Sunday, 10 October 2021

Flowers: Rice Vampireweed | Tutari – तुतारी | Rhamphicarpa fistulosa (Hochst.) Benth.


एक तुतारी द्या मज आणुनी

फुंकीन मी जी स्वप्राणाने

भेदुनि टाकिन सगळी गगनें

दीर्ध जिच्या त्या किंकाळीने

 कविवर्य केशवसुतांच्या या ओळींची आठवण व्हायचं निमित्त म्हणजे मागच्या आठवड्यात फोटो काढलेल्या सुंदर तुतारी फुलांचं. सूर्यास्ताची वेळ. ढगांच्या आडून लालबुंद सूर्याचा गोळा क्षितिजावर निरोप घेत होता. मी मावळत्या सूर्याचे काही फोटो घेतले आणि सहज खाली पाहिलं तर अगदी जवळच पांढरी शुभ्र फुलं उमलली होती. काही अजून अर्धवट उमललेली तर काही नुसत्याच कळ्या.


ही तुतारीची फुलं मोठी चमत्कारिक; इतरांचा दिवस संपला की यांचा सुरु होतो. म्हणजे तिकडे सूर्यनारायणांनी निरोप घेतला की यांची उमलण्याची लगबग सुरु होते. अंधार पडेपर्यंत जवळ जवळ सर्व फुले उमलतात. रात्री चंद्राचा प्रकाश शोषून घेऊन ही पांढरी फुलं आणखी शोभिवंत दिसतात. त्यात पठारावर फुलांची पेरण दाट असेल तर शब्दात वर्णन करता येणार नाही असं चित्र असतं. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात ढगांच्या आशीर्वादाने चंद्रप्रकाश नशिबी आलाच तर सह्याद्रीच्या डोंगररांगांच्या पठारांवर हमखास जाऊन हा सोहळा अनुभवावा.असा अनुभव मी दोनदा घेतला आहे; एकदा जुन्नरच्या नाणेघाटाजवळ तर एकदा हडसर किल्ल्याजवळ! आयुष्यभर लक्षात राहील असं दृश्य होतं ते. सायंकाळी फिरणारी फुलपाखरं, पतंग (Moth) आणि वटवाघळांना ही फुलं सापडण्यास मदत व्हावी म्हणून कदाचित निसर्गाने या फुलांना सफेद रंग बहाल केला असावा!


तुतारी रात्री उमलत असल्याने फारशी प्रचलित नाही. त्यातल्या त्यात सध्याच्या सोशल मीडियावरसुद्धा हिला फारशी प्रसिद्धी सुद्धा मिळालेली दिसत नाही. फुलं कितीही सुंदर असली तरी ही वनस्पती दोन कारणांसाठी बदनाम आहे. पहिलं म्हणजे, ही काहीशी परोपजीवी आहे. आपली मुळं अलगद इतर गवतांच्या मुळांत रोवायची आणि त्यातून गुपचूप आपलं पोट भरत राहायचं हा हिचा स्वभावदोष. आणि दुसरं म्हणजे भात-खाचरांत भातावर पोट भरल्यामुळे शेतकऱ्यांच्या शिव्याशापाला हिला सामोरं जावं लागतं.


असो, मला खरं कौतुक वाटतं ते रानफुलांच्या मराठी नाव देणाऱ्या कल्पक व्यक्तींचं! या फुलास पाहिल्यावर तुतारीची आठवण होणार नाही असं होऊच शकत नाही. हुबेहूब तुतारीच. ही वनस्पती फार फार तर एक फुटापर्यंत वाढते. पानं मधल्या खोडावर एकमेकांच्या विरुद्ध वाढतात. पानं पर्णिकांच्या एकत्र येऊन बनतात. या पर्णिका सुईला बहीण शोभाव्या इतक्या पातळ आणि सरळ. संपूर्ण पान पाहिलं तर अशा अनेक सुया एकत्र येऊन जाळी तयार झल्याचा भास होतो. पानाच्या देठाची जिथे थोडाशी भेट होते अगदी बरोबर तिथूनच फुलाची नळी निघते. याच ठिकाणी फुलाला आधार देणारी पाच हिरव्या रंगाची आणि एखाद सेमी लांबीची संरक्षणदले (निदलपुंज) असतात. फुलांची नळी पाकळ्यांच्या दिशने जाड होत जाते. त्यावर बारीकशी भुरक्या रंगाची लव असते. दीड-दोन सेमीच्या नळीच्या तोंडाला पाच पाकळ्या दिसतात. या पांढऱ्या शुभ्र पाकळ्या एकमेकांचा हाथ पकडून फेर धरावा ताशा खाली जोडलेल्या असतात. बरोबर मध्यभागी पुंकेसर नळीतून डोकावताना दिसतो. त्याच्या मुळाशी श्रीकेशरांची रचना असते.



नमूद केलेली दोन कारणे सोडली तर या सुंदर फुलांच्या कुणीही प्रेमात पडेल. तुतारीला Rice Vampireweed असं इंग्रजी नाव आहे.  शास्रिय भाषेत Rhamphicarpa fistulosa (Hochst.) Benth. या नावाने हिला ओळखतात आणि हिचा समावेश Orobanchaceae या कुळात केला आहे.

 

तुम्ही सह्याद्रीतील पठारांवर विशेतः जिथे सतत पाऊस पडून ओली जमीन असते अशा जागांवर गेलात तर हिचं दर्शन नक्की होईल. सायंकाळी उशिरा थांबण्याची तयारी असेल तर पूर्ण उमललेली फुलं सुद्धा पाहायला मिळतील.




Plant Profile:

 

Botanical Name: Rhamphicarpa fistulosa (Hochst.) Benth.

Synonyms: NA

Common Name: Rice Vampireweek

Marathi Name:  तुतारी (Tutari)

Family: Orobanchaceae

Habit: Herb

Habitat: Wetlands

Flower Colour: White (सफेद, पांढरा)

Leaves: Pinnately compound, 3-5 cm long, Green to Red in colour.

Smell: Light fragrance

Abundance: Common

Locality: Malshej Ghat, Junnar, Pune

Flowering Season: Sep-Nov

Date Captured: 03-Oct-2021

 

-          राजकुमार डोंगरे

        Follow me on Instagram for Wild Flowers & Nature Photography



Thursday, 6 June 2019

विनाशकारी काजवा महोत्सव: किती खरा किती खोटा?

गेल्या एक-दोन आठवड्यांत काजवा महोत्सव कसा चुकीचा आहे आणि तो बंद करायला हवा हे पटवून देणारे लेख आणि मेसेजेस व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर विविध बातम्यांची कात्रणं, लेख, आव्हानात्मक व्हिडीओ वैगेरे फिरताना दिसत आहेत. हे सर्व पाहिल्यानंतर सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या गोष्टी आणि माझा वैयक्तिक अनुभव यामध्ये मोठी तफावत दिसते. अर्थात सह्याद्रीत भरवल्या जाणाऱ्या काजवा महोत्सवाला माझा विनाशर्त पाठिंबा आहे असं समजण्याचं काहीच कारण नाही. परंतु सर्व गोष्टी विचारात घेता, काजवे पर्यटनाचा सांगितला जाणारा परिणाम तितका आहे असं मुळीच वाटत नाही. कसं ते सविस्तर पाहू.

प्रथमतः काजवे दिवसेंदिवस कमी होत चालले आहेत हे सत्य आहे आणि ते अमान्य करण्याचं काहीच कारण नाही. आता महत्वाचा मुद्दा असा कि हे कशामुळे घडतं आहे? कुठले घटक यासाठी कारणीभूत आहेत? त्या सर्व कारणांची सूची तयार केल्यानंतर यातील प्रत्येक घटकाचा काजव्यांच्या कमी होण्यामध्ये किती वाटा आहे हे पाहावं लागेल. तोपर्यंत आपल्याला सत्य परिस्थितीचा अंदाज येणार नाही. मला सापडलेली महत्वाची कारणं त्यांच्या उतरत्या क्रमाने खाली मांडली आहेत:

१) वर्षानुवर्षे घटत चाललेला अधिवास - काजव्यांच्या अधिवासात (डोंगरउतारावर) नवी शेती तयार करणे, खाणकाम, बांधकाम, रस्तेबांधणी करणे.
२) वाढतं प्रकाशाचं प्रदूषण.
३) ग्रामीण भागात वाढता रासायनिक खते/औषधे यांचा उपयोग.
४) काजवा महोत्सव व इतर पर्यटन.

ही मांडणी या क्रमाने का ते आता पाहूया.

१) वर्षानुवर्षे घटत चाललेला अधिवास: मुळात काजव्यांचाच काय तर सर्वांचाच अधिवास दिवसेंदिवस कमी होत चालला आहे किंवा दूषित होतो आहे. त्यामध्ये पक्षी, प्राणी, फुलपाखरं, वन्यप्राणी आणि इतर सर्वच वन्यजीव आले. आता या सर्व प्रकारात काजव्यांना कुठला अधिवास लागतो ते पाहू. काजव्यांना लागते भुसभुशीत माती असलेली जमीन किंवा मुबलक पाला पाचोळा, सुस्थितीत असलेलं जंगलं आणि परिसरात पाणथळ जागा. अर्थात हे सगळं नसेल तर काजवे दिसत नाहीत असं अजिबात नाही. ते दिसतात परंतु त्यांचं प्रमाण काहीसं कमी असतं. काही वर्षांपूर्वी पुण्याच्या आसपास असलेल्या ग्रामीण भागात देखील काही प्रमाणात काजवे दिसायचे, आजही दिसतात परंतु पूर्वीसारखं प्रमाण राहिलं नाही. त्याचं मुख्य कारण संपत चाललेला अधिवास हेच आहे. पुण्याच्या आजूबाजूच्या गावांतील काजवे कमी का झाले असावेत ते आपण पुढे सविस्तर पाहू. तूर्तास सर्वात उत्तम अधिवास हा जंगलांचा आणि विशेषकरून भुसभुशीत माती, भरपूर पालापाचोळा आणि पाणथळ जागा असा आहे हे लक्षात घेऊ. हा अधिवास नक्की का कमी होत हे आता पाहूया.

पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर काजव्यांसाठी कोकण, भंडारदरा, लोणावळा, भीमाशंकर, वेल्हे ही ठिकाणं विशेष आकर्षणाची आहेत. थोडक्यात इथे गर्दी मोठ्या प्रमाणात होते. मीसुद्धा गेली दशकभर या परिसरात फिरतो आहे. या फिरण्यातून एक गोष्ट प्रामुख्याने आढळते ती म्हणजे बेसुमार वृक्षतोड. यातील काही गावं किंबहुना बहुतांश गावं ही वनक्षेत्रात आहेत तरीही वृक्षतोड होते आहे. थोडं थोडं करून जंगल तोडलं जातं आणि डोंगरउतारावर शेती तयार केली जाते. शेतीवर जाण्यासाठी गाडीरस्ता केला जातो, वहिवाट दाखवला जातो. याला शासनदरबारी मान्यता असते किंवा नसते हे खरं तर कोडं आहे.काजव्यांना पोषक वातावरण लागतं तसं काही ठराविक वृक्षही लागतात. हे वृक्ष बहुधा डोंगर पायथ्याला जास्त प्रमाणात आढळतात. एकदा एखादा वृक्ष तोडला तर पुन्हा नवीन वृक्ष तयार होण्यास किमान दशकभरतरी वेळ लागतो. वृक्षतोडीसाठी विविधं कारणं शोधली जातात त्यामध्ये कधी मानवनिर्मित वणव्यांचा समावेश असतो, तर कधी वृक्षांच्या साली काढून ठेवल्या जातात - मग तो वृक्ष वाळल्यानंतर तोडला जातो वैगेरे. यामध्ये कधी कधी स्थानिक लोकं असतात तर कधी बाहेरील देखील असतात. वृक्षतोडीसाठी विविध बांधकामांचं एक कारण आहे. रस्ते बांधणी, घरं आणि विविध प्रकल्पांची बांधणी, हॉटेल बांधणी यासाठी जागा स्वच्छ करून बांधकामं केली जातात. यामध्ये कळत नकळत काजव्यांचा अधिवास संपवला जातो आहे.

२) वाढतं प्रकाशाचं प्रदूषण: पुण्याच्या परिसरात पूर्वी काजवे दिसायचे पण आता ते दिसत नाहीत अशी खंत जेष्ठ नागरिक व्यक्त करताना दिसतात. खरं तर तेव्हा वीज घरोघरी पोहोचली नव्हती. पुणे शहराच्या थोडं बाहेर पडलं कि आकाशातील चांदण्या स्पष्ट दिसायच्या. आज ती परिस्थिती राहिली नाही. पुण्याच्या बाहेरच काय तर पुण्यापासुन ५० किमीच्या परिसरात देखील स्पष्ट चांदण्या दिसत नाहीत. यामध्ये प्रकाशाचं प्रदूषण आणि हवेचं प्रदूषण कारणीभूत आहेत. सकाळी सकाळी एखाद्या टेकडीवर जाऊन सहज पुण्यावर नजर फिरवली तर ते सहज लक्षात येईल. हीच परिस्थिती ग्रामीण भागात आहे. उदाहरण म्हणून भंडारदऱ्याजवळील रतनवाडी हे गाव घेऊ. तीन वर्षांपूर्वी मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत आम्ही काजवे पाहायला गेलो होतो. त्यादिवशी काही कारणास्तव वीजपुरवठा खंडित झाला होता. शांतात अनुभवायची म्हणून आम्ही गावातून मागच्या बाजूला ३०० ते ५०० मीटर आत चालून गेलो आणि अंधार होण्याची वाट पाहत एका जागी बसलो. थोड्याच वेळात भरपूर काजवे दिसू लागले. आम्ही तो अद्भुत सोहळा पाहून गावात आलो तर तिथेही तीच परिस्थिती. आजूबाजूला भरपूर काजवे दिसत होते. याउलट यावर्षी मी पुन्हा त्याच गावी गेलो. पण यावर्षी गावात लाईट असल्याने संपूर्ण गावठाण प्रकाशमान होतं. त्यापरस्थितीत आजूबाजूच्या झाडांवर एकही काजवा फिरकताना दिसत नव्हता. साहजिकच आम्ही आधीच्या जागी गेलो आणि आम्हाला भरपूर काजवे पाहायला मिळाले. हा सर्व प्रसंग मी स्थानिक काकांसोबत बोललो, चौकशी केली तर असं समजलं कि लाईट गेली तर काजवे गावातील झाडांवर पण येतात. तात्पर्य प्रकाशाच्या प्रदूषणाचा काजव्यांच्या अस्तित्वात मोठा परिणाम दिसून येतो.

३) ग्रामीण भागात वाढता रासायनिक खते/औषधे यांचा उपयोग: पश्चिम महाराष्ट्र बऱ्यापैकी सधन आहे. धरणांची संख्या, उपलब्ध पाणीसाठा यामुळे बहुतांश शेतकरी व्यावसायिक शेती करताना दिसतात. बाराही महिने पाणी उपलब्ध असल्याने वर्षभर शेतात काहींना काही पिके असतात. उत्पादनखर्च आणि विक्रीमूल्य याची सांगड बसत नसल्याने शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा आणि औषधांचा वापर सुरु केल्याचं स्पष्ट दिसतं आहे - यातून अधिक उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न असतो. यात कुणाचा दोष किती आणि  कसा तो इथला चर्चचा विषय नाही म्हणून मुद्दाम लिहीत नाही. परंतु या वाढत्या प्रमाणामुळे, जमिनीचा भुसभशीतपणा कमी झाला. बांधावरची  जुनी आंब्याची, बाभळीची व इतर झाडं तोडली गेली. त्याचा परिणाम म्हणून पाला पाचोळा कमी झाला आणि पर्यायाने काजव्यांची संख्या खूप कमी झाली. मला लहानपणचा एक किस्सा आजही स्पष्ट आठवतोय. घराजवळ एक जुनी विहीर आहे. तिथे रात्री पंपाने पाणी पडत होतं. ते पाटाने पुढे कांद्याच्या शेतात जायचं. रात्री ९-१० च्या आसपास मी सहज विहिरीवर गेलो तेव्हा हजारोंच्या संख्येने काजवे पाण्याच्या पाटावर उतरलेले पाहिले होते. यावरून ग्रामीण भागात पूर्वी परिस्थिती वेगळी होती हे स्पष्ट होतं.

४) काजवा महोत्सव व इतर पर्यटन: सह्याद्रीत गेल्या काही वर्षांत काजवे महोत्सव भरवले जात आहेत. पूर्वीही काजवे होतेच परंतु त्यातील आर्थिक गणितं कुणाच्या फारशी लक्षात आली नव्हती.काजवे पाहण्यासाठी सुट्टीच्या दिवशी आयोजक मोठे ग्रुप घेऊन जाताना दिसतात. यामध्ये कधी कधी शेकड्याने लोकं असतात. यामध्ये एवढ्या लोकांना सांभाळणं आयोजकांना कठीण जातं. यातून काजव्यांनी चमकणाऱ्या झाडांवर बॅटरी लावणे, जंगलात मोठ्या आवाजात गाणी वाजवणे, झाडांच्या जवळ जाऊन काजव्यांचा माग काढण्याचा प्रयत्न करणे, काजव्यांचे फोटो मिळवण्यासाठी फ्लॅश वापरणे आणि चालताना पायांखाली काजवे येणे हे प्रकार प्रामुख्याने होतात. कितीही नाही म्हटलं तरी याचाही काजवे कमी होण्यात हातभार लागतोच. पण तरीही तो वरील तीन कारणांपेक्षा अत्यल्प आहे असं माझं निरीक्षण आहे. अर्थात याचंही समर्थन नाहीच!

मुळात काजवे पाहायला ज्या परिसरात लोकं जातात तो काही चौरस किमीचा परिसर असतो. उदाहरण घ्यायचं झालं तर भीमाशंकर अभयारण्याचं घेऊयात. हे अभयारण्य १३१ चौरस किमीचं आहे. आपण असं ग्राह्य धरू कि आपण भोरगिरी परिसरात १०० लोकं काजवे पाहण्यासाठी गेलो. रात्री जंगलात काजवे पाहत फिरलो तरी एका वाटेने फार तर १० किमी चालून येऊ शकतो. माझ्या पाहण्यात तर असं आहे कि लोकं एवढं चालत नाही पण तरी तसं समजूयात. या नियमाने चौरस किमीच्या दृष्टीने विचार केल्यास फार तर १ चौरस किमी जंगल आपण फिरतो. खरं तर ते तेवढंही होत नाही. आता याचं गणित केलं तर ०.७ टक्के जंगल आपण फिरलो असा त्याचा अर्थ होतो. थोडक्यात काय तर पर्यटनामुळे ढोबळमानाने १-५% पेक्षा जास्त परिणाम होत नाही. यामध्ये आणखी एक गोष्ट सांगितली जाते - हा काळ काजव्यांचा प्रजननकाळ असतो आणि त्यांना डिस्टर्ब करणं चुकीचं आहे. हे निश्चित खरं आहे. परंतु वर पाहिल्याप्रमाणे उरलेला ९५% पेक्षा अधिक अधिवास काजव्यासाठी उपलब्ध असतो. त्यामुळे त्यांच्या प्रजननावर विशेष परिणाम होतो असं सांगणं चुकीचं आहे. त्यात काही लोकं बॅटरीच्या प्रकाश झाडांवर टाकतात हेसुद्धा सांगितलं जातं, त्याचंही समर्थन होऊ शकत नाही. पण मागे पाहिल्याप्रमाणे, गावात लाईट गेली तर काजवे पुन्हा गावातील झाडांवर पण दिसतात असं स्थानिकांचं आणि माझं स्वतःच निरीक्षण आहे. याचाच अर्थ बॅटरी बंद झाली कि पुन्हा काजवे पुन्हा तसेच चमकू लागतात. जशी पाण्यात काठी मारली तर पाणी पूर्णपणे दुभंगत नाही, ते पुन्हा एकजीव होतं तसं काजव्यांच्या बाबतीत होतं हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. याचा अर्थ असा नव्हे कि काजव्यांनी भरलेल्या झाडांवर बिनधास्त बॅटऱ्या माराव्यात किंवा त्यांच्या अळ्या हातावर घेऊन त्यावर टिचक्या माराव्या. या आणि अशा सर्वच अमानवी कृत्यांचा निषेधच परंतु सरसकट काजवामहोत्सव बदनाम करण्याचं जे सध्या काम सुरु आहे तेही अयोग्यच. यातून झालीच तर लोकांची दिशाभूल होऊ शकते बाकी काही नाही.

काजवे भविष्यातही दिसावेत असं आपल्या सर्वांनाच वाटत असेल तर काही गोष्टी करण्याची आवश्यकता आहे:

१) सर्वात महत्वाचं म्हणजे काजव्यांचा अधिवास वाचवायला हवा. त्यांना लागणारं पोषक वातावरण जे उपलब्ध आहे ते राखायला हवं. वाढवायला हवं. अधिवास संपला तर काजवे राहणार नाहीत? यामध्ये वनखाते मुख्य भूमिका बजावू शकते. उदा. बहुधा घाटवाटांवरून रस्ते बांधले जातात. यासाठी खूप वृक्षतोड करावी लागते. मोठं नुकसान होतं. वनखात्याने आणि जाणकारांनी पर्यायी जागा सुचवली किंवा जिथून कमी नुकसान होईल तिथून रस्ता काढला तर कमीत कमी अधिवासाला धोका पोहोचेल. जंगलात अवैध वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी. वनक्षेत्रात अवैध जमिनी काढल्या जात आहेत का? त्यावर निर्बंध घालता येतील का ते पाहावं. अस्तित्वात असलेले वनकायदे आमलात येतायेत कि नाही ते पाहावं लागेल. यामध्ये वनखातं महत्वाची भूमिका बजावू शकेल.
२) जाणकारांनी काजव्यांच्या अधिवासात राहण्याऱ्या नागरिकांचं प्रबोधन करण्याची गरज आहे. काजवे का चमकतात पासून ते काय केलं नाही तर ते दूर जातील इथपर्यंत गोष्टी समजावून सांगायला हव्यात. स्थानिकांच्या सहभागाशिवाय संवर्धन कधीच होत नाही. एकदा का स्थानिकांना त्यांच्या आजूबाजूच्या ठेव्याचं महत्व पटलं कि ते स्वतः इतर गैरप्रकार रोखण्यास मदत करतील.
३) जैविक शेतीकडे वळायला हवं परंतु हा विषय वादाचा आहे आणि तो कितपत शक्य आहे हे सांगणं मोठं कठीण आहे.
४) जबाबदार पर्यटनाची गरज दिवसेंदिवस ठळक होत चालली आहे. आयोजकांपासून ते पर्यटकांपर्यंत सर्वानी जागरूक असायला हवं. तुम्ही काही रुपये भरले म्हणजे जंगलात जाऊन काहीही करण्याची पावती मिळाल्याचा गैरसमज कुणीही बाळगण्याचं कारण नाही. आयोजकांनी देखील आपण जातो त्या परिसराची संपूर्ण माहिती घ्यायला हवी. आपल्यामुळे निसर्गाला काही बाधा तर पोहोचत नाही याचा अंदाज घ्यावा. तसं असेल तर आपल्याला तो परिणाम कमी करण्यासाठी काही करता येईल का याचा विचार करावा. पर्यटकांना योग्य त्या सूचना द्याव्या. कुणी चुकीचं वागत असेल तर त्याला दोन गोष्टी ऐकवण्याची तयारी ठेवावी. थोडक्यात प्रत्येक पर्यटकाने आणि आयोजकाने संवदेनशील असणं गरजेचं आहे.

यानंतरही कुणाला असं वाटत असेल की काजवा महोत्सव विनाशकारी आहे तर ते खात्री देऊ शकतात का, की सह्याद्रीतील काजवे महोत्सव बंद झाले तर काजव्यांचा ह्रास पूर्णपणे थांबेल? मला तरी त्याचं उत्तर नाही असंच दिसतंय. कारण काजव्यांच्या कमी होण्यामध्ये पर्यटनापेक्षा खूप मोठी कारणं कारणीभूत आहेत. त्याचा विचार होणं जास्त गरजेचं आहे. पर्यटनाला विनाशकारी म्हणून काही प्रमाणात का होईना लोकांची दिशाभूल (कळत नकळत) होत आहे असं दुर्दैवाने म्हणावं लागेल. नकळत लोक मुख्य कारणांपासून विचलित होऊन काजवा मोहोत्सवापासून दूर राहतायत.

काजवा महोत्सव हा निसर्गाचा एक अद्भुत सोहळा आहे. तो प्रत्येकाने आयुष्यात एकदातरी अनुभवावा असाच आहे. आपल्या आजूबाजूचा निसर्ग किती सुंदर आणि सुखदायी आहे याची जाणीव तो करून देतो. भौतिक आणि कृत्रीम सुखापेक्षा कैक पटीचं सुख निसर्ग आपल्या झोळीत ओततो आहे हा विचार घेऊन माणूस जंगलातून बाहेर पडतो. किमान मलातरी काजवा महोत्सवातून हा अर्थ उमगला. इतरांचं मी काय सांगावं...

राजकुमार डोंगरे
rajkumardongare@gmail.com

Saturday, 21 July 2018

Flowers: Murrayi’s Cobra Lily | Pandhra Sap Kanda – पांढरा सापकांदा | Arisaema murrayi (J. Graham) Hook.

Beautiful Flower
रानफुलांचं विश्व जितकं मनमोहक आहे तितकंच ते गूढ सुद्धा आहे. काही बोलकी उदाहरणं द्यायची म्हटलं तर ऑर्किड, झेंडूवर्गीय फुलं, मका आणि इतर गवतवर्गीय फुलं यांचा प्रामुख्याने उल्लेख करायलाच हवा. तुम्ही म्हणाल या फुलांमध्ये गूढ असं काय आहे? पण आजचा विषय या फुलांचा नाहीच मुळी. आज एका वेगळ्याच फुलाबद्दल जाणून घ्यायचं आहे - ते म्हणजे पांढरा सापकांदा. सह्याद्रीमध्ये सर्वत्र आणि विपुल प्रमाणात सापडणारं हे एक सुंदर आणि अनोखं रानफुल.

पांढरा सापकांदा गूढ असण्याचं कारण म्हणजे त्याची फुलं. सुरवातीला फुलं नर असतात आणि मग नंतर जसजशी वाढ होते, परिपक्वता येते तशी ही नर फुलं स्वतःला मादी फुलांमध्ये रूपांतरीत करतात. कधी कधी हे रूपांतर नर+मादी अशा स्वरूपाचं असतं. म्हणजे एकाच फुलात नर आणि मादी अवयव वाढतात. पण असं रूपांतर करून घेण्याचं कारण काय?

तर त्याची गोष्ट अशी आहे की पावसाळ्याच्या सुरवातीला म्हणजे एक-दोन पाऊस पडून गेले की सह्याद्रीमध्ये एक वेगळीच लगबग सुरु होते. ही लगबग अदृश्य स्वरूपाची असते. मातीच्या कुशीत पावसाच्या ओलाव्याने बिया फुगू लागतात, कंद ताजेतवाने होऊन अंकुरण्यास तयार झालेले असतात, झाडा-झुडपांच्या पालवीमध्ये एक नवचैतन्य भरून वाहायला लागतं. पांढऱ्या सापकांद्याचही असंच. पहिल्या - दुसऱ्या पावसावर जमिनीतील सुप्त अवस्थेत असलेल्या कांद्यावर पहिला कोंब बाहेर पडतो. वरवर भासणार हा कोंब खरं तर कोंब नसतोच. तो असतो सापकांद्याच्या पुष्पगुच्छाचा दांडा (Peduncle). पावसाची साथ लाभली तर जूनच्या मध्यापर्यंत एक ते दोन फूट दांडा वाढतो आणि सुंदर आणि लक्ष वेधून घेणारा फुलोरा लागतो. कुठल्याही बाजूने फुलोरा पाहिला तर फणा काढून उभा राहिलेला नाग आठवेल असा आकार. अगदी हुबेहूब. तोंडातून लपलप करत बाहेर निघणारी सापाची जीभ भासावी अशा रंगाचा आणि आकाराचा एक धागासुद्धा फुलाच्या तोंडातून निघालेला आढळतो.


प्रथमदर्शनी आपल्याला हेच फुल वाटतं पण खरं तर ते फुल नसत. हा फक्त फुलांना संरक्षण देणारा एक भाग असतो. नागाच्या फण्यासारखा जो भाग दिसतो त्या खाली एक पोकळ नळीसारखा भाग असतो त्याच्या आत फुलांची रचना असते. फुलं पाहायची असल्यास आपल्याला वरचा फण्यासारखा दिसणारा भाग उलगडण्याशिवाय पर्याय नाही. फुलांचं बाहेरच आवरण म्हणजे पोकळ नळीचा भाग साधारण ५-८ सेमी लांबीचा आणि २ सेमीपर्यंत रुंद असून पोपटी रंगाचा असतो. त्यावर पांढऱ्या रंगाच्या रेषा कधी कधी दिसतात. नळीच्या वरच्या भागात नागाच्या फण्यासारखा भाग दिसतो. तो साधारण पाच ते आठ सेमी लांबीचा आणि २-३ सेमी रुंदीचा असतो. रंग बहुधा गुलाबी, फिक्कट जांभळा किंवा पांढरा असतो.


Top view of entire plant & habitat
नळीच्या आत फुलाच्या दांड्यावर सर्व बाजुंनी फुलं लागतात. फुलांचा रंग पिवळसर पांढरा किंवा फिक्कट पिवळा असतो. सुरवातीला फुलातील पुंकेसरांची वाढ होते. ते वाढून त्यात परागकण भरू लागले की मग स्रिकेसर वाढू लागतो. नर फुल मादी फुलात बदलू लागत. वर म्हटल्याप्रमाणे नर आणि मादी असं दोन्हीमध्ये रूपांतरित होतं. म्हणजेच, पुंकेसर टिकून असतानाच स्रिकेसराची वाढ पूर्ण होते. फुलांचं रूपांतर मादी फुलांत करायचं की नर+मादी अशा स्वरूपात करायची याचा निर्णय प्रत्येक झाडानुसार किंवा हवामानातील बदलावर अवलंबून असतो. म्हणजे सुरवातीला पाऊस व्यवस्थित सुरु झाला आणि नंतर अचानक ओढ दिली तर फुलं पुंकेसर (Androecium) आणि स्रिकेसर (Gynoecium) अशा दोन्हींना एकाच वेळी वाढू देतात. थोडक्यात फुलं bisexual होतात. असं झाल्याने वातावरणात झालेल्या बदलांवर मात करता येते. याउलट पाऊस व्यवस्थित सुरु राहिला तर आधी नर असलेलं फूल नंतर मादी फुलात रूपांतरित होतं आणि पुढे फलित होतं. याव्यतिरिक्त झाडं अयोग्य ठिकाणी रुजली असतील म्हणजेच माती पुरेशी सुपीक नसेल किंवा जनुकीय (Genetic) बदलांमुळेसुद्धा हा प्रकार पाहायला मिळतो.

एकदा प्रजनन पार पडलं कि फुलोऱ्याभोवतीचं नागाच्या आकाराचं संरक्षण दल गळून पडतं. गर्द हिरव्या आणि चमकदार रंगाची गोलाकार फळं दिसू लागतात. ही फळ मुख्य अक्षाच्या बाजूने अगदी गर्दीने लागलेली असतात. फळ पुढे पिकून पिवळी, नारंगी आणि मग लाल होतात. परिपक्व होऊन पुढच्या कार्यास लागतात.


Habitat of Murrayi's Cobra Lily
फुलोरा लागेपर्यंत त्याच्या मागोमाग एक पण कांडातून निघतं. सुरवातीला पानं कोवळी आणि मिटलेली असतात आणि नंतर ती खुलतात. चमकदार हिरवा रंग, बोटं पसरलेल्या हाताच्या पंजासारखा आकार पण मोठा. पानाची उंची साधारणपणे २ फुटांपर्यंत असू शकते. पानांची रुंदी फूटभराची असते. पावसात भिजलेलं फुल आणि पान एकत्र पाहून खूप मोहक असतं. सापकांदा हे ग्रामीण आणि आदिवासी भागातील लोकांमध्ये रानभाजी म्हणून प्रसिद्ध आहे. बडद्याची भाजी अशी तिची ओळख स्थानिकांमध्ये आहे. कंद आणि पानं भाजीसाठी वापरतात. सापकांद्याचा उपयोग खाण्यासाठी होत असला तरी ती कच्ची खाण्यासाठी उपयुक्त नाही. पानांमधील कॅल्शियम ऑक्झॅलेटच्या सूक्ष्म खड्यांमुळे ते विषारी होतात, त्यामुळे ही भाजी फक्त शिजवून खाण्यास उपयुक्त आहे.

फुलांच्या या विशेष रूपांतराने सापकांद्याची फुलं गूढ वाटतात. पण ही वैशिष्ट्यपूर्ण गूढता निसर्गानेच त्यांना बहाल केली आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये तीच त्यांच्या मदतीला येते. पांढरा सापकांदा हा इंग्रजीमध्ये "Murraya's Cobra Lily" या नावाने ओळखला जातो. शास्रिय भाषेत त्याला Arisaema murrayi (J. Graham) Hook. या नावाने ओळखतात. पांढऱ्या सापकांद्याचा समावेश ऍरीसी (Araceae) म्हणजेच आळुच्या कुळामध्ये केला गेला आहे.

सह्याद्री अशा गूढ कोड्यांनी भरलेला आहे. फक्त आपण कुतूहलाने भरलेले डोळे घेऊन त्याला जवळ करायला हवं. मग अजब दुनियेची माहिती आपल्या पदरात पडते...



Plant Profile:

Botanical Name: Arisaema murrayi (J. Graham) Hook.
Synonyms: NA
Common Name: Murrayi’s Cobra Lily
Marathi Name: पांढरा सापकांदा
Family: Araceae
Habit: Herb
Habitat: All Sahyadri Ranges (डोंगरउतारावर, दऱ्या-खोऱ्यांचा परिसर)
Flower Colour: White Or Pink Or Lavender (गुलाबी, फिक्कट जांभळा किंवा पांढरा)
Leaves: Palmately compound, Single, up to 2 feet long, digitate.
Smell: No smell
Abundance: Common
Locality: Dudhivare, Pavna Dam, Pune
Flowering Season: June-July
Date Captured: 07-July-2018

राजकुमार डोंगरे
MaChi Eco & Rural Tourism
www.machitourism.com

Saturday, 2 December 2017

Flowers: Woolly-winged Milkwort | Gulpankhi – गुलपंखी | Polygala erioptera R.Br.

तासभर प्रयत्न करून देखील फोटो काही मिळेना. हवेचा जोर काहीसा जास्तच होता आज,  त्यात ती फूटभर उंचीची लहान रोपं आणि त्यावर लागलेली चिमुकली फुलं. हो चिमुकलीच, अगदी नखापेक्षाही लहान. वर वर पाहता फुलं विशेष काही आकर्षक वाटली नाही पण रंग मात्र डोळ्यांत भरणारा. प्रेमात पडायला भाग पाडणारा. काहीतरी वेगळं-नवीन दिसलं की पावलं पुढे जातंच नाहीत. थांबावं वाटतं, कसली फुलं आहेत ही हे कळल्याशिवाय चैन पडत नाही. थांबलो मग, फुलं जवळून निरखून पहिली. जवळून पाहिल्यावर फुलांचं सौंदर्य जाणवलं. नकळत डोळ्यांतून हृदयात उतरली.

निसर्ग मोठा सच्चा आणि कल्पक रंगकर्मी आहे. या लहानग्या फुलांच्या पाकळ्यांत इतके सुंदर रंग ओतले होते की जिथे लहान म्हणून दुर्लक्ष होण्यासारखी फुलंच या सुंदर रंगांमुळे प्रत्येकाला आकर्षित करत होती. अशी आकर्षक फुलं क्षणभर थांबायला लावतात, खिळवून ठेवतात. मी एक फुल बोटाच्या चिमटीत पकडलं आणि ओझरती नजर फिरवली. प्रथमदर्शनी ही "संजीवनी"च्या फुलांची कुळभगिनी असावी असं वाटलं. घरी येऊन ओळख पटवली आणि अधिक माहिती घेतली. जितकं सुंदर रूप तितकंच सुंदर नाव, शोभणारं, गुलपंखी! आधी विचार केल्याप्रमाणे ही 'संजीवनी'ची कुळभगिनीच होती.

सह्याद्रीच्या अवती-भवती असणाऱ्या माळरानांवरील नेहमीची आणि वर्षभर फुलणारी गुलपंखी विशेष कुणाच्या ओळखीची नाही. अर्थात तिचं अस्तित्व माणसाने लक्षात घ्यावं असं विशेष कदाचित नसेलही तिच्यात, पण नकळत ती मानवी फायद्याचीच आहे, विशेषकरून शेतकऱ्यांच्या! पावसाळ्यानंतर माळरानांवर हिरवं लुसलुशीत गवत उगवतं. त्यावर चराटीला गुरं सोडली जातात. गाई, म्हशी शेळ्या वैगेरे दिवसभर मनोसोक्त चरून संध्याकाळी घरी परततात. पावसाळ्यात मुबलक मिळालेला हा चारा वाढत्या दुधासाठी कारणीभूत ठरतो, हे जरी खरं असलं तरी नुसताच हिरवा चारा कारणीभूत ठरतो असं ढोबळमानाने म्हणून कसं चालेल? संजीवनी किंवा गुलपंखी सारख्या वनस्पतींचे गुणधर्म यासाठी महत्वाचे ठरतात. दुधवाढीसाठी लागणारं जैवरासयनिक सत्व या वनस्पतींना निसर्गाकडून लाभलं आहे. ही गुरं चराटीला असताना या वनस्पती खातात आणि दुधामध्ये चांगली वाढ होते. यामुळे शेतकरी मित्रांचा आर्थिक फायदा होतो.

चिमटीत पकडलेलं गुलपंखीचं फुल सोडलं आणि टिपणं घेण्यासाठी सज्ज झालो. माळावरून चालताना गुडघ्यापर्यंत लागावी एवढी उंची. फूट - दिड फुटांची. फांद्या अगदी जमिनीपासून लागलेल्या होत्या. फांद्यांची संख्या भरपूर, फांद्या कडक आणि सरळ आकाशाच्या दिशेने वाढणाऱ्या अशा. पानांची जोडणी एकाड-एक (alternate) पद्धतीची, पाकळीच्या (Elliptic) किंवा काहीशी पात्यासारख्या (Linear) आकाराची. लांबी साधारणपणे ३ सेमी पर्यंत. पानांच्या कडा (Margin) एकसंध आणि पाने टोकाकडे टोकदार होत गेलेली. रंग भुरका-हिरवा, पानांची मागची बाजू तर आणखी भुरकी आणि मुलायम केसानी आच्छादलेली. गुलपंखीमधे पानांना फांदीशी जोडणारा दांडा (Leaf Stalk) नसतो, शास्रिय भाषेत अशा पानांना Sessile Leaf असं म्हणतात.




पान फांदीवर ज्या ठिकाणी जोडलं गेलं आहे त्या अक्षातून (Axis) फुलोरा निघतो, साधारण दीड सेमी लांबीचा. ६-८ फुलं गर्दीने या फुलोऱ्यावर लागलेली असतात. फुलोऱ्याच्या खालच्या भागातील फुलं आधी उमलतात आणि टोकाकडे ती क्रमाक्रमाने उमलत जातात. असं क्रमाक्रमाने फुलल्यामुळे फळधारणेची शक्यता वाढते. गुलपंखीच्या फुलांचा आकार अगदीच लहान, फार फार तर ६-८ मीमीचा. फुलामध्ये संरक्षण दलांची (Calyx) संख्या पाच, त्यातली दोन वरच्या बाजूने लागतात, कान टवकारल्यासारखी आणि काहीशी वक्राकार. निळसर-जांभळा किंवा लव्हेंडर रंग आणि मधोमध उभी हिरव्या रंगाची जाडशी आणि ठळक हिरवी रेषा. या दोन रंगांचं वरच्या संरक्षण दलांवरील रेषांचं नक्षीकाम डोळ्यांत भरणारं असतं. ही दोन्ही संरक्षण दलं मागच्या बाजूने पांढुरक्या मुलायम केसांनी भरलेली असतात. खालच्या बाजूने तीन संरक्षण दलं लागतात. ती आकाराने वरच्या दलांच्या तुलनेत लहान आणि मुलायम केसांनी भरलेली असतात. संरक्षण दलांच्या आत तीन पाकळ्याची रचना पाहायला मिळते. त्यातल्या वरच्या बाजूने दोन तर खालच्या बाजूने एक पाकळी असते. सर्व पाकळ्या निळसर जांभळ्या किंवा लव्हेंडर रंगाच्या असतात. यातील वरच्या दोन पाकळ्या आकाराने लहान म्हणजे ३-४ मीमी लांबीच्या असतात. यांचा आकार उलट्या अंड्यासारखा (Obovate) असतो आणि कुक्षीच्या (Ovary) जवळ त्या एकमेकांना जोडलेलया असतात. या दोन पाकळ्यांच्या खालोखाल सोंडेसारखी, अर्धवक्राकार आणि वरच्या बाजूला तोंड असणारी पाकळी लागते. संपूर्ण फुल एकत्र पाहिल्यावर एखाद्या पक्षाची छोटी प्रतिकृती असल्याचा भास ही संबंध रचना निर्माण करते. या पाकळीच्या टोकाकडचा भाग मुलायम केसांमध्ये रूपांतरित झालेला असतो. लक्षपूर्वक पाहिल्यास समजतं की या केसांचा बहुधा गुंता झालेला असतो. अर्थात हा गुंता उगाचच नाही! तो प्रजननाच्या (Fertilization) प्रक्रियेसाठी मदत करणारा आहे. खालच्या बाजूने लागलेल्या याच सोंडेमध्ये स्रिकेसर आणि पुंकेसर राहतात. फुलं परिपक्व झाली की त्यांचा आकर्षक रंग आणि वेगळी रचना पाहून जशी माणसांना भुरळ पडते अगदी तशीच भुरळ कीटकांना, फुलपाखरांना आणि पक्षांना देखील पडते. तोवर परागकण तयार होऊन पुंकेसरातून बाहेर आलेले असतात, नवनिर्मितीसाठी सज्ज असतात! कीटकांच्या व फुलपाखरांच्या फुलांसोबत भेटी-गाठी सुरु होतात. या फुलावरून त्या फुलावर बागडणं होतं. सोंडेतील मकरंद काढण्यासाठी जीवाचा आटापिटा होतो. या सर्व गोंधळात नकळत परागकण (Pollen Grains) कीटकांच्या सोंडेला, पायाला किंवा अंगावर चिकटतात आणि हेच कीटक जेव्हा दुसऱ्या फुलांना भेट देतात त्यावेळी सोंडेच्या टोकाला असलेल्या केसांच्या गुंत्यात पाय, पंख इत्यादी अडकतात व नकळत घासले जातात. याचीच परिणीती म्हणून परागकण खाली स्रिकेसराच्या तोंडावर पडतात. आणि फलनाची (Feritilization) प्रक्रिया सुरु होते.

गुलपंखीची फळं अगदी लहान, ४-५ मीमी लांबीची. फळाच्या मधोमध अक्ष (Axis) असतो आणि त्या अक्षाभोवती दोन्ही बाजूला चौकोनाकृती पापुद्र्यासारखी रचना असते. अक्षाच्या दोन्ही बाजूला एक-एक असे फळाचे दोन भाग पडतात, यातील प्रत्येक भागात साधारण ४ मीमी लांबीची एक बी भरते. बीचा रंग काळा असून त्यावर मुलायम केस असतात,आकार लंबगोलार असतो. फळामध्ये बिया जिथं जोडलेल्या असतात तिथे पांढऱ्या रंगाचा पदर पाहायला मिळतो, बीचा १०% भाग याने वेढलेला असतो. याला शास्त्रीय भाषेत ऐरिल (Aril) म्हणतात. बियांच्या प्रसारामध्ये याचं खूप महत्व आहे कारण हा पदर खाण्यायोग्य असतो. मुंग्या आणि इतर कीटक या पदरासाठी संपूर्ण बी ओढून घेऊन जातात. कधी या बिया त्यांच्या वारुळांपर्यंत पोहोचतात तर कधी मधेच वाटेत पडून जातात.गुलपंखीचा मात्र यामुळे स्वार्थ साधला जातो, बीजप्रसाराचा आणि नवनिर्मितीचा!

मराठी नाव ‘गुलपंखी’ हे फुलांच्या रचनेविषयी सांगणारं आहे. फुलांचा रंग लव्हेंडर किंवा काहीसा गुलाबी असतो आणि वरच्या बाजूने लागलेल्या संरक्षण दलांचा आकार उडत्या पक्षाच्या पंखांसारखा भासतो म्हणून 'गुलपंखी' हे सूचक नाव आलेलं असावं. गुलपंखीला इंग्रजीमध्ये Woolly-winged Milkwort या नावाने ओळखतात. या वनस्पती गाय, शेळी वैगेरे दूध देणाऱ्या पाळीव प्राण्यांच्या खाण्यात आल्यास त्यांच्या दूध वाढीमध्ये फायदा होतो आणि म्हणून "Milkwort" या शब्दाचा उल्लेख इंग्रजी नावामध्ये दिसून येतो. शास्रिय भाषेत गुलपंखीला Polygala erioptera R.Br.असं म्हणतात. यातील Polygala शब्द ग्रीक भाषेतून आला असून त्याचाही संबंध गुरांच्या दुधवाढीशी आहे. erioptera शब्द पाकळ्यांच्या संरक्षण दलांवरील केसांसंदर्भातील आहे. गुलपंखीच समावेश "Polygalaceae" या कुळामध्ये झाला आहे.

माळरानांवरील या चिमुकल्या सौंदर्याची मजा लुटणं खरंच अभूतपूर्व आहे, प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय त्याची प्रचिती येणं निव्वळ अशक्य आहे. चला तर मग सौंदर्यदर्शनाला!


Plant Profile:

Botanical Name: Polygala erioptera R.Br.
Synonyms: P. Arabica, P. leptorhiza, P. linearis, P. multibracteata, P. noucherensis, P. nubica, P. obtusata, P. oligantha, P. paniculata, P. paulayana, P. retusa, P. schimperi, P. serpyllifolia, P. tomentosa, P. triflora
Common Name: Woolley-winged Milkwort
Marathi Name: Gulpankhi (गुलपंखी)
Family: Polygalaceae
Habit: Herb
Habitat: Grasslands (डोंगरउतारावर, माळराने)
Flower Colour: Lavender, Purple to Pink  (लव्हेंडर किंवा गुलाबी)
Leaves: Simple, Linear / Elliptic, 1.5-3 cm long x 1 cm wide, Stipulate, sessile.
Smell: No smell
Abundance: Common
Locality: Dattagad (Dighi), Pune
Flowering Season: All Year
Date Captured: 26-Aug-2017

- रा.जा. डोंगरे

Sunday, 12 November 2017

Flowers: Field Milkwort | Sanjivani – संजीवनी | Polygala arvensis Willd.

 दादा, ती पिवळी फुलं कसली रे? माझं लक्ष वेधून घेत अथर्वने प्रश्न केला. अथर्व आणि माझी ही पहिलीच भेट. दत्तगडला फिरताना माझं फुलांचे फोटो घेणं सुरु होतं आणि हा मागे येऊन उभा राहिलेला, कुतूहलानं माझ्याकडे पाहत. एकटाच होता. त्याची प्राथमिक चौकशी करून मी माझ्या चाललेल्या उद्योगाचा खुलासा केला, तसं त्याने आणखी प्रश्न विचारायला सुरवात केली. म्हणजे, हे फुल कोणतं? ते कोणतं? आणि तुला कसं माहीत? वैगेरे. अथर्व ८ वी इयत्तेत शिकणारा एक लहान मुलगा, पण प्रचंड उत्साही आणि कुतूहल असणारा वाटला. आत्याकडे पुण्याचे गणपती पाहायला आलेला आणि सहज फिरायला म्हणून दत्तगडावर आला होता आणि त्यात आमची भेट झाली. थोड्याच वेळात आमची गट्टी जमली आणि मग गप्पाही रंगल्या.

इकडचं तिकडचं बोलून झाल्यावर त्याचा फिरून पुन्हा तोच प्रश्न, ती पिवळी फुलं कसली ते सांगितलं नाहीस तू. उत्तरादाखल "संजीवनी" असं नाव सांगितलं मी. पुढचा प्रश्न, शेंगा येतात का याला? मी म्हणालो नाही, पापुद्रयासारखी फळं लागतात. काही वेळ शांतता, आणि मग अचानक त्याने निरोपाचं बोलून टेकडी उतरायला सुरवात केली. त्याला तसाच पाठमोरा पाहत मी त्याच्या कुतूहला बद्दल विचार करत बसलो. नक्की काय विचार करत हा उतरला असेल?


विचारांच्या तंद्रीतून बाहेर पडल्यावर मी पुन्हा लेन्स अड्जस्ट करून "संजीवनी"चे फोटो घेऊ लागलो. पानं, फुलं, फळं बिया असे विविध भाग न्याहाळत होतो. मनाप्रमाणे सगळ्या नोंदी झाल्या. अथर्वप्रमाणे मी ही विचारांच्या धुंदीत टेकडी उतरलो. खरंच संजीवनी किती लोकांना माहित असेल? मला किती माहित आहे? मनातून आलेल्या उत्तरातून कळलं, आपल्याला देखील संजीवनीबद्दल फारसं माहित नाही. वाचलंही नव्हतं आणि म्हणूनच अधिक वाचावं, जाणून घ्यावं असं वाटू लागलं. वाचलंही नंतर बऱ्यापैकी.

तर संजीवनी ही एक लहान वनस्पती, साधारणपणे १५-३० सेमी उंचीची. हीचं इंग्रजी नाव Field Milkwort असं आहे. सुरवातीलाच नाव सांगण्यामागे माझा एक मुख्य हेतू आहे. हे नाव शास्त्रीय नावाशी संबंधित आहे. संजीवनीचा समावेश "Polygala" या जातीमध्ये होतो, आणि हा शब्द ग्रीक भाषेतून आलेला आहे. या शब्दाचा अर्थ 'दुधात वाढ होणे' असा होतो. संजीवनी वनस्पती पाळीव प्राण्यांनी (गाय, शेळी वैगरे) खाल्ली की त्यांच्या दुधामध्ये वाढ होते आणि अप्रत्यक्ष फायदा होतो. तर, दुधात होणाऱ्या वाढीबद्दल सांगणारं Field Milkwort हे नाव इंग्रजी भाषेत आलं आहे. भारतात, विशेषकरून महाराष्ट्रात पावसाळ्यानंतर गायी व इतर गुरांना माळरानावर चरायला नेतात ते कदाचित यासाठीच. या अशा वनस्पती यांच्या तोंडी लागल्या की आपोआप दुधात वाढ होते आणि आपलाही स्वार्थ साधला जातो. संजीवनीचं आणखी एक इंग्रजी नाव आहे, ते म्हणजे 'Snakeroot'. हिच्या मुळांना विशिष्ठ सुगंध आहे. या मुळ्यांच्या सुगंधाला भुलून साप जवळ येतात असा एक समज आदिवासी भागांत आहे आणि त्याची दखल घेणारं हे नाव असावं. अशी अर्थपूर्ण नाव ज्यांनी दिली त्यांचं खरंच कौतुक.


असो, तर संजीवनी एक लहान वनस्पती, जमिनीपासून ४-६ फांद्या निघतात, हिरव्या रंगाच्या, त्यावर नारंगी रंगाची छटा असते कधीकधी. उंची कमी असल्याने जमिनीपासून पानं लागायला सुरवात होते. पानांच्या आकारामध्ये विविधता पाहायला मिळते. कधी उलट्या अंड्यासारखी (Obovate), कधी गोलाकार (Circlular), कधी उलट्या कंदिलासारखी (Inverted Lance Shaped) तर कधी पाकळीसारखी (Elliptic) असतात. पानांची लांबी १.५ - ३ सेमी असून रुंदी १ सेमी पर्यंत असते. जसजसा माळावरील मातीचा प्रकार बदलत जातो तशी झाडाची उंची आणि पानांचे प्रकार बदलताना दिसतात. पानं एकाड-एक (alternate) पद्धतीने फांद्यांवर जोडलेली असतात, पानांची कड (Margin) एकसंध असते, पानांचा देठ खूप लहान म्हणजे साधारण १ मिमी पर्यंत असतो, काही पानांत तो अगदीच दिसेनासा असतो (Close to sessile). पान फांदीला जिथे जोडलेलं असतं त्या अक्षात (Axis) फुलांचे गुच्छ लागतात. प्रत्येक गुच्छ साधारणपणे १ सेमी लांबीचा असतो, त्यात ४-८ फुलं लागतात. सगळी फुलं एकाच वेळी फुलत नाहीत ती शक्यतो क्रमाक्रमाने फुलतात. फुलं अशी क्रमाक्रमाने फुलल्यामुळे त्यांच्यातील फळधारणेची शक्यता अधिक वाढते.

फुलांचा रंग पिवळा. वरच्या बाजूने दोन पाकळ्या आणि खालच्या बाजूला एक अशी रचना असते. वरच्या पाकळ्यांच्या बाहेरून हिरव्या रंगाचे आणि काहीसे केसाळ आच्छादन असते, हे आच्छादन म्हणजे पाकळ्याचं संरक्षण दल (Calyx) होय. प्रथमदर्शनी फुलं शेंगवर्गीय वनस्पतींशी साधर्म्य असणाऱ्या वाटतात पण निरीक्षणपूर्वक पाहिल्यास दोन्हींमधील फरक स्पष्ट कळतो. वरच्या बाजूला असलेल्या दोन पाकळ्या एकमेकांवर आच्छादलेलया (Overlap) असतात. त्यामुळे त्या शेंगवर्गीय वनस्पतींशी साधर्म्य असणाऱ्या भासतात. या दोन्ही पाकळ्या कुक्षी (Ovary) च्या जवळ एकमेकांना जोडलेल्या असतात. पाकळ्यांच्या आतल्या बाजूने आणि मध्यभागी तपकिरी रंगाच्या रेषा असतात. तिसरी पाकळी फुलाच्या खालच्या बाजूने वाढते. ती सोंडेसारखी किंवा हुकासारखी भासते. टोकाकडे या पाकळीचं मुलायम केसांमध्ये रूपांतर होतं, हे केस टोकाकडे जाताना नागमोडी वळण घेतात आणि त्यामुळे कधीकधी थोडा गुंता होतो. अशी रचना या जातीतील जवळ जवळ सर्वच फुलांमध्ये पाहायला मिळते. पाकळी मधील हा विशेष बदल निसर्गाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे, कसा? ते आपण पुढे जाणून घेणार आहोतच.फुलातील स्रिकेसर (Gynoecium) आणि पुंकेसर (Androecium) हे याच सोंडेसारख्या भासणाऱ्या पाकळीत असतात, ते सोंडेतून क्वचितच बाहेर येतात, बहुधा सोंडेचा तोंडापर्यंतच त्यांची वाढ होते आणि पुढे मग पाकळीच्या टोकाचा म्हणजेच केसांचा भाग असतो.


फुलं परिपक्व झाली की, सोंडेतील पुंकेसरातून परागकण (Pollen grains) बाहेर पडतात. फुलांना विशीष्ठ सुगंध नसला तरी तिसरी पाकळी जी सोंडेसारखी भासते आणि टोकाकडे आकर्षित केसांमध्ये रूपांतरित होते, त्यामुळे परागीभवणास कारणीभूत असणारे किडे याकडे आकर्षित होतात. सोंडेमध्ये घुसून मकरंद गोळा करता करता वेगवेगळ्या फुलांना भेटी देतात. एका फुलावरून दुसऱ्या फुलावर उठणं बसणं होतं, सोंडेच्या टोकाकडच्या केसांमुळे किड्यांच्या, फुलपाखरांच्या किंवा मधमाशांच्या अंगावर लागलेले परागकण अलगद पुसून घेतले जातात आणि स्रिकेसराच्या तोंडात टाकले जातात. पुढे नैसर्गिकरित्या फलनाची प्रक्रिया पार पडून फळधारणा होते.

फुलांची संरक्षण दलं आता फळांची संरक्षण दलं (Persistent Calyx) म्हणून काम पाहू लागतात. याच्या आत ५-६ मिमी लांबी आणि रुंदी असणारी फळ लागतात. फळांचा आकार काहीसा चौकोनी असतो. त्यामध्ये दोन बिया लागतात. फळं बाहेरून पाहिली की पापडी सारखी भासतात आणि वजनाने अतिशय हलकी असतात. फळ परिपक्व झाली की जमिनीवर गळून पडतात. वाऱ्याच्या साहाय्याने सर्वदूर पसरतात. प्रवासात कधी ही फुटतात तर इतर काही कारणाने फुटून त्यातून बियांची पेरण होते.

संजीवनीच्या बिया वैशिष्टपूर्ण आहेत. या फार फार तर २- ४ मिमी लांबीच्या, काळ्या रंगाच्या आणि त्यावर सोनेरी किंवा तांबूस रंगाच्या मुलायम केसांचं आच्छादन असणाऱ्या असतात. बिया फळामध्ये ज्या ठिकाणी जोडलेल्या असतात तिथून एक पांढरा पदर (Cover) बी वर आलेला असतो. याला शास्त्रीय भाषेत ऐरिल (Aril) म्हणतात. बियांच्या प्रसारामध्ये याचं खूप महत्व आहे कारण हा पदर खाण्यायोग्य असतो. मुंग्या आणि इतर कीटक या पदरासाठी संपूर्ण बी ओढून घेऊन जातात. कधी या बिया त्यांच्या वारुळांपर्यंत पोहोचतात तर कधी मधेच वाटेत पडून जातात. संजीवनी मात्र नवीन पिढीची सोय होतीय हे पाहून सुखावलेली असते. निसर्ग खूप अजब आहे, इथे प्रत्येक घटनेमागे कारण आहे, शास्रिय! ते समजून घेण्यातला आनंद फार वेगळा आहे.

वर सांगितल्याप्रमाणे संजीवनीला दोन इंग्रजी नाव आहेत, Field Milkwort आणि Snakeroot. शास्रिय भाषेत याला Polygala arvensis Willd. असं नाव आहे. या वनस्पतींचा समावेश Polygalaceae या कुळामध्ये होतो. या कुळातील काही झाडं बागेमध्ये सुशोभीकरणासाठी लावतात.

संजीवनी, तुझं निसर्गातील अस्तित्व इतर वनस्पतींमध्ये हरवलेलं वाटतं, पण तरीही ते महत्वाचंच आहे आणि आम्हाला नक्कीच त्याबद्दल तुझा आदर आहे!!!

Plant Profile:

Botanical Name: Polygala arvensis Willd.
Synonyms: Polygala angustifolia, Polygala brachystachya, Polygala chinensis, Polygala cyanolopha, Polygala kinii, Polygala linarifolia, Polygala monspeliaca, Polygala polyfolia, Polygala quinqueflora, Polygala senduaris, Polygala shimadai.
Common Name: Field Milkwort
Marathi Name: Sanjivani (संजीवनी)
Family: Polygalaceae
Habit: Herb
Habitat: Deciduous or Scrub forest on slopes, Grasslands (शुष्क जंगल आणि डोंगरउतारावर, माळराने)
Flower Colour: Yellow (पिवळा)
Leaves: Simple, Obovate / Circular / Inverted Lance Shaped / Elliptic, 1.5-3 cm long x 1 cm wide, Stipulate, Near to sessile.
Smell: No smell
Abundance: Common
Locality: Dattagad (Dighi), Pune
Flowering Season: Jul to Sep
Date Captured: 26-Aug-2017

-         

         - रा.जा. डोंगरे

Saturday, 14 October 2017

Indian Tolypanthus | Pela Bandgul – पेला बांडगुळ | Tolypanthus lagenifer Tiegh.


माणसाच्या मनात काही झाडांबद्दल कमालीचा तिरस्कार किंवा कमालीची पूजनीयता पाहायला मिळते. वड, पिंपळ, उंबर अशा झाडांना धार्मिक महत्व आहे. याविरुद्ध गाजरगवत (काँग्रेस), बहुतांश वेली यांचा तिटकारा केला जातो. या वनस्पती उपद्रवी मानल्या गेल्या आहेत, शेतामध्ये गवत म्हणून वाढतात आणि यांना कितीही संपवायचा प्रयत्न करा, कुठूनतरी पुन्हा बी येतं आणि नव्याने जन्म घेतं, जोमाने फोपावतं. कदाचित या बिया आपल्याला सांगत असाव्यात, तुम्ही कितीही प्रयत्न करा आम्हाला संपवण्याचा, अगदी मुळापासून; पण आम्ही हरणार नाही. पुन्हा नव्याने जन्म घेऊ, आमचं अस्तित्व जपू.

अशाच एका वनस्पतीची भेट झाली, लोणावळा ते जांभिवळी गावच्या ट्रेक मध्ये. अर्थात ही फक्त भेट होती; ओळख नाही. कारण, मी ही फुलं पहिल्यांदाच पाहत होतो, म्हणून नुसतीच भेट, ओळख  नाही! लोणावळा ते जांभिवळी गावातील रस्ता दाट जंगलातून जातो. एका वळणापर्यंत राजमाची किल्ला आणि या गावाकडील रस्ता एकच. राजमाचीच्या जवळपास पोहोचल्यावर एक फाटा फुटतो, जांभिवळी गावाकडे जाणारा. आत्तापर्यंत बऱ्यापैकी रहदारी असणारा रस्ता आता अचानक एकाकी होऊन जातो. आजूबाजूला सह्याद्रीचं जंगल, आणि नानाविध पक्षांचे आवाज! मधेच जंगलातून जाणारा रस्ता भुयारातून बाहेर पडावा तसा माळरानावर निघतो आणि पुन्हा काही अंतरावर घनदाट वनराईत हरवून जातो.

आमचा ट्रेक भर पावसाळ्यात होता, जुलै महिन्यात. अर्ध्याहून अधिक वाट मागे टाकून आम्ही आता एका माळरानावर आलो होतो. समोरची पायवाट आता आम्हाला जंगलात घेऊन जाणार होती, असं दिसत होतं. पुन्हा चालायला सुरवात केली. जंगलात घुसणार तेच माझं लक्ष एका ट्रेकमेटने वेधून घेतलं. लाल टपोऱ्या फुलांकडे बोट करत त्याने मला खुणावलं. कुंकवासारखी लाल टपोरी फुलं, लिंबाच्या आकाराची. कसली ते काही कळायला मार्ग नाही. आजूबाजूला पाहिलं पण फक्त एकाच झाडावर ही फुलं दिसत होती, त्यातही फक्त एकाच फांदीला. नंतर बाजूलाच या फुलांची एक फांदी तोडून टाकलेली दिसली. नुकतीच कुणीतरी तोडली असावी असं वाटलं. मी जवळून निरीक्षण केलं. अंदाज बांधला, 'बांडगुळ' असावं कुठलं तरी. अर्थात हा फक्त अंदाज होता. निरीक्षणं नोंदवली, पावसामुळे जमेल तसे फोटो घेतले आणि निघालो पुढच्या प्रवासाला. रान तुडवत!

घरी आल्यावर नावाची शोधाशोध सुरु झाली आणि बांडगुळ असण्यावर शिक्कामोर्तब झाला. 'बांडगुळ' तसा उपहासाने वापरला जाणारा शब्द. कुण्या निरुपयोगी माणसाला हाक मारण्यासाठी हा शब्द वापरतात. हा शब्द जरी कानांवर पडला तरी चेहेऱ्यावरचे भाव बदलतात. पण, मी पाहिलेलं बांडगुळ मात्र प्रसन्न वाटायला लावणारं होतं. फुलं टपोरी आणि सुंदर. इतकी सुंदर की 'सुंदर' हा शब्द सुद्धा कमीच पडावा.

अभ्यासाअंती समजलं की ही फुलं 'पेला बांडगुळाची' होती. मराठी नावं फार समर्पक असतात याचं उदाहरण म्हणजे पेला बांडगुळ! फुलांचा गुच्छ एखाद्या पेल्यात, तळाशी मधोमध बसवावा तसा या फुलांचा सबंध आकार असतो आणि म्हणून मराठीतील हे नाव समर्पक वाटतं. अर्थात फुल कीतीही सुंदर असलं आणि छान वाटलं तरी हे बांडगुळसुद्धा परोपजीवीच (Parasitic). एखाद्या फांदीमध्ये आपली मुळं रोवायची, ती थेट अन्नवाहिन्यांमध्ये (Xylem & Phloem) टोचायची, त्यातून जीवनरस चोरायचा आणि आपलं पोटपाणी चालवायचं, असा यांचा उद्योग. बांडगुळाचे सर्वच प्रकार अशाच पद्दतीने इतर वनस्पतीचे शोषण करतात, आणि पर्यायाने त्यांच्यावर कुऱ्हाड चालवली जाते.

असो, तर पेला बांडगुळ तशी झुडूपवर्गीय वनस्पती, सह्याद्रीच्या घनदाट जंगलांत वाढणारी. एखाद्या झाडाच्या फांदीवर स्वतःचा चरितार्थ चालवणार हे झुडूप आहे. फांद्या टणक आणि राखाडी रंगाच्या असतात. त्यावर एकमेकांच्या विरुद्ध पद्धतीने पानांची जोडणी असते. पानांचा आकार बदामी. लांबी साधारणपणे ४-८ सेमी आणि रुंदी ३-६ सेमीची. नवीन लागलेली पानं काहीशी लालसर असतात नंतर हरितद्रव्यामुळे ती हिरवी होतात. पानांना स्पर्श केला तर ती थोडीशी मांसल भासतात. देठ फार-फार तर अर्ध्या सेमी पर्यंत असतो. टोकाकडे पानं निमुळती आणि टोकदार (Acute) होत जातात.

जूनच्या शेवटी आणि जुलै महिन्याच्या सुरवातीला सबंध फांदीवर लाल चुटुक फुलं लागतात. सुरवातीला फुलांचा रंग काहीसा हिरवट पिवळा असतो. पण जस जशी फुलं परिपक्व होत जातात तसा रंग लाल आणि नंतर तपकिरी होत जातो. पेला बांडगुळाच्या फुलांची रचना विशेष आहे. पाकळ्यांसारखा भासणारा पेला किंवा कपासारखं बाहेरील आवरण हे पाकळ्यांच नसून ब्रॅक्ट्सचं असतं. ब्रॅक्ट्स हा फुलांचाच एक भाग, संरक्षण दलांच्या खाली यांची रचना असते. पानांमध्ये रचनात्मक बदल होऊन यांची निर्मिती होते आणि यांचं मुख्य काम म्हणजे परागीभवनासाठी लागणाऱ्या किड्यांना आकर्षित करणे. म्हणून तर या पाकळ्यांसारख्या भासणाऱ्या ब्रॅक्टस इतक्या सुंदर असतात. या विशिष्ट रचनेमुळे फुलांचा व्यास ३-५ सेमीचा बनतो. टोकाकडे पेल्याचं पाच पाकळ्यासदृश्य भागांत विभाजन झालेलं दिसतं. पेल्याच्या आतमध्ये तळाशी साधारणपणे ५ फुलं लागतात, ४-६ सेमी लांबीची, नळीसारखी. फुलं परिपक्व होण्याआधी एखाद्या काठीवर गोल टोपी घातल्यासारखी भासतात.. परिपक्व झाली की काठीसारखी वाटणारी नळी लाल किंवा केशरी रंगाची दिसू लागते. वरचा टोपीसारखा भाग पाकळ्यांमध्ये बदलतो. पाकळ्यांचा रंग बहुधा गुलाबी असतो. त्यात पुंकेसर आणि स्त्रीकेसर असतात. प्रत्येक पाकळी २-३मीमी लांबीची असते.

फुले परिपक्व झाली की पावसाच्या थेंबांनी किंवा कीटकांच्या मदतीने प्रजननाची प्रक्रिया पार पडते. एका फुलापासून एक फळ तयार होते. पक्षी ही फळं आवडीने खातात. झाडांच्या खोडांत विष्टेवाटे बियांची पाखरण होते. यातील काही बियांना योग्य वातावरण मिळतं आणि त्या झाडाच्या फांद्यांवर रुजतात. मुळ्या हळूहळू झाडाच्या फांदीत घुसून अन्नद्रव्य वाहून नेणाऱ्या नलीकांमध्ये शिरकाव करतात. एव्हाना इकडे फांद्या आणि पानांचा पसारा तयार झालेला असतो. थोडक्यांत नवीन जीवनाची सुरवात झालेली असते.

खरं पाहता बांडगुळवर्गीय वनस्पती पूर्णपणे परावलंबी नाहीत. त्यांनाही हिरवी पानं असतातच की, ही पानं अन्न तयार करण्यात मदत करतात. परंतु तेवढं अन्न पुरेसं नसतं मग उरलेल्या गरजा ते त्या झाडाकडून पूर्ण करवून घेतात ज्यावर यांचा संसार थाटलेला असतो. अर्थात यामुळे मुख्य झाडाचं काही प्रमाणात नक्कीच नुकसान होतं. पण निसर्ग आहे, इथे प्रत्येकाची योग्य ती सोय होतेच.

पेला बांडगुळ हे Loranthaceae या कुळात मोडतं, विशेष म्हणजे या कुळातील बहुतांश वनस्पती अशाच अर्ध-परावलंबी आहेत. याचं इंग्रजी नाव Indian Topypanthus असं आहे. बांडगुळाचा हा प्रकार सह्यद्रीच्या घनदाट जंगलांत पाहायला मिळतो आणि भारत हा यांचा उगमदेश म्हणून 'Indian' असा शब्दोल्लेख इंग्रजी नावात दिसतो. शास्रिय नाव ' Tolypanthus lagenifer Tiegh.' असं आहे.

मला खात्री आहे पेला बांडगुळ पाहून तुम्ही बांडगुळाच्या प्रेमात पडाल ते...

Plant Profile:

Botanical Name: Tolypanthus lagenifer Tiegh.
Synonyms: Tolypanthus lageniferus
Common Name: Indian Tolypanthus
Marathi Name: Pela Bandgul (पेला बांडगुळ)
Family: Loranthaceae
Habit: Shrub
Habitat: Dense Evergeen Forest (घनदाट जंगल)
Flower Colour: Red, Greenish Yellow  (लाल, तपकिरी किंवा पिवळसर हिरवा)
Leaves: Simple, heart shaped, opposite, entire margin, 5-8 cm long x 3-5 cm wide, leaf stalk 0.5 cm long.
Smell: No smell
Abundance: Common
Locality: Near Jambhivali Village, Lonavala, Pune
Flowering Season: July - September
Date Captured: July-2017

-          
- रा.जा. डोंगरे