एक तुतारी द्या मज आणुनी
फुंकीन मी जी स्वप्राणाने
भेदुनि टाकिन सगळी गगनें
दीर्ध जिच्या त्या किंकाळीने
ही तुतारीची फुलं मोठी चमत्कारिक; इतरांचा दिवस संपला की यांचा सुरु होतो. म्हणजे तिकडे सूर्यनारायणांनी निरोप घेतला की यांची उमलण्याची लगबग सुरु होते. अंधार पडेपर्यंत जवळ जवळ सर्व फुले उमलतात. रात्री चंद्राचा प्रकाश शोषून घेऊन ही पांढरी फुलं आणखी शोभिवंत दिसतात. त्यात पठारावर फुलांची पेरण दाट असेल तर शब्दात वर्णन करता येणार नाही असं चित्र असतं. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात ढगांच्या आशीर्वादाने चंद्रप्रकाश नशिबी आलाच तर सह्याद्रीच्या डोंगररांगांच्या पठारांवर हमखास जाऊन हा सोहळा अनुभवावा.असा अनुभव मी दोनदा घेतला आहे; एकदा जुन्नरच्या नाणेघाटाजवळ तर एकदा हडसर किल्ल्याजवळ! आयुष्यभर लक्षात राहील असं दृश्य होतं ते. सायंकाळी फिरणारी फुलपाखरं, पतंग (Moth) आणि वटवाघळांना ही फुलं सापडण्यास मदत व्हावी म्हणून कदाचित निसर्गाने या फुलांना सफेद रंग बहाल केला असावा!
तुतारी रात्री उमलत असल्याने फारशी प्रचलित
नाही. त्यातल्या त्यात सध्याच्या सोशल मीडियावरसुद्धा हिला फारशी प्रसिद्धी सुद्धा
मिळालेली दिसत नाही. फुलं कितीही सुंदर असली तरी ही वनस्पती दोन कारणांसाठी बदनाम आहे.
पहिलं म्हणजे, ही काहीशी परोपजीवी आहे. आपली मुळं अलगद इतर गवतांच्या मुळांत रोवायची
आणि त्यातून गुपचूप आपलं पोट भरत राहायचं हा हिचा स्वभावदोष. आणि दुसरं म्हणजे भात-खाचरांत
भातावर पोट भरल्यामुळे शेतकऱ्यांच्या शिव्याशापाला हिला सामोरं जावं लागतं.
असो, मला खरं कौतुक वाटतं ते रानफुलांच्या
मराठी नाव देणाऱ्या कल्पक व्यक्तींचं! या फुलास पाहिल्यावर तुतारीची आठवण होणार नाही
असं होऊच शकत नाही. हुबेहूब तुतारीच. ही वनस्पती फार फार तर एक फुटापर्यंत वाढते. पानं
मधल्या खोडावर एकमेकांच्या विरुद्ध वाढतात. पानं पर्णिकांच्या एकत्र येऊन बनतात. या
पर्णिका सुईला बहीण शोभाव्या इतक्या पातळ आणि सरळ. संपूर्ण पान पाहिलं तर अशा अनेक
सुया एकत्र येऊन जाळी तयार झल्याचा भास होतो. पानाच्या देठाची जिथे थोडाशी भेट होते
अगदी बरोबर तिथूनच फुलाची नळी निघते. याच ठिकाणी फुलाला आधार देणारी पाच हिरव्या रंगाची
आणि एखाद सेमी लांबीची संरक्षणदले (निदलपुंज) असतात. फुलांची नळी पाकळ्यांच्या दिशने
जाड होत जाते. त्यावर बारीकशी भुरक्या रंगाची लव असते. दीड-दोन सेमीच्या नळीच्या तोंडाला
पाच पाकळ्या दिसतात. या पांढऱ्या शुभ्र पाकळ्या एकमेकांचा हाथ पकडून फेर धरावा ताशा
खाली जोडलेल्या असतात. बरोबर मध्यभागी पुंकेसर नळीतून डोकावताना दिसतो. त्याच्या मुळाशी
श्रीकेशरांची रचना असते.
नमूद केलेली दोन कारणे सोडली तर या सुंदर फुलांच्या
कुणीही प्रेमात पडेल. तुतारीला Rice Vampireweed असं इंग्रजी नाव आहे. शास्रिय भाषेत Rhamphicarpa
fistulosa (Hochst.) Benth. या नावाने हिला ओळखतात आणि हिचा समावेश Orobanchaceae
या कुळात केला आहे.
तुम्ही
सह्याद्रीतील पठारांवर विशेतः जिथे सतत पाऊस पडून ओली जमीन असते अशा जागांवर गेलात
तर हिचं दर्शन नक्की होईल. सायंकाळी उशिरा थांबण्याची तयारी असेल तर पूर्ण उमललेली
फुलं सुद्धा पाहायला मिळतील.
Plant Profile:
Botanical Name: Rhamphicarpa
fistulosa (Hochst.) Benth.
Synonyms: NA
Common Name: Rice
Vampireweek
Marathi Name: तुतारी (Tutari)
Family: Orobanchaceae
Habit: Herb
Habitat: Wetlands
Flower Colour: White
(सफेद,
पांढरा)
Leaves: Pinnately
compound, 3-5 cm long, Green to Red in colour.
Smell: Light
fragrance
Abundance: Common
Locality: Malshej
Ghat, Junnar, Pune
Flowering Season: Sep-Nov
Date Captured: 03-Oct-2021
-
राजकुमार डोंगरे
Follow me on Instagram for Wild Flowers & Nature Photography
No comments:
Post a Comment