Sunday, 17 July 2016

Flowers: Fulbaji (फुलबाजी) | Chlorophytum bharuchae Ansari, Sundararagh. & Hemadri

Close-up of flowers to show flower structure
पावसाळा म्हटलं की वर्षासहलींना उधाण येतं! हवशे नवशे गवशे सर्वचजण सुट्टीच्या दिवशी घाटमाथ्यांवर पाऊस अनुभवण्यासाठी जातात. विशेषतः शहरी मंडळींचा वर्षासहलींसाठी विशेष ओढा असतो. असणारच! पावसात भिजण्याची मजा काही औरच असते, या उभ्या पावसात किंवा सह्यद्रीच्या काड्यांवरून धो-धो वाहणाऱ्या दुधाळ धबधब्यांखाली ओलं चिंब व्हायचं, आजूबाजूला गरमा गरम मक्याचा भुट्टा नाहीतर भजी आणि वाफाळणाऱ्या चहावर ताव मारायचा हे आता पावसाळ्यातलं नेहेमीचं चित्र झालं आहे.

एरवी तसे हे घाटमाथे फारसे काही आकर्षक वाटत नाहीत, खरं पाहता त्यांचं रूप काहीस भयावहच असतं. म्हणजे कधी दरीत डोकावताना चक्कर यावी इतक्या खोल दऱ्या तर कधी घाटातून प्रवास करताना अगदी अंगावर येणारे कातळ कडे. यातल्या काही दऱ्या आणि सह्यकडे हे हृदयाचा ठोका चुकवणाऱ्या असतात. घाटमाथ्यावरील माळरानंसुद्धा एरवी अगदी ओसाड पडलेली असतात; वाळलेलं पिवळं गवत, सुकलेली तळी आणि जवळपास एखादा हिरव्या गार जंगलाचा बुचका, थोडक्यात काय तर हे भाग एरवी तितके काही आकर्षक वाटत नाहीत. त्याउलट पावसाची चाहूल लागली की, घाटाखालून उनाड वारा पावसाचे ढग घेऊन येतो, सह्याद्रीच्या अजस्र काड्याना घाबरून हे ढग थोडे विसावतात आणि बरसायला लागतात. याचा परिणाम म्हणून वर्षभर वाट पाहिलेली गवताची, वेलींची आणि रानफुलांची बीजं रुजू लागतात. एरवी भयावह वाटणारा सह्याद्री या पावसाला भुलून कधी आपला रंग बदलतो हे आपल्यालादेखील लक्षात येत नाही, सगळीकडे हिरव्या गार गवताचे गालिचे आणि त्यावर डोलणारी विविधरंगी रानफुले दिसू लागतात. मधल्या काळात पाऊस इथे चांगलाच रमतो, सह्याद्रीची वने अगदी धुऊन काढतो, पावसासोबत आलेलं धुकं सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांना अगदी व्यापून टाकतं. अर्थात हेच धुकं सह्याद्रीतल्या इतर जैवसृष्टीला देखील भुरळ घालतं, त्यात शिळकरी कस्तुर सारखे सुरेल गायकपक्षी सुद्धा सामील होतात; मग मानवी मनाला या सर्व गोष्टींची भुरळ पडली नाही तर नवलंच!

अशा या सह्याद्रीच्या अल्लड पावसाचा आणि धबधब्यांचा अनुभव घेण्यासाठी आपण घाट परिसरात दरवर्षी न चुकता जातो. याच पावसाच्या सुरुवातीला काही दुर्मिळ रानफुलं घाटमाथ्यांवर फुलतात, आज ही रानफुलं आपलं अस्तित्व टिकवण्याच्या धडपडीत आहेत, त्यातली काही तर अखेरचा श्वास घेत आहेत. सह्याद्रीतल्या याच दुर्मिळ ठेव्यातलं एक रानफुलं म्हणजे "फुलबाजी". फुलबाजीचं अस्तित्व सध्या काहीसं धोक्यात आलेलं आहे! सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये अगदी मोजक्या ठिकाणी ही फुले आज रोजी दिसतात. जगात फक्त भारतात या फुलांच्या नोंदी आहेत आणि त्याही नगण्य ठिकाणी. सह्याद्रीमध्ये सुद्धा ही रानफुलं आता खूप दुर्मिळ झाली आहेत.

Rosate type of leaves & the way they grow
फुलबाजी हे शक्यतो पहिल्या पावसावर उगवून येणारं रानफुल. जमिनीमध्ये हिचे कंद खोल वर्षभर जिवंत असतात. पहिला पाऊस पडला की हे सुप्त अवस्थेतील कंद पुनरुज्जीवित होतात आणि जमिनीलगत गर्द आणि मांसल हिरवी पानं जमिनीतून माती अलगत बाजूला करून डोकावतात. एकदा का पावसाचे काही थेंब या पानांवर पडले आणि सह्याद्रीचा गारवा झोंबू लागला की यांच्या वाढीची गती वाढू लागते. अगदी पंधरा दिवसांत ८-१० पाने जमिनीतून पूर्ण वाढ होऊन बाहेर पडतात. पाऊस वेळेवर सुरू झाला तर साधारणपणे जून महिन्याच्या शेवटपर्यंत सर्व कंद व्यवस्थित रुजतात आणि १५ दिवसांत पानांची व्यवस्थित वाढ होते.

वरून पाहिल्यास पानांची रचना ही फुलाच्या पाकळ्यांसारखी भासते, इंग्रजीमध्ये या रचनेला rosate असे म्हणतात. पानं अगदी जमिनीलगत एकाड-एक, वक्राकार जोडणीने आणि दाटीवाटीने लागतात, त्यामुळे वरून पाहिल्यास एखाद्या फुलाच्या पाकळ्यासारखी ही रचना भासते. प्रत्येक पानं हे साधारणपणे १५-६० सेमी लांब आणि ३-५ सेमी रुंद, पात्यासारखं लांब, मांसल, गर्द हिरवं आणि शेंड्याकडची बाजू टोकदार असते. पाने जमिनीतून निघाल्यानंतर अर्धवक्राकार होऊन टोकाकडची बाजू पुन्हा जमिनीकडे झुकते. फुलबाजीच्या फांद्या वर वर पाहता आपल्याला दिसत नाहीत, त्या जमिनीच्या आत असतात. कंद आणि पानांच्या मधला भाग म्हणजेच फांदी,  हा भाग फक्त काही सेमीचा असतो, वरवर पाहून लवकर लक्षात येणार नाही इतका छोटा.

एकदा का पाऊस बऱ्यापैकी पडू लागला की जमिनीच्या आतून, फांदीवर आणि फुलासारखी रचना असणाऱ्या पानांच्या बरोबर मधून एक दांडा (Peduncle) बाहेर पडतो. बऱ्याचदा यालाच फांदी समजले जाते परंतु तसे नसून हा दांडा म्हणजे फुलोऱ्याचा डोलारा सांभाळणारा आधारस्तंभ असतो. हा दांडा साधारणपणे २-३ फुटांपंर्यंत लांब आणि ५-८ मिमी जाडीचा असतो, यावर पांढऱ्या रंगाचा पिठाळ थर असतो. या दांड्यावर ठराविक अंतरावर छोटी पाने वाढतात, आणि अगदी टोकावर ३० - ५० फुलांचा फुलोरा लागतो. फुलोऱ्याची लांबी साधारणपणे ३० सेमीपर्यंत असते. यामध्ये फुलांच्या बहुधा २-३ च्या जोड्या असतात, अर्थात कधी कधी संख्या कमी जास्त असू शकते. प्रत्येक कळी ही साधारणपणे अर्धा ते एक सेमी लांबीची असते, रंग पांढरा परंतु टोकाकडे तो खाकी किंवा काहीसा पिवळा होत जातो. कळीच्या खालच्या बाजूला संरक्षण दले असतात आणि त्याखाली मुख्य दांडीला जोडणारी ४-५ मिमीची आणखी एक दांडी असते. या छोट्या दांडीचा रंग देखील खाकी किंवा पिवळा असतो. अक्षावर जिथे या कळ्या एकत्रित जोडलेल्या असतात तिथे आणखी एक खाक्या रंगाचं संरक्षणदल वाढतं. फुलांचे हे छोटे झुपके मुख्य अक्षावर एकाड-एक पद्धतीने जोडलेले असतात. कळ्या योग्य वातावरण भेटलं की फुलू लागतात आणि वाऱ्याच्या तालावर डोलू लागतात.

Habitat: Growing on typical slope of hill top
फुलबाजीच्या फुलांची रचना ही अतिशय साधी असते. फुले बहुधा घंटीसारख्या आकाराची असतात. फुलांची लांबी साधारणपणे १ सेमी पर्यंत असते. सहा पांढऱ्या रंगाच्या पाकळ्या आणि प्रत्येक पाकळीच्या टोकाला खाक्या रंगाचा टिळा असतो. फुलाच्या मध्यभागातून सहा पुंकेसर आणि एक स्त्रीकेसर वाढतो, यातील पुंकेसराचे तंतू (filaments) पांढऱ्या रंगाचे आणि परागकोष (anther) पिवळ्या रंगाचे असतात. पुंकेसर परिपक्व झाले की त्यातून परागकण बाहेर पडतात. पावसाचे थेंब परागीभवनामध्ये विशेष कामगिरी बजावतात. पावसाचा थेंब परागकोशावर पडला की त्यातून काही परागकण उडून स्रिकेसरापर्यंत पोहोचतात आणि फलनाची (fertilisation) ची प्रक्रिया सुरू होते. कधी कधी पाऊस हुलकावणी देतो, अशा वेळी फुलपाखरे, मधमाशा, भुंगे आणि सूर्यपक्षी ती कामगिरी बजावतात. साधारणपणे जुलैच्या शेवटपर्यंत फळधारणा होते.

सुरवातीला फळांचा रंग हा हिरवा असतो, फळे लंबगोलाकार असून साधारणपणे अर्धा सेमीपर्यंत वाढतात आणि त्यांचे विभाजन तीन समभागांत झालेले असते. हे तीन भाग बाहेरून खाचांच्या रूपाने स्पष्ट दिसतात. फळे परिपक्व झाली की रंग बदलून खाका किंवा तांबूस होतो आणि उन्हामुळे फुटून बीजप्रसार होतो. फुलबाजीची झाडे बहुधा एकमेकांच्या अगदी जवळ जवळ वाढतात त्यामुळे बऱ्याचदा एका झाडाचा फुलोरा दुसऱ्या झाडाच्या फुलोऱ्यावर आदळतो आणि त्यातूनदेखील बीजप्रसार किंवा परागीभवन होण्यास मदत होते. फुलबाजीच्या बिया जास्त काळ रुजण्यासाठी योग्य नसतात, त्यामुळे बियांमधून नवीन पिढी खूपच कमी प्रमाणात तयार होते. त्यामुळे निसर्गाने फुलबाजीच्या कंदांमध्ये विशिष्ठ ताकद दिली आहे, हे कंद काही वर्षांपर्यंत जमिनीत तग धरून राहू शकतात आणि योग्य परिस्थतीतला तात्काळ रुजतात.

फुलबाजी ही वनस्पती सध्या अस्तित्वाची लढाई लढत आहे, काय कारण असेल त्यासाठी? खरं कारण आहे मोठ्या प्रमाणात निसर्गातील मानवी हस्तक्षेप! फुलबाजीचा मुख्य आदिवास आहे सह्याद्रीचे डोंगरउतार, मानवाने हे डोंगरउतार शक्य तितके सपाट केले तेही तेथील दुर्मिळ वनस्पतींचे स्थलांतर दुसरीकडे न करता. त्यात फुलबाजी ही औषधी वनस्पतीदेखील आहे, हिचे कंद शक्तिवर्धक म्हणून वापरले जातात. खूप ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हे कंद काढून घेतले गेले आणि त्याचा परिणाम म्हणून देखील फुलबाजीची संख्या अत्यल्प होत गेली.

फुलबाजीला शास्रिय भाषेत Chlorophytum bharuchae Ansari, Sundararagh. & Hemadri अशा नावाने ओळखतात आणि तिचा समावेश Liliaceae या कुळामध्ये केला गेला आहे. आपल्या वर्षासहलींमध्ये चुकून आपल्याला फुलबाजी दिसली तर तिचे नुकसान आपल्याकडून होणार नाही याची काळजी घ्यावी. एखादा कंद चुकून कुणी काढला असेल तर तो कुठेतरी जमिनीत पुन्हा पुरून टाका. असे केल्याने तुम्हा आम्हाला थोडा त्रास कदाचित होईल पण निसर्गदेवता दोन्ही हातांनी आपल्याला भरभरून आशीर्वाद देईल आणि आपलं जीवन सर्वार्थाने समृद्ध करेल यात कुठलीही शंका नाही!


Fruit Structure showing clear lobes and size
- राजकुमार डोंगरे

Plant Profile:

Botanical Name: Chlorophytum bharuchae Ansari, Sundararagh. & Hemadri
Synonyms: NA
Common Name: NA
Marathi Name: Fulbaji (फुलबाजी)
Hindi Name: NA
Family: Liliaceae
Habit: Herb
Habitat: On the slope of hill tops (डोंगर उतार)
Flower Colour: white (पांढरा)
Leaves: Radical, Linear, 15-60 cm with acute apex.
Smell: No Smell
Abundance: Rare on slope of hill tops
Locality: Narayangad & Shivneri Fort, Junnar, Rural Pune, MH
Flowering Season: Jun to Jul
Date Captured: 12-Jul-15

Friday, 17 June 2016

Flowers: Hill Turmeric | Ranhalad (रानहळद), Shindalvani (शिंदळवानी) | Curcuma pseudomontana J. Graham

सध्या सर्वजण पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत! सर्व म्हणजे अगदी सर्वच! त्यामंध्ये आपल्यासारख्या माणसांसोबत पक्षी, प्राणी, कीटक, फुलपाखरे, वृक्ष, वेली आणि पहिल्या पावसावर उगवून येणारी रानफुलं सुद्धा! या रानफ़ुलांमध्ये काही फुलांचे कंद आणि बिया वर्षभर शांत जमिनीच्या आत पावसाची वाट पाहत बसलेले असतात. जून महिना सुरू झाला की अशा सर्वांनाच वेध लागतात पहिल्या पावसाचे. फरक मात्र एवढाच की माणसाला त्या भावना व्यक्त करता येतात आणि प्राणी, पक्षी किंवा रानफुलांना मात्र ती सोय नाही. सध्या सह्याद्रीच्या रांगांमधून काळे ढग वाऱ्यावर स्वार होऊन मुलूखगिरी करताना दिसतायेत आणि आपण सर्वजण टक लावून वाट पाहतोय त्यांच्या बरसण्याची. अर्थात एखाद दुसरी सर कोसळली आहे बहुतांश ठिकाणी आणि त्याचाच परिणाम म्हणून काही भागात पावसाळी रानफुलं आपलं डोकं वर काढू लागली आहेत.

या मौसमी फुलांमधलं आणि सह्याद्रीच्या शीरपेचातलं एक महत्वाचं रानफुलं म्हणजे "रानहळद", नावाप्रमाणे हीच वास्तव्य फक्त रानावनात, आणि तेही विशिष्ट उंचीवर. त्यामुळे किल्ले किंवा सह्यभटकंती करणाऱ्या रानवेड्यांना हिचं सौंदर्य काही नवखं नाही, अर्थात पण दरवर्षी रानहळद फुलली की, यापूर्वी कितीही वेळा हे फुल पाहिलं असलं तरी क्षणभर आपण "रानहळदी"जवळ रेंगाळतोच! हीच तर खरी रानहळदीची जादू आहे, जी प्रत्येकाला भारीत करते. रानहळद हे सह्याद्रीच्या शिरपेचातील महत्वाचं रानफुल आणखी एका कारणासाठी आहे आणि ते म्हणजे जगात ही फुलं फक्त सह्याद्रीच्या पश्चिम आणि पूर्व रांगांवर आढळते, अर्थात आपल्याकडे ती मोठया प्रमाणावर येते, पण जगाच्या दृष्टीने मात्र ती दुर्मिळ होण्याच्या मार्गावर आहे. तशी नोंद देखील आय.यु.सी.एन. रेड लिस्ट (IUCN Red List) मध्ये झाली आहे. याव्यतिरिक्त रानहळदीचं उगमस्थान हे भारत आणि चीन आहे, परंतु सध्या चीनमधून देखील रानहळद नाहीशी झाली आहे. त्यामुळे जगाच्या पाठीवर भारत हा एकमेव देश आहे जिथे रानहळद वाढते.

रानहळद ही पहिल्या पावसावर उगवून येणारी वनस्पती. पावसानंतर आठवड्याभरात डोंगरउतारावर आणि डोंगरांवरील पठारांवर केळीच्या पानांसारखे कोंब जमिनीतून बाहेर पडतात पंधरा दिवसांत बऱ्यापैकी पाने बाहेर निघतात आणि पानांच्या बाजूने १०-१५ सेमी लांबीचा गुलाबी किंवा जांभळ्या रंगाचा फुलोरा जमिनीलगत वाढतो. सुरवातीला हा फुलोरा पांढऱ्या आणि हिरव्या रंगाचा असतो. पुढे जाऊन खालचा भाग हिरवा आणि शेंड्याकडचा भाग गुलाबी किंवा जांभळ्या रंगाचा होतो. निरीक्षणपूर्वक पाहिल्यावर लक्षात येतं की या फुलोऱ्यावर सर्व फुले दाटीवाटीने वाढतात. प्रथमदर्शनी असं वाटत की गुलाबी किंवा जांभळ्या रंगाची फुले किंवा पाकळ्या असाव्यात पण ती फुले नसून परागण करण्यासाठी कीटकांनी आकर्षित व्हावं म्हणून निसर्गाने केलेली व्यूहरचना असते. पाकळ्यांसारखी भासणारी ती फुलांची संरक्षण दले (Bracts) असतात. या प्रत्येक पाकळीसदृश्य संरक्षणदलाच्या (Bracts) तळाशी २-३ गर्द पिवळ्या रंगाची फुले वाढतात. प्रत्येक फुल साधारणपणे ३ सेमीपर्यंत लांब आणि ४ सेमीपर्यंत रुंद असते. बाहेरून पाहिल्यास फुलांचा आकार ऑर्किडच्या फुलांसारखा भासतो. सुरवातीला सरंक्षण दले (Bracts) पांढऱ्या किंवा गुलाबी रंगांची असतात. पण पुढे जशी जशी फुले परिपक्व होतात, तसा संरक्षण दलांचा रंग गडद जांभळा होत जातो. या चमकदार रंगांमुळे कीटक आणि फुलपाखरे आकर्षित होतात आणि त्यातून परागीभवनांची प्रक्रिया पूर्ण होते. फळधारणा झाल्यावर गोल आकाराच्या छोट्या बिया बाहेर पडतात आणि रुजतात. पण, रानहळहिच्या बिया खूप कमी वेळ रुजण्यासाठी सक्षम असतात. मग प्रजातीची वाढ कशी होणार हा प्रश्न निर्माण होतो, अर्थात निसर्ग हा सर्वांचा विचार करणारा आहे. त्यामुळे त्याला सर्वांची काळजी असते. रानहळदीच्या मुळांवर हळकुंडाची वाढ होते, ही हळकुंड आलं किंवा आपल्या साध्या हळदीसारख्या दिसतात. या अगदी काही वर्षांपर्यंत जमिनीमध्ये तग धरून ठेऊ शकतात. चुकून एखाद्या वर्षी पाऊस कमी पडला तरी यांचं फारसं काही बिघडत नाही. अगदी थोड्याशा पावसावर देखील या लगेच रुजतात आणि पुढच्या पिढीच्या तयारीला लागतात. चुकून एखाद्या वर्ष पाऊस पडलाच नाही तरी या कंदांची क्षमता प्रचंड असते, त्यापुढील वर्षीच्या पावसात देखील ते चांगले रुजतात आणि स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवतात. निसर्गदेवतेची देणगी, आणखी काय!

रानहळदीला फांदी शक्यतो दिसत नाही कारण जमिनीपासून जी काही दिसतात ती फक्त पानं आणि फुलंच असतात. बऱ्याचदा तसा गैरसमजही होतो की रानहळदीला कदाचित फांद्या नसाव्यात, पण तसं नाही, रानहळदीच्या फांद्या या जमिनीत असतात. किंबहुना रानहळद प्रकारात मोडणाऱ्या सर्वच वनस्पतींच्या फांद्या या जमिनीखाली असतात. त्या आकाराने इतक्या लहान असतात की यातली हळकुंड कुठली आणि फांदी कुठली यामध्ये संभ्रम निर्माण होतो. रानहळदीची पाने ही साध्या हळदीसारखी किंवा कर्दळीच्या पानांसारखी असतात. साधारणपणे ३० सेमी लांब आणि ९-१० सेमी रुंद, टोकाला अगदी टोकदार असतात. पानांच्या कडा सबंध (continuous) असतात. गंमत म्हणजे रानहळदीला लागणारी हळद आतमधून पिवळ्या ऐवजी पांढऱ्या रंगाची असते परंतु सुगंध अतिशय तीव्र असतो.

रानहळदीला आयुर्वेदामध्ये प्रचंड महत्व आहे, कावीळ, महारोग, जुलाब किंवा हृदयाच्या संदर्भातील आजारांवर ही हळद अत्यंत गुणकारी आहे. हळदीचा लेप गरम करून सुज आलेल्या जागेवर लावल्यास लवकर आराम मिळतो. नवीन मुलाला जन्म दिलेल्या मातांना रानहळद उकडून खाल्याने दुधामध्ये वाढ होण्यास मदत होते. हळदीचा लेप डोक्यावर लावल्यास डोकं शांत होण्यास मदत होते. कच्ची हळद ही रक्तशुद्धीकरणावर सुद्धा प्रभावी आहे.

रानहळदीला मराठी मध्ये शिंदळवानी म्हणून देखील ओळखतात. इंग्रजीमध्ये रानहळदीला "Hill Turmeric" तर हिंदीमध्ये कचुरा म्हणून ओळखतात. यातील Hill हा शब्द या वनस्पतीचा आदिवास दर्शवतो. शास्त्रीय भाषेत " Curcuma pseudomontana J. Graham" असा नामोल्लेख रानहळदीसाठी आहे. यातील Curcuma हा शब्द Kurkum या अरेबिक शब्दापासून आलेला आहे, Kurkum म्हणजे हळद! आणि Pseudomontana शब्दाची फोड Pseudo+Montana अशी होते. यातील Pseudo या शब्दाचा अर्थ छोटा किंवा खोटा असा होतो आणि Montana हा शब्द स्पॅनिश भाषेतून आला असून त्याच अर्थ पर्वत असा आहे. एकंदर शास्त्रीय नावाचा अर्थ "छोट्या पर्वतांवर वाढणारी हळद" असा होतो. रानहळदीचा समावेश Zingiberaceae या कुळामध्ये होतो.

रानहळद सध्या जगामध्ये दुर्मिळ वनस्पतींच्या सूचीवर येण्याच्या मार्गावर आहे, सध्या ती फक्त भारतात आढळते. जागतिक स्थरावर तिला वाचवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. असे असताना भारतात मात्र याबाबत थोडीशी उदासीनता जाणवते. दक्षिण भारतात चहाचे मळे, कोकणात खाणकाम व्यवसाय, देशभर मोठया प्रमाणावर होणारी जंगलतोड, उन्हाळ्यात लागणारे आणि जाणीवपूर्वक लावले जाणारे असंख्य वणवे, डोंगरउतारावरील जमिनींवर होणारे अतिक्रमण, गुरेचराई या आणि अशा असंख्य कारणांमुळे रानहळद पृथ्वीवरून कायमची नाहीशी झाली तर नवल वाटणार नाही. अर्थात हिला वाचवणं देखील आपल्याच हातात आहे, त्यासाठी हवेत फक्त प्रामाणिक प्रयत्न!

Plant Profile:

Botanical Name: Curcuma pseudomontana J. Graham
Synonyms: NA
Common Name: Hill Turmeric
Marathi Name: Ranhalad (रानहळद), Shindalvani (शिंदळवानी)
Hindi Name: Kachura (कचुरा)
Family: Zigiberarceae
Habit: Herb
Habitat: Hill Top of deciduos forests on moist land (पानगळीची वने)
Flower Colour: Pink to violate (गुलाबीमिश्रित मंद किंवा गर्द जांभळा)
Leaves: Lance shaped, 30 cm in length, 9-10 cm wide, and margin entire with acute apex.
Smell: No Smell
Abundance: Vulnerable in World (as per IUCN Red list) however common in Sahyadri ranges in rains.
Locality: Hatakeshwar, Junnar, Rural Pune, MH
Flowering Season: Jun to Sept
Date Captured: 12-Jun-16

Saturday, 21 May 2016

Flowers: Snowflake tree, Sweet Indrajao, Pala indigo plant | (काळा कुडा - Kala Kuda) | Wrightia tinctoria (Roxb.) R.Br., Mem. Wern. Soc.

Flower structure of Wrightia tinctoria
भर उन्हाळ्यात सह्याद्रीमध्ये हिमवर्षाव होतोय अस जर सांगितलं तर कुणाला खरं वाटणार नाही, अर्थात कोण विश्वास ठेवेल. दिवसभर रणरणतं उन आणि उकाड्याने जीव अगदी नकोसा होतो, घामाच्या धारा लागतात आणि कितीही पाणी प्यायलं तरी तहान काही भागत नाही. दुपारच्या उन्हात शक्यतो कुणी बाहेर पडायला मागत नाही. पण, याच उन्हात जर आपण बाहेर पडलो आणि सह्याद्रीच्या डोंगररांगा जवळ केल्या तर आपल्याला भर उन्हाळ्यात हिमवृष्ठी झाल्याचा भास होईल. अर्थात हा भासच आहे! मग हे हिमवर्षावासारख भासणार आहे तरी काय? हा "काळा कुडा" नावाचा वृक्ष असू शकतो!

सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये विशेषतः पानगळीच्या जंगलात नेहमी दिसणारा हा वृक्ष. नावाने जरी "काळा कुडा" असला तरी फुलं मात्र दुधासारखी सफेद, मनमोहक आणि सुगंधीदेखील. बाकी जीवसृष्टी जेव्हा सह्याद्रीच्या उन्हात होरपळून निघत असते तेव्हा काळा कुडा मात्र सबंध फुललेला असतो. संपूर्ण वृक्षावर पानं कमी आणि फुलंच जास्त अशी परिस्थिती निर्माण होते. दुरून पाहिल्यावर या वृक्षावर हिमवर्षाव झाल्याचा भास होतो. या भासामुळे काळ्या कुड्याला "Snowflake tree" म्हणून ओळखतात. सह्याद्रीमध्ये उन्हाळ्यातअसे भरभरून फुलणारे वृक्ष दिसले कि भटक्यांना रानवाटा तुडवाण्याचे आणखी बळ मिळते. काही क्षण या वृक्षाच्या सानिध्यात रहावसं वाटत, फुलांचं सौंदर्य डोळ्यांत साठवून घ्यावसं वाटत.

Flowering tree captured in April Month
"काळा कुडा" सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वाढणारा एक नेहमीचा वृक्ष, विशेषकरून पानगळीच्या जंगलांमध्ये हा चांगला वाढतो. त्यात हा औषधी असल्याने बहुधा शाळा-कॉलेजे मध्ये अभ्यासासाठी बगिचांमध्ये लावलेला दिसतो. काळा कुडा साधारणपणे ३०-३२ फुटांपर्यंत वाढतो, झाडं शक्यतो मध्यम उंचीची आणि डेरेदार असतात. खोड मध्यम जाडीच असून त्यावर राखाडी रंगाची साल असते. मुळं पाण्याच्या शोधात खोलवर जातात. काळ्या कुड्याची पाने गर्द हिरव्या रंगाची असून, लांबी साधारणपणे ८-१० सेमी आणि रुंदी ३-४ सेमीपर्यंत असते. पानाची कड सलग असून कधीकधी नागमोडी (Wavy) असते. पानाचा देठ फुगीर आणि साधारणपणे १-१.५ सेमी लांबीचा असतो. पानांची जोडणी एकमेकांना विरुद्ध अशा स्वरुपाची असते. पावसाळ्यात पानांची गर्दी एवढी असते की भर दिवसा झाडाखाली अंधारून यावं आणि उन्हाळ्याच्या सुरवातील अर्ध्याहून अधिक पानं गळून पडतात. यामुळे झाडातल्या पाण्याचं बाष्पीभवन कमी होण्यास मदत होते. पानगळीनंतर म्हणजे फेब्रुवारीच्या शेवटी पानांची जागा नकळत दुधाळ पांढऱ्या रंगाची फुलं घेतात. फुलांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर असते, दुरून पाहिल्यानंतर संपूर्ण झाडावर हिमवर्षाव झाल्याचा भास होतो. फुलं अगदी झुबक्यांनी लागलेली असतात. फुलांचा आकार भूईचक्राच्या आकारासारखा असतो. फुलाचा देठ साधारणपणे एक सेमीपर्यंत असतो त्यावर हिरव्या रंगाची पाच पाकळ्यांच्या आकाराची पण आकाराने लहान पाच संरक्षण दले (Calyx) वाढतात. या संरक्षण दलांच्या देखरेखीत पाच दुधाळ पांढऱ्या रंगाच्या पाकळ्या वाढतात. फुल वरच्या बाजूने पाहिल्यास एक सेमी पर्यंत लांबी असते आणि एका फुलोऱ्यात १०-१५ फुले असतात.

काळ्या कुड्याच्या फुलांची वेगळी अशी एक रचना आढळते, जी इतर फुलांमध्ये क्वचितच पाहायला मिळते. प्रत्येक पाकळीच्या वर पांढऱ्या रंगाच्या  ४-५ तंतुंच्या जोड्या वाढतात, या जोडीतला एक ग्रुप पाकळीच्या २० ते ३० अंशाच्या कोणात वाढतो आणि दुसरा अगदी ९० अंशाच्या कोनात म्हणजेच पुंकेसरला समांतर असा वाढतो. या तंतुंच्या जोड्या पुढे प्रजाननाच्या प्रक्रियेत अप्रत्येक्ष सहभाग घेतात. या तंतुंच्या आतमध्ये पुंकेसर आणि श्रीकेसर असतात. पुंकेसरांची संख्या पाच असून ते टोकाकडे एकत्र भेटतात आणि त्यामुळे वर पाहता त्यांना शंकूचा आकार प्राप्त होतो. अर्थात हा शंकूचा आकार फार कमी काळासाठी टिकून असतो. इतर फुलांमध्ये पुंकेसर फुलांना तंतूने जोडलेला असतो, मात्र काळ्या कुड्यात असा तंतू दिसून येत नाही. या शंकूच्या आकारांच्या पुंकेसरांच्या आतमध्ये स्रीकेसराची रचना आहे. स्रीकेसराची पूर्ण वाढ होईपर्यंत शंकूच्या आकाराचे पुंकेसर त्याला संरक्षण देण्याचं काम करतात. स्रिकेसर आणि पुंकेसर यांची वाढ पूर्ण झाली की पुंकेसरांचा शंकू फुटतो आणि कळी उमलावी त्याप्रमाणे पुंकेसर एकमेकांपासून विलग होतात आणि पाकळीच्या बाजूला झुकतात. इतका काळ बंदिस्थ असलेलं स्रिकेसर नव्या नवरीप्रमाणे बाहेर येते आणि परागीभवनासाठी कीटक, पक्षी आणि इतर घटकांना आमंत्रित करतं.

Pollinator approaching flowers for pollination
या परागीभवनाच्या अवस्थेत एका झाडावर हजारो फुले उमललेली असतात त्यामुळे कीटक, मधमाश्या, भुंगे, पक्षी आणि असे खूप विविध घटक काळ्या कुड्याला भेटी देतात आणि आपआपल्या पद्धतीने या निसर्गकार्यात आपली जबाबदारी पार पडतात. भेटी देणारे कीटक जेव्हा फुलाला भेट देतात तेव्हा परागकण त्यांच्या पायांना आणि इतर अवयवांना नकळत चिकटतात आणि पुढच्या फुलांवर बसले की त्यांचे पाय पाकळ्यावरील तंतुवर घासले जातात आणि पायावर चिकटलेले परागकण अलगत पुसून काढले जातात. हे तंतू म्हणजे निसर्गातले मुलायम ब्रश असल्याच काम करतात. याव्यतिरिक्त वारा, पाऊस आणि इतर माध्यमातून परागकण स्रीकेसराच्या कुक्षी (stigma) पर्यंत जाउन पोहोचतात आणि सुरवात होते नवनिर्मितीची. ही सगळी प्रक्रिया संपेपर्यंत पावसाळा सुरु झालेला असतो.

फलनाची (Fertilization) प्रक्रिया पूर्ण झाली की एक ते दीड फुटाच्या शेंगांसारखी फळे या वृक्षावर लागतात. या शेंगा फारच गमतीदार असतात, पण त्याचं देखील बीजप्रसारातील शास्रीय महत्व आहे. काळा कुड्याच्या शेंगा टोकाला एकमेकांशी जोडलेल्या असतात. त्यामुळे प्रत्येक शेंग ही लंबवर्तुळाकार दिसते म्हणजे कमळाच्या पाकळीच्या आकाराची. आर्थात मधला भाग पोकळ असल्याने हवा आरपार जाऊ शकते. शेंगांचा रंग काळपट हिरवा, दुरून पाहिल्यास शेंगा काळ्याच दिसतात, अगदी जवळ जाउन पाहिल्यास हिरवा रंग थोडासा दिसतो आणि म्हणून मराठी नाव "काळा कुडा" अस आलं आहे. सबंध शेंगांवर पांढऱ्या रंगाचे ठिपके असतात. याला लेन्टी पेशी म्हणतात, यातून वाढीसाठी लागणारे निसर्गातले वायू आत घेतले जातात आणि नको असलेले बाहेर टाकले जातात. पुढे शेंगा परिपक्व होतात आणि सुकल्या कि पाण्याच्या कमतरतेमुळे फुटतात. काळ्या कुड्याच्या बिया म्हणजे म्हाताऱ्या, खाली पिवळ्या किंवा मरून रंगाची बी आणि तिच्या डोक्यावर मुलायम केसधारी मुकुट अशी रचना असते. शेंगा टोकाला जोडलेल्या असल्याने आणि फुटल्यामुळे आकुंचन पावतात आणि पूर्वी मध्ये असलेली पोकळी काहीशी कमी होते, त्याचा परिणाम म्हणून हवा आरपार जाण्यासाठी अडथळा निर्माण होतो आणि या शेंगा वाऱ्याच्या वेगावर हेलकावे घ्यायला सुरवात करतात. या हेल्काव्यांमुळे शेंगा एकमेकांवर आदळतात आणि आधीच मोकळ्या झालेल्या बिया म्हणजेच म्हाताऱ्या पूर्ण मुक्त होतात आणि निघतात नव्या पिढीच्या प्रवासाला. सह्याद्रीतला आल्लड वारा या बिया सर्वदूर पसरवतो. यातील काही हजारो किमीचा प्रवास करून नवीन प्रदेशात जातात तर काही जवळच कुठेतरी पडून रुजतात. काहीना योग्य वातावरण न मिळाल्याने मरून जातात, अर्थात हा सर्व निसर्गाचा खेळ!

Top view of tree canopy showing flowering in June month
काळा कुडा हा औषधी असल्याने आयुर्वेदामध्ये या वृक्षाला अनन्यसाधारण महत्व आहे. झाडाची साल जुलाब बद्धकोष्ठाच्या संदर्भातील आजार आणि त्वचारोगांवर अतिशय गुणकारी आहे.  काळ्या कुड्याच्या बियांपासून लाडू बनवले जातात आणि ते सेक्स टोनिक म्हणून चांगलं काम करतात. झाडाची साल आणि बिया दोन्ही अपचानावर रामबाण उपाय आहेत. मुळांच्या सालीचा अर्क काढून पिण्यासाठी दिल्यास सापाच्या विषाचा प्रभाव कमी होण्यास मदत होते. झाडाच्या सालीचे चूर्ण मूतखडा (Kidney stone) वर प्रभावी औषध आहे. साल, फांद्यांचा अर्क प्राण्यांच्या त्वचेच्या आजारांवर देखील उपयोगी आहे. सोरायसिस (Psoraysis) सारखे त्वचारोग सुद्धा काळ्या कुड्याने बरे होतात अस\विज्ञान सांगत. याव्यतिरिक्त भाजणे, पोटदुखी आणि ताप यांसारख्या आजारांवर देखील ही वनस्पती गुणकारी आहे. केसांमधील कोंडा (Dandruff) कमी करण्यासाठी काळा कुडा वापरला जातो त्यामुळे केसांच्या आयुर्वेदिक तेलामध्ये या वनस्पतीचा अर्क बहुधा वापरलेला दिसतो. काळा कुडा हा कॅन्सर (Cancer) सारख्या आजारांवर सुद्धा गुणकारी आहे असा शास्र्ज्ञानी दावा केला आहे परंतु त्यावरील संशोधन अजून पूर्ण झालेलं नाही. काळा कुडा घरगुती गोष्टींसाठी सुद्धा वापरता येतो. या वृक्षांच्या पाने फुले किंवा शेंगा तोडल्यावर दुधासारख पदार्थ स्रवतो, याचे १-२ थेंब दुधात टाकल्यास काही तासांपर्यंत दुध चांगल राहण्यास मदत होते. दहाडदुखीमध्ये काळ्या कुड्याची पाने चाऊन थुंकल्यास लवकर आराम मिळतो. असे खूप सारे उपयोग या वृक्षापासून आहेत.

काळ्या कुड्याला इंग्रजी भाषेत "Snowflake Tree, Pala indigo plant, Dyers’s oleander" या नावाने ओळखले जाते. Pala Indigo हे नाव रंग दर्शवणारा आहे. काळ्या कुड्यापासून निळा रंग तयार केला जातो आणि म्हणून इंग्रजीमध्ये अस नाव आलं आहे. काळ्या कुड्याला शास्रीय भाषेत Wrightia tinctoria (Roxb.) R.Br., Mem. Wern. Soc. या नावाने ओळखतात. यातील Wrightia हा वृक्षाची जात दर्शवणारा शब्द Williams Wright या शास्रज्ञाच्या नावावरून आला आहे. काळ्या कुड्याचा समावेश "Apocynaceae" या कुळात करण्यात आला आहे.


Plant Profile:

Botanical Name: Wrightia tinctoria (Roxb.) R.Br., Mem. Wern. Soc.
Synonyms: NA
Common Name: Snowflake Tree, Pala indigo plant, Dyers’s oleander
Marathi Name: Kala Kuda (काळा कुडा)
Family: Apocynaceae
Habit: Tree
Habitat: Deciduous forest (पानगळीची वने)
Flower Colour: White
Leaves: Simple, entire margin, 8-10 cm X 3-4 cm.
Smell: Fragrant
Abundance: Common in Sahyadri ranges on hill tops and deciduous forests.
Locality: Narayangad Fort, Khodad, Junnar, Rural Pune, MH
Flowering Season: February to June
Date Captured: 24-Jun-2014 





- Rajkumar J Dongare

Sunday, 1 May 2016

Flowers: Small-Bearded Dendrobium | Gulabi Dande Amari - गुलाबी दांडेअमरी | Dendrobium barbatulum Lindl

"ऑर्किड" बहुधा सर्वांच्याच वाचनातला आणि ऐकण्यातला शब्द! दूरच्या प्रवासात कुठे उंच इमारतींवर तर कधी शहरांमधल्या मोठ्या हॉटेल्सवर हा शब्द अगदी नेहमीचा वापरातला आहे. खरच या शब्दाचं एवढ काय आकर्षण असावं? या शब्दाचा अर्थ तरी काय? कुठून आला हा शब्द? असे एक ना अनेक प्रश्न अशा वेळी मनात घर करून बसतात. या प्रश्नाचं उत्तर प्रवासातील एखाद्या सोबतीकडे मिळालं तरी फार फार तर "ऑर्किड हे एक सुंदर फुल आहे" इथपर्यंत मर्यादित राहते. मग हे उत्तर नवीन प्रश्नाला जन्म देऊन जातं; आपल्या आजूबाजूला बाकी कितीतरी सुंदर फूलं आहेत, "गुलाब, मोगरा, जाई, जुई" अजून अशी असंख्य नाव घेता येतील की ज्यांच्या सौंदर्याने मानवी मनाला भुरळ पडते. पण ऑर्किडचं तितकंस ऐकण्यात नाही, असं काय खास आहे ऑर्किडमध्ये कि हे नाव देखील एवढं आदबीने घेतलं जावं.

नक्कीच खास आहे, कारण ऑर्किडला जगातील सर्वाधिक सुंदर फुलांचा मान मिळालेला आहे, सौंदर्य इतकं की पाहता क्षणी प्रेमात पाडावं. अर्थात जगातील सर्वाधिक सुंदर फुल ऑर्किड आहे यावरच तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही पण हे सत्य आहे. ऑर्किडच्या सौंदर्यात अशी काही जादू आहे की सभोवतालच्या परिस्थितीचा क्षणभर विसर पडावा, आणि नकळत निसर्गाचा प्रत्येक घटक त्यामध्ये वाहवत जावा. इथे संपूर्ण निसर्ग असा उल्लेख मी मुद्दाम करतो आहे, कारण फक्त मानवच नाही तर कीटक, फुलपाखरे, पक्षी, भुंगे आणि संपूर्ण जीवसृष्टीवर ऑर्किडच्या फुलांची भुरळ पडते. एका वाक्यात सांगायचं झाल तर "ऑर्किड म्हणजे मोहिनी आहे आणि ती प्रत्येकावर लागू होते".

सौंदर्याप्रमाणेच ऑर्किडची आणखी काही वैशिष्ठे आहेत त्यातलं मुख्य म्हणजे हे कुळ जगातील सर्वाधिक प्रजाती असणार्यांपैकी एक आहे, अर्थात हा शास्राज्ञांमध्ये थोडा वादाचा मुद्दा आहे. काही शास्रज्ञ म्हणतात की एस्टर (Aster) या कुळामध्ये सर्वाधिक वनस्पती आहेत तर काहींचा असा दावा आहे की ऑर्किडचा कुळामध्ये सर्वाधिक वनस्पती आहेत. असो, एकट्या ऑर्किड या कुळामध्ये ८८० जाती आणि २७८०० प्रजातींचा समावेश आहे, याव्यतिरिक्त नवीन प्रजातींवर जगभर संशोधन सुरु आहे.

ऑर्किड्समध्ये प्रामुख्याने दोन प्रकार पडतात, जमिनीवर वाढणारे आणि वृक्षांच्या खोडांमध्ये किंवा फांद्यांवर वाढणारे. यातील जमिनीवर वाढणार्या ऑर्किड्समध्ये मुळांची जागा छोट्या बटाट्यासारख्या मुळाने घेतलेली असते. या बटाट्यांमधून पुढे वेगवेगळे कोंब फुटतात आणि वाढतात. नवीन कोंबावर फुले लागतात पुढे परिपक्व होऊन फळे आणि बिजप्रसार होतो. हे चक्र पूर्ण झालं की हाच जुना कोंब पुढे वाढून नव्याने पुन्हा तेच चक्र सुरु होतं. या विशिष्ठ चक्रामुळे काही ऑर्किड्स काही मीटर पर्यंत वाढतात. जमिनीवर वाढणाऱ्या काही ऑर्किड्स मध्ये फक्त फुलं आणि फळं येउन गेली कि फुटवे मरून जातात, पण मुळं मात्र तग धरून असतात, ती वाट पाहत असतात योग्य संधीची, एका पावसाची! याउलट वृक्षांच्या खोडात वाढणारी ऑर्किड्स दर वर्षी नवीन जन्म घेतात. एकदा वाढलेली फांदी प्रजननाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गळून पडते आणि नवीन वर्षी नव्या फांद्या फुटतात. यामध्ये देखील मूळांच्या रूपाने ऑर्किड निसर्गात मुक्त श्वास घेत असतं आणि त्या प्रत्येक श्वासाला ओढ असते ती पावसाच्या थेंबांची. झाडांच्या खोडांत वाढणारी ऑर्किड्स ही बहुधा Epiphytic या प्रकारातील असतात म्हणजेच ते कुठल्यातरी वृक्षाच्या फांद्यांवर किंवा खोडांत वाढतात पण अन्नद्रव्यांसाठी ते त्यावर अवलंबून नसतात. या विशिष्ठ ऑर्किड्सच्या मुळांमध्ये पेशींची विशिष्ठ रचना असते, पेशीचा प्रेत्येक कोन हा जवळ जवळ काटकोन असतो, त्यामुळे मुळांच्या बाह्यरचनेवर त्याचा परिणाम होतो. मुळं शक्यतो मुख्य वृक्षाच्या फांदीला चिकटून आणि समांतर वाढतात. या अजब वाढीमुळे ऑर्किडला वरच्या वाढीसाठी आणि संपूर्ण डोलारा सांभाळण्यासाठी आधार मिळतो. ही मुळे हवेतील आद्रता आणि मुख्य वृक्षाच्या फांदीवरील अन्नद्रव्य शोषून घेतात. एवढं पाणी आणि अन्नद्रव्य ऑर्किडला पुरेशी असतात.

ऑर्किड्सची फुले दिसायला आकर्षक असतात, पण यामध्ये एक गंमत आहे ती म्हणजे फुले झाडावर उलटी लागतात. म्हणजेच वरची बाजू खाली आणि खालची बाजू वर अशा प्रकारे. फुलाची दांडी ही १८० कोणामध्ये वळलेली असते, अर्थात हे आपण वरवर पाहताना लक्षात येत नाही. आणखी एक गमतीदार गोष्ठ म्हणजे ऑर्किडच्या बिया अतिशय सूक्ष्म असतात, सूक्ष्म म्हणजे नुसत्या डोळ्यांनी दिसण्याइतपत सूक्ष्म, त्यासाठी सूक्ष्मदर्शी (Compound Microscope) चा उपयोग करावा लागतो. फळे परिपक्व झाल्यानंतर जेव्हा फळे फुटतात तेव्हा लाखो बिया यातून बाहेर पडतात आणि हवेवर स्वार होऊन पुढच्या पिढीच्या तयारीला लागतात. अशा लाखो आणि अतिसूक्ष्म बिया निर्माण करण्याचं कारण म्हणजे, ऑर्किडच्या बियांना रुजण्यासाठी बुरशी (fungus) ची गरज असते, त्याशिवाय त्या रुजल्या जात नाहीत. हवेवर स्वार झालेल्या बियांपैकी एक टक्क्याहून कमी बिया योग्य त्या बुरशीच्या संपर्कात येतात आणि रुजतात, उरलेल्या मरून जातात. या एवढ्या एका कारणामुळे ऑर्किडला एका फळामध्ये लाखो बिया निर्माण करण्याची क्षमता निसर्गाने दिली असावी!


गुलाबी दांडेअमरीबद्दल थोडसं:

सह्याद्रीमध्ये सर्वत्र आणि सहज वाढणार असंच एक सुंदर ऑर्किड म्हणजे "गुलाबी दांडेअमरी" इंग्रजीमध्ये याला "Small-Bearded Dendrobium" नावाने ओळखतात. गुलाबी दांडेअमरी ही समुद्रसपाटीपासून साधारणपणे - हजार फुट उंचीच्या प्रदेशामध्ये वाढते. अर्थात जिथे तुम्हाला हे ऑर्किड दिसेल तिथे तुम्ही त्या उंचीवर पोहोचला आहात असा सरळ अर्थ लावण्यास हरकत नाही. ऑर्किड्सला पाणी कमी आणि सूर्यप्रकाश अधिक लागतो म्हणून ही ऑर्किड्स या उंच प्रदेशात जन्माला येत असावीत, इथे सगळंच त्यांना हवं तसं मिळतं.

पावसाळ्यानंतर "गुलाबी दांडेअमरी" ची वाढ झाडांच्या खोडात आणि फांद्यांवर व्हायला सुरवात होते. पाने एकाड-एक स्वरूपामध्ये लागतात आणि गर्दीने वाढतात. प्रत्येक पान हे मांसल आणि गर्द हिरवे असते, लांबी साधारणपणे १०-१२ सेमी पर्यंत आणि रुंदी सेमी पर्यंत असते. पानांच्या शिरा एकमेकांना समांतर वाढतात आणि त्या सर्व टोकाकडे एकत्र भेटतात. वरच्या बाजूने पाहिल्यास एखाद्या फुलाप्रमाणे पानांची रचना भासते. पानांच्या मध्यातून जांभळ्या किंवा मरून रंगाची एक दांडी बाहेर पडते, साधारणपणे १०-१५ सेमी लांबीची. हे दिवस असतात हिवाळा संपून उन्हाळा सुरु होण्याचे, साधारणपणे फेब्रुवारीचा शेवट आणि मार्चची सुरुवात. योग्य उन्हाचा चटका पडू लागला कि या दांडीवर -१५ टपोरी गुलाबी किंवा काहीशी मंद जांभळ्या रंगाची फुले लागतात. प्रत्येक फुल साधारणपणे - . सेमी लांबीचे असते. बाहेरील बाजूला तीन गुलाबीमिश्रित मंद जांभळ्या रंगाची पाकळ्यांची संरक्षण दले असतात त्याच्या आत पुन्हा याच रंगाच्या तीन पाकळ्या. त्यातली मुख्य पाकळी खालच्या बाजूने असते. फुलाच्या मध्यभागी पिवळा रंग असतो, हा रंग पुढे परागीभवनासाठी कीटक आणि पक्षांना आकर्षित करण्यासाठी मदत करतो. ऑर्किड्समध्ये तीन पुंकेसर असतात, त्यातील दोन प्सुडो (psudo) म्हणजे निकामी असतात. अर्थात त्यांच्यामध्ये परागकण निर्माण करण्याची क्षमता नसते. यातला एकटा पुंकेसर हा इतके परागकण निर्माण करतो की त्या फुलासोबत आजूबाजूची सर्वच फुले तो फलित (fertilize) करू शकतो.


तयार झालेले परागकण पक्षी, फुलपाखरे आणि कीटक कुक्षी पर्यंत नेउन पोहचवतात. परागकण वाहनाची प्रक्रिया अतिशय गमतीशीर आणि निसर्गाची किमया सांगणारी आहे. परागकण एकदा का परिपक्व झाले की ते पुंकेसारातून बाहेर येतात. ऑर्किड्समध्ये मात्र पुंकेसरातून परागकणांच्या पिशव्या बाहेर पडतात, या पिशव्यांना polinia म्हणतात. पुंकेसारातून या पिशव्या बाहेर पडत असताताना त्या विशिष्ठ एका बाजून पडतात, कारण या बाजूवर चिकट स्राव असतो. कीटक, फुलपाखरे किंवा पक्षी फुलाला भेट देतात तेव्हा त्यांच्या अंगावर या पिशव्या या स्रावामुळे चिकटतात आणि हे कीटक पुंकेसरावरून निघाले की या पिशव्या पुंकेसारातून ओढल्या जाऊन वेगळ्या होतात. या पक्षांसोबत किवा किटकांसोबत या polinia प्रवास करतात, प्रवासादार्म्याने हवेच्या जोराने polinia आपली कूस बदलतात आणि पुढील फुलावर बसेपर्यंत ही चिकट स्राव असलेली बाजू पुन्हा समोर येते. मग नशिबाने यातल्या काही पिशव्या योग्य स्रिकेसरावर चिकटत आणि पुढील प्रजननाचे सोपस्कार सुरु होतात.

प्रजननाच्या प्रक्रियेनंतर तीन दलं असलेली फळे लागतात आणि पुढे मग बिया भरल्या जातात. फळे परिपक्व झाली की ती फुटून लाखो बिया एकाच वेळेला बाहेर पडतात, हवेवर स्वार होऊन निघतात बुरशीच्या शोधयात्रेला. या शोधयात्रेत कुणाला बुरशी मिळते तर कुणाला नाही. या सर्व प्रवासात गुलाबी दांडेअमरीच्या फुलांचं आयुष्य फक्त पंधरा दिवसांचं असतं, पण या पंधरा दिवसांत संपूर्ण सृष्टी यांच्या सौंदर्याचे गोडवे गात असते.

गुलाबी दांडेअमरीला शास्रीय भाषेत "Dendrobium barbatulum Lindl. अशा नावाने ओळखतात, या सौंदर्यवतींचा समावेश "Orchidaceae" या कुळामध्ये करण्यात आलेला आहे.

Plant Profile:

Botanical Name: Dendrobium barbatulum Lindl
Synonyms: NA
Common Name: Small-Bearded Dendrobium
Marathi Name: Gulabi Dande Amari (गुलाबी दांडेअमरी)
Family: Orchidaceae
Habit: Herb
Habitat: Deciduous forest (पानगळीची वने)
Flower Colour: Pink to violate (गुलाबीमिश्रित मंद जांभळा)
Leaves: Simple, Leathery, Linear, parallel venation
Smell: No Smell
Abundance: Common in Sahyadri ranges on hill tops and deciduous forests.
Locality: Durgawadi, Junnar, Rural Pune, MH
Flowering Season: March to May
Date Captured: 25-Mar-15