ही तशी पाण्यातील वनस्पती, त्यामुळे साहजिकच उथळ पाण्यामध्ये आणि मोकळा गाळ असलेल्या ठिकाणी चांगली वाढते. त्यात अधिवास पाण्यात असल्यामुळे मुळं जास्त लांबवर पसरत नाहीत. कुमुदच खोड अतिशय लहान, अगदी निरीक्षण करून देखील लक्षात येणार नाही एवढ लहान आणि तेही पाण्याच्या तळाशी गाळात रुतलेलं असतं. चुकून कधी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आणि तळ्यातील पाणी सुकलं तर हे खोड गाळात तग धरून रहातं. पुन्हा जेव्हा पाउस पडून तळ्यात पाणी भरलं जातं तेव्हा नव्याने अंकुर फुटतात आणि दुष्काळी परिस्थितीतून सुटका होते. शेवटी निसर्गच सर्वांचा विघ्नविनाशक! खोडाच्या खालच्या बाजूला मुळे तर वरच्या बाजूला पाने लागतात. पानांची रचना एकत्रित वरून पाहिली तर फुलासारखी वाटते. पानांचे देठ - सेमी लांबीचे असून हिरवे गार, मांसल आणि वजनाने हलके असते. पानं देखील हिरवी गार, आकाराने मोठी आणि बदामी (Heart Shapped) असतात. लांबी साधारणपणे १५-२० सेमी आणि रुंदी १५ सेमी पर्यंत असते. बहुधा पानांची किनार एकसंध पण कधीकधी दातेरी सुद्धा असते. पानांच्या खालच्या बाजूला लहान मोठे फोड असतात, या फोडांमध्ये हवेची पोकळी असते आणि त्यामुळे ही पाने नेहमी पाण्यावर तरंगतात. पानांच्या या तरंगण्यामुळे इंग्रजीमध्ये कुमुदला "Floating Heart" या नावाने देखील ओळखले जाते.

कुमुदची फुले कमालीची सुंदर असतात, खोडातून हिरव्या रंगाचा मांसल देठ वाढतो आणि त्यावर साधारणपणे - सेमी व्यासाचे पांढर्या शुभ्र रंगाचे फुल लागते. प्रत्येक फुलात सहा पाकळ्या असतात, विशेष गोष्ट अशी की प्रत्येक पाकळीच्या किणारीवर पांढर्या रंगाचे दाट केस असतात, या शुभ्र केसांमुळे कुमुदच्या सौंदर्यामध्ये कमालीची भर पडते. हे केस परागीभवनाच्या प्रक्रियेमध्ये देखील मदत करतात; मधमाशा, फुलपाखरे किंवा पक्षी आकर्षित होतात ते यामुळेच. फुलाचा मध्यभाग पिवळ्या रंगाचा असतो, यातून सहा पुंकेसर बाहेर पडतात आणि ते पाकळ्यांच्या तळाशी जोडलेले असतात. परागकोश (Anther) करड्या रंगाचे असून स्रिकेसर हे पुंकेसारांच्याही खाली असतात, वरवर पाहता ते चटकन दिसून येत नाहीत. स्रिकेसर आणि पुंकेसर परिपक्व झाले की, पुढे प्रजननाची प्रक्रिया पूर्ण होऊन फळे लागतात.. फळं लंबगोलाकार असून त्यावर छोटे केस असतात. फळांतून बियांचा प्रसार होऊन नवीन रोपं रुजतात.

बिया रुजून नवीन रोपं तयार होत असली तरी इतर मार्गांनी देखील पुनर्निर्मितीची प्रक्रिया सुरु असते. एका खोडापासून नवीन शाखा निघते, वाढते आणि थोड्या अंतरावर जाउन रुजते आणि नवीन झाडाची निर्मिती होते. अशाच प्रकारे जमिनीतून मुळापासून काही शाखा निघतात आणि जमिनीतून काही फुटांचा प्रवास करून रुजतात. याहीपलीकडे, कुमुदच्या खोडावर काही विशिष्ठ प्रकारच्या अवयवांची (Bud) ची वाढ होते, यांची पूर्ण वाढ झाली की मुख्य झाडापासून ते वेगळे होतात आणि स्वतंत्र झाड म्हणून देखील वाढतात. निसर्गाच्या अशा विविध पुनर्निर्मितीच्या प्रक्रिया पाहून मन थक्क होऊन जाते.

कुमुदची फुलं पाहिली की ती कमळाचीच फुल असल्यासारखा भास होतो. कारणही तसच आहे; फुलांची, पानांची आणि इतर सर्वच रचना ही कमळासारखी आहे. पण कुमुद आणि कमळ यांचा काहीही संबंध नाही, ही दोन्ही एकमेकांपेक्षा अतिशय वेगळी झाडे आहेत.

कुमुदला इंग्रजीमध्ये "Water Snowflake" अशा नावाने देखील ओळखतात. फुलांनी जेव्हा संपूर्ण तळं भरून जातं तेव्हा पाण्यावर हिमवर्षाव झाल्याचा भास होतो आणि म्हणून इंग्रजी नावामध्ये Snowflake असा शब्दप्रयोग आला आहे. कुमुदला शास्रीय भाषेत "Nymphoides indica (L.) Kuntze" अशा नावाने ओळखतात. Nymphoides हा शब्द Nymphaea शब्दापासून आला आहे. Nymphaea म्हणजे कमळ आणि कुमुदचं कमळाशी असलेलं साधर्म्य दर्शवणारा शब्द म्हणून Nymphoides असा शास्रीय नावामध्ये उल्लेख दिसतो. कुमुद हे Menyanthaceae या कुळातील आहे.



Plant Profile:

Botanical Name: Nymphoides indica (L.) Kuntze
Synonyms: Nymphoides humboldtiana, Nymphoides indicum
Common Name: Floating Heart, Water Snowflake
Marathi Name: Kumud (कुमुद)
Family: Menyanthaceae
Habit: Herb
Habitat: Grasslands on hilltop
Flower Colour: White
Leaves: Simple
Smell: No
Abundance: Common
Locality: Durgawadi, Junnar, Rural Pune, MH
Date Captured: 14-Sep-14