Sunday, 12 March 2017

Flowers: Divine Jasmin | Kalpendra / Pandhara – कल्पेंद्र / पांढरा | Tamilnadia uliginosa (Retz.) Tirveng. & Sastre

उन्हाळा म्हटलं की बाहेर पडायला नको वाटतं. त्यातल्या त्यात डोंगरवाटा तर नकोशा होतात. तसही उन्हाळ्यात काय पाहायचं डोंगरांवर, सुकलेलं गवत की पानगळ झालेली शुष्क झाडं? घरातली मंडळी सुद्धा बाहेर पडू देत नाही, उन्हात आजारी पडाल अशी तंबी देतात. मग काय घरातच काहीतरी उद्योग सुरु होतो, सावलीत खेळायचे जुने खेळ शोधून काढले जातात आणि डाव मांडला जातो. पण एखादी पाणथळ जागा किंवा हिरवं गार जंगल फिरायला काय हरकत आहे? सकाळी सकाळी लवकर उठून उन्हाच्या आधी एखादा फेरफटका मारला तरी एखादे दोन पक्षी, एखाद छानसं फुलपाखरू किंवा सुंदर फुल तुमचं लक्ष वेधून घेऊ शकतं आणि दिवस अगदी आनंदात जाऊ शकतो.


मागच्या वर्षीचा एप्रिल महिना मला आठवतो, असंच सकाळी लवकर आवरून सिंहगड किल्ल्याची वाट धरली होती. ऊन खूप म्हणून पायथ्याच्या जंगलात घुसलो, हिंडलो आणि दोन-तीन तासांच्या भ्रमंतीनंतर पुन्हा घरी निघालो. वाटेत येताना खडकवासला धरणाजवळ दोन तीन टपोऱ्या पांढऱ्या फुलांनी माझं लक्ष वेधून घेतलं, न राहवून गाडी बाजूला थांबवली. थोडं जवळ जाऊन पाहिलं, पण फुलांची ओळख काही पटेना. आणखी थोडं जवळ जाऊन निरीक्षणं  घेतली. फुलांना छान आणि मनमोहक सुगंध होता. सकाळपासूनच्या नकोशा झालेल्या उन्हात नवीन फुलं सापडल्याने मी मनोमन सुखावलो होतो. थोडा वेळ आजूबाजूला फिरून संपूर्ण झाडाचं नीट निरीक्षण केलं, आवश्यक त्या नोंदी करून घेतल्या आणि निघालो, परतीच्या प्रवासाला! येताना संबंध रस्त्यातून डोक्यात वेगवेगळ्या शक्यतांचं काहूर! कसली फुलं असतील ही नक्की? एक ना अनेक प्रश्नांना सोबत घेऊन मी घरी परतलो.


घरी पोहोचून शोधाशोध सुरु झाली आणि शेवटी नाव सापडलं;  कल्पेंद्र किंवा पांढरा असं ते नाव! कल्पनेपलीकडचं सौंदर्य आणि पांढऱ्या रंगाची टपोरी फुलं म्हणून हि नावं असावीत असं मला वाटतं आणि ती या फुलांना अगदी साजेशी आहेत. उन्हाळ्यात विशेषतः झाडांना (वृक्षांना) आणि झुडपांना फुलं लागतात. गवती वनस्पती क्वचितच फुलतात. उन्हाळ्यात माणसांना जसा उन्हाचा त्रास होतो तसाच त्रास साहजिकच प्राण्यांना, पक्षांना, फुलपाखरांना, मधमाशांना आणि इतर सजीवांना होत असणार. त्यामुळेच पक्षी किंवा इतर सजीव उन्हाच्या वेळी क्वचितच बाहेर पडताना दिसतात, शक्यतो ते सकाळी आणि संध्याकाळी जास्त प्रमाणात बाहेर पडतात. उन्हाच्या वेळी कुठेतरी शांत झाडाच्या सावलीत, घरट्यात किंवा कड्या-कपारीत विश्रांती घेतात. मग परागीभवनाच्या नैसर्गिक आणि दैवी कार्याला या सर्व सजीवांना उद्युक्त कसं करायचं? पण निसर्गात सर्व गोष्टींची सोय केलेली असते, प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार केलेला असतो. उन्हाळ्यात जी फुले लागतात ती शक्यतो सुगंधी तरी असतात किंवा ती दिसायला सुंदर आणि भडक रंगांची तरी असतात, कधीकधी तर हे दोन्ही गुणधर्म एकाच फुलात दिसतात. कल्पेंद्र सुद्धा सौंदर्य आणि सुगंध हे दोन्ही गुण अंगी बाळगणारा आहे. मग साहजिकच पक्षी, कीटक, फुलपाखरे, मधमाशा वैगेरे फुलांकडे आकर्षित होतात आणि परागीभवनाचे सोपस्कार पार पडतात. असो, आपण कल्पेंद्र या वृक्षाची माहिती या लेखात आज घेऊ.


कल्पेंद्र तसा पाणथळ, तळ्याकाठचा, नदीकाठचा अथवा दलदलीच्या भागातला लहान उंचीचा वृक्ष.  उंची साधारणपणे १२ ते १५ फुटांपर्यंत असते. वृक्षाचा पसारा साधारणपणे ७ ते १० फुटांपर्यंत असतो. कल्पेंद्रचे खोड कडक काळपट करड्या रंगाचे आणि साल खरखरीत असते. नवीन फुटलेल्या फांद्या गोलाकार नसून चौकोनी असतात. वृक्षाच्या सर्वांगावर आडव्या छोट्या फांद्या वाढतात आणि या छोट्या फांद्यांच्या टोकाला काट्यांच्या एक किंवा दोन जोड्या वाढतात.

काटे तीक्ष्ण असल्याने झाडावर प्राण्यांना चढण निव्वळ अशक्य होतं, यामुळं फुलांचं आणि फळांचं रक्षण आपोआप होतं. नवीन वाढलेल्या फांद्यांवर ५ ते ८ सेमी लांबीची आणि साधारणपणे ३ सेमी रुंदीची पाने लागतात. पानांची रुंदी टोकाकडे अधिक असते आणि देठाकडे ती कमी कमी होत जाते. टोकाकडचा भाग गोलाकार असल्याने ती देठाकडून पाहिल्यास फुगवलेल्या फुग्याच्या आकाराची किंवा अंडाकृती दिसतात. देठ साधारणपणे १ ते १.५ सेमी लांबीचा असतो. पानांचा रंग मंद हिरवा आणि चमकदार असून काठ एकसंध असतो. जोडणी एकमेकांच्या विरुद्ध असते, कधी कधी पाने छोट्या फांद्यांच्या टोकाला पुंजक्यांच्या स्वरूपात सुद्धा वाढतात. उन्हाळ्याच्या सुरवातीला जुनी पाने गळून टोकाला नवीन पाने येतात.


कल्पेंद्रची खरी ओळख आहे ती त्याच्या सुंदर आणि मनमोहक सुगंधासाठी. एका फुलोऱ्यात एक ते तीन फुलं असतात. फुलांचा रंग शुभ्र पांढरा असतो आणि उन्हात तो आणखी चमकदार होतो. फुलं टपोरी म्हणजे साधारणपणे २-३ सेमी व्यासाची असतात. यामध्ये पाच पाकळ्यांची संरक्षण दले, पाच पांढऱ्या शुभ्र पाकळ्या, पाच पुंकेसर आणि एका स्रिकेसराचा समावेश असतो. पाकळी गोलाकार असून ती बाजूच्या पाकळीच्या काठावर पसरलेली (Overlap) असते. दोन पाकळ्यांच्या मध्ये आणि तळाला पुंकेसर वाढतो. परिपक्व झाल्यावर तो पाकळ्यांच्या बाजूला बाहेरून नागमोडी वळतो आणि त्यांचा रंग काहीसा तांबूस किंवा खाकी होतो. त्यातून पुढे परागकण बाहेर पडतात. पुंकेसरांच्या मधोमध पिवळ्या किंवा केशरी रंगाचा स्रिकेसर येतो, तो परिपक्व झाला की टोकाला दोन दलांत विभागला जातो. स्रिकेसर आणि पुंकेसराचे दांडे खूप लहान अगदी न दिसणारे असतात. संपूर्ण स्रिकेसर किंवा पुंकेसर फार तर अर्धा सामी लांबीचे असतात. फुलांचा रंग मध्यभागी काहीसा हिरवा असतो, त्यामुळे परागीभवनासाठी येणारे पक्षी, कीटक, मधमाशा किंवा फुलपाखरं योग्य ठिकाणाकडे आकर्षित होतात, एका फुलावरून दुसऱ्या फुलांवर बसणं-उठणं होतं आणि परागीभवनाची प्रक्रिया पार पडते. सह्याद्रीतील खट्याळ वारादेखील या निसर्गकार्यात सहभागी असतो. पुढे निसर्गनियमाने फळधारणा होते, साधारणपणे ४-५ सेमी लांबीची म्हणजेच पेरूच्या किंवा चिक्कूच्या आकाराची फळे लागतात. फळे पिकून पुढे पिवळसर केशरी रंगाची होतात. फळं बेरी या प्रकारातील असून निसर्ग लहान लहान बिया आतील गरामध्ये पेरतो. पूर्ण पिकलेली फळं जमिनीवर पडतात, सडतात आणि यातील काही बिया योग्य वातावरणात रुजतात.

कल्पेंद्रला योग्य प्रमाणात पाणी असल्यास वर्षभर फुलं लागतात. त्याच्या सुंदर फुलांमुळे आणि मनमोहक सुगंधामुळे त्याची लागवड काही ठिकाणी बागेत केलेली दिसते. अर्थात या सौंदर्याचा लाभ घेताना त्यावरचे काटे विसरू नयेत. कल्पेंद्र रुबीऐसी (Rubiaceae) या कुळातील असून त्याला Tamilnadia uliginosa (Retz.) Tirveng. & Sastre असं शास्त्रीय नाव आहे. यातील Tamilnadia हे जातीचं नाव तामिळनाडू या नावावरून आल्यासारखं वाटतं.कल्पेंद्र हा या जातीतील एकमेव वृक्ष आहे. मराठीमध्ये याला पांढरा असही एक नाव आहे. इंग्रजीमध्ये याला Divine Jasmin नावाने ओळखतात.




Plant Profile:


Botanical Name: Tamilnadia uliginosa (Retz.) Tirveng. & Sastre
Synonyms: Gardenia uliginosa, Catunaregam uliginosa, Randia uliginosa, Gardenia pomifera
Common Name: Divin Jasmin
Marathi Name: कल्पेंद्र, पांढरा
Family: Rubiaceae
Habit: Tree
Habitat: Near water bodies and moist soil (पाणथळ, तळी, नदीकाठ किंवा दलदल)
Flower Colour: White (पांढरा)
Leaves: Simple, oblong, 5-8 cm long and 3-4 cm wide, entire margin
Smell: fragrant
Abundance: Common near water bodies
Locality: Khadakwasala Dam, Pune
Flowering Season: March-May
Date Captured: 10-Apr-2016




-       रा.जा. डोंगरे

Saturday, 3 September 2016

Flowers: Glory Lily | Agnishikha / Kal lavi – अग्निशिखा / कळलावी | Gloriosa superba L.

Pre-matured  or early young flower
"दुपार झाली, येणं होईल का अंधार पडेपर्यंत? त्यात गणपती बुडणार आज, सगळीकडं मिरवणुका" सुभाषने शून्यात पाहत सवाल विचारला. मी आपला तसाच शांत होतो. काही क्षण असेच निशब्द गेले आणि पुन्हा तोच बोलला, "पाच मिनटं थांब, गाया सावली बांधू, पाणी पाजू, खायला घालू आणि येऊ जाऊन पटकन; फक्त मध्ये कुठं थांबायचं नाही. माझा होकार नकार ऐकण्याआधीच तो निघून गेला. मी तिथेच पारिजातकाच्या झाडापाशी थोडा वेळ घुटमळलो, काही फुलं गोळा करून ओंजळीत घेतली. तेवढ्यात सुभाष आला आणि आम्ही निघालो.

२००७ सालचा गणपती विसर्जनाचा दिवस, सुभाष आणि मी हडसरला निघालो होतो. कारण होतं एक वेगळी वनस्पती पाहायची. सुभाषच्या म्हणण्याप्रमाणे पावसाळ्यातलं सर्वाधिक सुंदर फुल. तेव्हा आमच्या कुणाकडेच कॅमेरे नव्हते त्यामुळं नुसती वर्णनं ऐकूनच खुश व्हायचो किंबहुना कल्पनेच्या जगात हरवून जायचो! ही सर्वाधिक सुंदर वनस्पती म्हणजे "अग्निशिखा". रस्ताभर सुभाष अग्निशिखेची जमेल तेवढी माहिती सांगत होता, मी शक्य तेवढं ऐकून समजून घेत होतो. जुन्नर ओलांडल्यावर हिरवीगार माळरानं पाहून दोघे थोडे शांत झालो आणि सृष्टीचा आनंद घेऊ लागलो. पुढे धरणाच्या कडेला रस्त्यावरून छोट्या वाडीवरची गणपतीची मिरवणूक लागली. मनोमन गणपतीला वंदून अग्निशिखेचे दर्शन व्हावे अशी इच्छा व्यक्त केली. एव्हाना हडसर नजरेच्या टप्यात येऊ लागला होता. सुभाषने सांगितलं आता आजूबाजूला लक्ष ठेव इथून पुढं फुलं दिसायला सुरवात होईल. गाडीचा वेग मंदावून आम्ही रस्त्याच्या दुतर्फा शोधाशोध सुरु केली. साधारणपणे दोन किमी रस्ता मागे टाकला पण दर्शन काही होईना, सुभाष आपला बोलत होता "दरवर्षी खूप असते पण यावर्षी पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळं जास्त फुलली नाही वाटतं". तितक्यात गुरं चारणारे एक आजोबा भेटले, त्यांना आम्ही विचारलं आणि त्यांनी आम्हाला खून सांगितली.

Flower which is about to mature. Colours are changing and
Petals turned back and forming a round
बाबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही त्या जागेवर पोहोचलो आणि शेवटी "अग्निशिखेची" वेल दिसली, फुलांनी भरलेली, भाराने काहीशी झुकलेली. फुलं इतकी सुंदर कि काही क्षण मी आणि सुभाष काहीच बोललो नाही. फुलांची ती चित्र डोळ्यांत साठवून घेतली, फुलांना स्पर्श केला आणि थोडंसं दूर जाऊन उगाच त्या वेलीकडं काही काळ पाहत उभा राहिलो. मन भरल्यानंतर, आजूबाजूला फेरफटका मारला. आता एकामागून एक अग्निशिखाच्या वेली आम्हाला दिसत होत्या. प्रत्येक नवी वेल आमच्या मनात आनंद आणि समाधान भरत होती. शेवटी एका फुलापाशी स्तिरावून मी निरीक्षण घेऊ लागलो. सगळी निरीक्षण घेऊन आम्ही पुन्हा परतीच्या मार्गाला लागलो!

अग्निशिखेविषयी थोडंसं:

अग्निशिखा सर्वसाधारणपणे पावसाळयात दिसणारी वेल. पहिल्या पावसानंतर जमिनीत झोपलेले कंद जागे होतात आणि कोंब जोमाने जमिनीतून बाहेर पडतात. महिन्याभरात जवळच्या झुडपावर आपल्या वेलींची चादर पसरवून टाकतात. अग्निशिखेची पाने साधारणपणे - सेमीची असतात, गर्द हिरवा रंग, स्पर्श केल्यावर काहीशी मांसल लागतात, कंदिलाच्या आकाराची आणि टोकाला अगदी धाग्यासारखी लांब होतात. टोकाकडचा हा धागा १०-१५ सेमी लांबीचा असतो. हा तंतू वेलीला इतर झुडपांवर चढण्यासाठी आणि त्यांना घट्ट धरून ठेवण्यासाठी मदत करतो. जुलैच्या शेवटी आणि ऑगस्टच्या सुरवातीला या वेलींवर फुले लागायला सुरवात होते. फुले बऱ्यापैकी मोठी असतात साधारणपणे - सेमी लांबीची. सुरवातीला पाकळ्यांचा रंग हिरवा असतो आणि पाकळ्या जमिनीकडे झुकलेल्या असतात. प्रत्येक पाकळी साधारणपणे - सेमी लांबीची आणि पाकळीच्या कडा नागमोडी असतात. सगळ्या मिळून सहा पाकळ्या येतात. पाकळ्यांना संरक्षण दले (Sepals) नसतात. सर्वसाधारणपणे प्रत्येक फुलामध्ये पाकळ्या (Petals) आणि त्याची संरक्षण दले (Sepals) अशीच रचना असते, पण अग्निशिखा मात्र याला अपवाद असून या दोन्ही रचनांमिळून फक्त पाकळ्या तयार होतात. या विशिष्ट रचनेला शास्त्रीय भाषेत Tepals असे म्हणतात. पाकळ्यांच्या मध्यातून पुंकेसर आणि एक स्त्रीकेसर निघतो. यातील पुंकेसर साधारणपणे सेमी लांबीचा असून त्याच्या टोकावर परागकोश असतात. पुंकेसराच्या मधोमध श्रीकेसराची रचना असते. साधारणपणे सेमी लांबीची हिरव्या रंगाच अंडाशय (Ovary) असते आणि त्यातून सेमी लांबीचा हिरव्या रंगाचा आडवा स्त्रीकेसर वाढतो. याचे टोकाला तीन भाग झालेले असतात आणि त्यामुळे तोंड थोडंसं मोठं झालेलं असतं. यातून परागकण आत घेणं सोपं होतं. स्त्रीकेसर आणि पुंकेसराच्या दांड्या या काहीशा वक्राकार असून पाकळ्यांच्या बाजूला झुकलेल्या असतात.

Fully matured flower
गंमत म्हणजे जसजशी फुलांची वाढ पूर्ण होत जाते तसे फुलामध्ये विशीष्ठ बदल होत जातात. पाकळ्या ज्या जमिनीकडे झुकलेल्या असतात त्या हळू हळू वक्राकार होऊन मागच्या बाजूला झुकतात. पाकळ्यांचा रंग हिरव्यापासून पिवळा आणि मग लाल होतो. मधल्या काळात त्यामुळे फुलं टोकाला लाल मध्यभागी पिवळी आणि खाली हिरवी दिसतात. या तिरंगी रंगसंगतीमुळे फुले सर्वाधिक सुंदर दिसतात. पुढे पिवळा आणि हिरवा रंग नाहीसा होत जातो आणि त्याची जागा हळू हळू लाल रंग घेतो. पाकळ्या मागच्या बाजूला वक्राकार झुकल्यामुळे फुले गोलाकार होतात आणि आतमध्ये पोकळी तयार होते. याचवेळी पुंकेसर आणि स्त्रीकेसर फलनासाठी तयार झालेले असतात. एव्हाना ऑगस्ट संपायला आलेला असतो आणि ऊन, पाऊस आणि वारा यांचा लपंडाव सुरु झालेला असतो. फुलपाखरं आणि इतर कीटक मनसोक्त फिरायला लागलेले असतात. बऱ्याचदा फुलपाखरे आणि कीटक फुलांच्या पोकळीत अडकतात आणि स्वतःला सोडवून घेण्याच्या खटाटोपात फुलाची हालचाल होते आणि परिणामी परागकण कुक्षीपर्यंत जाऊन पोहोचतात. या व्यतिरिक्त पावसाचे थेंब, पक्षी, वारा असे बरेचजण फलनाची प्रक्रिया सुरु होण्यासाठी मदत करतात. फलनानंतर -१२ सेमी लांबची फळे लागतात आणि ती परिपक्व झाली कि त्यातून लाल रंगाच्या बिया निसर्गात पसरतात. दरवर्षी हे चक्र असच सुरु असतं.

अग्निशिखा ही अत्यंत विषारी वनस्पती असून या वनस्पतीचा प्रत्येक भाग विषारी असतो. त्यातल्या त्यात कंद हे सर्वाधिक विषारी आहेत. विषाची तीव्रता इतकी जास्त असते कि चुकून खाण्यात आल्यास काही तासांत उलटया, जुलाब, लघवी वाटे रक्तस्राव होतो, कधी कधी स्नायू निकामी होतात, चेता संस्था बंद पडून मेंदूचे शरीरावरील नियंत्रण सुटते आणि मृत्यू ओढवतो. अग्निशिखा हि औषधी वनस्पती सुद्धा आहे. कॅन्सर, संधिवात, सर्पदंश, त्वचेवरील जखमा वैगेरे वरती हि उत्तम औषध म्हणून काम करते. कंदाचा अर्क स्रियांच्या प्रसूतीवेळी स्किनवर बाहेरून लावल्यास प्रसूतीकळा कमी होऊन प्रसूती सुकर होते असे मानन्यात आले आहे. आणि म्हणून मराठी मध्ये कळलावी असं नाव प्रचलित आहे. याच नावावरून आणखी एक समज प्रचलित आहे तो म्हणजे, ही वनस्पती घरात घेऊन आल्यास भांडणं लागतात. जनावरे बाजारात विक्रीसाठी नेण्याआधी अग्निशिखाची पाने चुरगळून त्यांच्या त्वचेवर लावतात. त्याने सूज येऊन जनावरे थोडी जास्त धष्ट -पुष्ट भासतात आणि त्यातून चांगली किंमत मालकाला मिळते. फुलांच्या पाकळ्या नागमोडी असल्याने आणि भडक रंगामुळे "बचनाग" हे नाव सुद्धा प्रसिद्ध आहे. पूर्ण वाढ झालेली फुले वाघाच्या पंजासारखी भासतात आणि म्हणून इंग्रजी नावांमध्ये एक नाव "Tiger Claw" असे आहे.

Habitat: plant growing on Lantana camera bush
अग्निशिखेला मराठीमध्ये आणखी काही नावे आहेत; कळलावी, इंदाई, बचनाग, खाद्यनाग, वाघचबका अशी बरीच काही. इंग्रजीमध्ये याला Glory Lily, Gloriosa Lily किंवा Tiger Claw असं म्हणतात. शास्त्रीय भाषेत याला Gloriosa superba L. या नावाने ओळखत असून यांचा समावेश Colchicaceae या कुळामध्ये करण्यात आला आहे. शास्त्रीय नावामध्ये Gloriosa हा शब्द चमकदार अशा अर्थाने तर superba हा शब्द superior ovary (अंडाशय पाकळ्यांच्या वर असल्यास त्याला शास्त्रीय भाषेत superior overy म्हणतात) या अर्थाने आला आहे.








Plant Profile:

Botanical Name: Gloriosa superba L.
Synonyms: Gloriosa rothschildiana, Gloriosa speciosa, Gloriosa simplex
Common Name: Glory Lily, Gloriosa Lily, Tiger Claw
Marathi Name: अग्निशिखा, कळलावी, इंदाई, बचनाग, खाद्यनाग, वाघचबका
Family: Colchicaceae
Habit: Climber
Habitat: Deciduous forest, Grasslands (पानगळीची वने)
Flower Colour: Yellow & Red (पिवळा आणि लाल)
Leaves: Simple, sessile, Lance shaped, 4-6 cm long and ends with tendril
Smell: No Smell
Abundance: Common in Sahyadri ranges in deciduous forests and grasslands.
Locality: Hadsar Fort, Junnar Pune
Flowering Season: July to September
Date Captured: 29-Jun-2015


-       रा.जा. डोंगरे